राज्यात उसाचे ऐतिहासिक गाळप

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यात यंदा उसाचे ऐतिहासिक गाळप होत असून, आतापर्यंत ९३६ लाख टन उसाचे गाळप करण्यात राज्यातील साखर कारखान्यांना यश आले आहे. अजूनही ५० साखर कारखाने सुरू असून, आतापर्यंत १०५ लाख टन साखर तयार झालेली आहे.

राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारीला या विक्रमी गाळपाचे श्रेय जाते. गेल्या हंगामात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे उसाची उत्पादकता वाढण्याची शक्यता होती. गेल्या हंगामात उसाची उत्पादकता प्रतिहेक्टरी ६५ टन होती. यंदा उत्पादकता ८० टन राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात राज्यात यंदा उसाची उत्पादकता हेक्टरी १०० टन आली आहे.

"भरपूर ऊस उपलब्ध असतानाही राज्यातील साखर कारखान्यांनी चांगले नियोजन केलेले आहे. अजून तरी कोणत्याही भागात तोडीअभावी ऊस जळाल्याची तक्रार आलेली नाही. यंदा १८७ साखर कारखाने वेगाने गाळप करीत आहेत. काही जिल्ह्यात यंदा एप्रिलअखेरपर्यंत गाळप सुरू राहणार असून यामुळे राज्याचे साखर उत्पादन आधीच्या अंदाजापेक्षा २७ लाख टनाने वाढण्याची शक्यता आहे," अशी माहिती सहकार विभागाच्या सूत्रांनी दिली.

उसाचे गाळप आतापर्यंत ९३६ लाख टनांच्या पुढे गेले आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत गाळप केवळ ३३७ लाख टन होते. राज्यात अजून १५ लाख टनाच्या पुढे ऊस शिल्लक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांतील कारखाने मे महिन्यातदेखील सुरू राहण्याची चिन्हे आहेत.

"राज्यात यंदा १८७ साखर कारखान्यांनी गाळपासाठी शासनाकडून परवानगी घेतली होती. त्यातील १३७ साखर कारखाने आतापर्यंत गाळप आटोपून बंद झालेले आहेत. राज्यात शिल्लक ऊस असला तरी ५० साखर कारखानेदेखील अजून सुरू आहेत. त्यामुळे उर्वरित उसाचे गाळप पुढील महिनाभरात पूर्ण होईल," असे साखर आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यात आतापर्यंत ९३६ लाख ६५ हजार टन उसाचे गाळप करून एकूण १०४ लाख ९७ टन साखर तयार झाली आहे. राज्याचा साखर उतारा सध्या सरासरी ११.२६ टक्के येतो आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत १५० कारखान्यांनी अवघा ३७३ लाख १३ हजार टन उसाचे गाळप करून ४२ लाख टन साखर तयार केली होती.

गाळपासाठी यंदा १०१ सहकारी आणि ८६ खासगी कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी केला. गेल्या हंगामात सहकारात ८८ तर ६२ खासगी साखर कारखान्यांनी गाळप केले होते. खासगी आणि सहकारी अशा दोन्ही पातळ्यांवर कारखानदारीचा विकास होत असल्याचे दिसून येते.

"शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्या तरी साखर कारखाने, कृषी विभाग आणि साखर आयुक्तालयाचे चांगले नियोजन, पावसाने दिलेली साथ आणि शेतकऱ्यांच्या कष्टामुळे यंदा राज्यात १०७ लाख टन साखर तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे साखर उत्पादनाचा चार वर्षांपूर्वीचा विक्रम यंदा तुटणार आहे." - दत्तात्रय गायकवाड, साखर सहसंचालक, साखर आयुक्तालय, पुणे

राज्यातील उसाची विभागनिहाय गाळप स्थिती

विभाग कारखाने गाळलेला ऊस साखर उत्पादन उतारा
कोल्हापूर ३७ २१२.६ २६३.६१ १२.४३
पुणे ६१ ३६८.०२ ४०९.४० ११.१२
नगर २७ १४१.०५ १५३.५६ १०.८९
औरंगाबाद २४ ८५.९५ ८५.३८ ९.९३
नांदेड ३२ ११६.३१ १२३.६८ १०.६३
अमरावती ५.५३ ५.९६ १०.७७
नागपूर ७.७३ ८.१६ १०.५६

- उतारा टक्क्यांमध्ये आहे. - ऊस गाळपाचा आकडा लाख टनात असून, साखर उत्पादनाचा आकडा लाख क्विंटलमध्ये आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com