'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची तयारी सुरू

औरंगाबाद : खरिपापूर्वी टोमॅटो लागवडीसाठीच्या मशागत केलेल्या शेतात खत टाकताना माळीवडगाव येथील अंबादास गवळी व त्यांच्या पत्नी.
औरंगाबाद : खरिपापूर्वी टोमॅटो लागवडीसाठीच्या मशागत केलेल्या शेतात खत टाकताना माळीवडगाव येथील अंबादास गवळी व त्यांच्या पत्नी.

औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम टप्प्यातील पूर्वमशागतीच्या कामात गुंग आहेत. गतवर्षीच्या खरिपाने आर्थिक नियोजन कोलमडविले असले तरी यंदाचं साल बरं राहिलं, या आशेवर येत्या खरिपाची तयारी सुरू आहे. शिवाय चरितार्थ भागविण्यासाठीची गरज पाठीचा कणा मोडून पडलेल्या शेतकऱ्यांना खरिपाची तयारी करण्यास प्रोत्साहित करीत असल्याचेही चित्र आहे. गुलाबी बोंड अळीने गत हंगामात कपाशीची धूळधाण केली. त्यामुळे मोठी आशा असलेलं हे पांढरं सोनं शेतकऱ्यांना अडचणीत ढकलून गेलं. दोन वर्षांपूर्वी पिकांनी दिलेली बरी साथ त्यामधून अंगावरील कर्जाचा बोजा कमी करून पुन्हा कर्जाच्या दावणीला गेल्याशिवाय पर्यायच नसल्याचे शेतकरी सांगतात. असे असले तरी कर्जमाफीची व कर्जवाटपाची गती संथ असल्याने खरिपाच्या तोंडावर खर्चाचं गणीत जुळायलाच हवं यासाठी बॅंकांचे उंबरठे झिजविण्यासह खासगीतून कर्जउचल वा उसनवार करून खरिपासाठी लागणारं अर्थकारण जुळविण्याचं काम शेतकरी करताहेत. नांगरणी, वखरणी, भाजीपालावर्गीय पिकांसाठी बेड पाडणे, खते मातीत घुसळण्याचे काम सध्या शेतशिवारात युद्धपातळीवर सुरू आहेत. 

खरिपाच्या क्षेत्रात ४ टक्‍के वाढ प्रस्तावित औरंगाबाद जिल्ह्याचे खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ३३ हजार हेक्‍टर एवढे आहे. या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २०१७-१८ मध्ये ६ लाख ९१ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. त्यामध्ये कपाशीचे क्षेत्र ४ लाख ७ हजार हेक्‍टरवर विस्तारलेले होते. गतवर्षीच्या प्रत्यक्ष पेरणी झालेल्या खरीप क्षेत्राच्या तुलनेत येत्या खरीपात चार टक्‍के वाढ प्रस्तावित करून पेरणीचे क्षेत्र ७ लाख २० हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे.

कपाशीच्या क्षेत्रात मात्र घट खरीपाचे एकूण क्षेत्रात वाढ प्रस्तावित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कपाशीच्या क्षेत्रात मात्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास  ३० हजार हेक्‍टरची घट प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या खरिपात कपाशीचे क्षेत्र ३ लाख ७७ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. 

आर्थिक नियोजनाच्या जुळवाजुळवित घालमेल गत खरिपाने दगा दिला; परंतु चरितार्थ भागवायचा असेल तर शेती कसण्याशिवाय पर्याय नाही. ती कसण्यासाठी पैसा लागतोच. कर्जमाफीचं चित्र स्पष्ट झालं नसल्यानं मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात उद्दिष्टाच्या तुलनेत केवळ ३.९० टक्‍केच शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात आले होते. ११५९ कोटी ४८ लाख कर्जवाटपाच्या उद्दिष्टाच्या तुलनेत ११ हजार ८ शेतकऱ्यांना केवळ ४५ कोटी १६ लाख रुपयांचेच कर्जवाटप केले गेले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ३२ बॅंकांच्या २८८ शाखांच्या माध्यमातून शासनाला जूनपूर्वी अपेक्षित शंभर टक्‍के कर्जवाटप शक्‍य होईल का, हा खरा प्रश्न आहे. 

  • शेतकरी कपाशीच्या पर्यायी पिकांच्या शोधात
  • खरिपातील टोमॅटोचे क्षेत्रही वाढण्याचा अंदाज
  • कपाशीच्या स्वदेशी वाणांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. 
  • पूर्वहंगामी कपाशी लागवडीला तूर्त ना

    औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कपाशीची पूर्वहंगामी लागवड केली जाते. यंदा मात्र पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशी लागवडीला शेतकऱ्यांनी तूर्त तरी तयारी दाखविली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामागे गुलाबी बोंड अळीचा भविष्यातील हंगाम सुरक्षित होण्यासाठीचा उपाय एवढेच एक कारण असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

    गत हंगामात खर्च आणि उत्पन्नाची तोंडमिळवणी झाली. दहा माणसाच्या कुटुंबाच्या चरितार्थाचा गाडा दोन वर्षांपूर्वी जमिनीनं दिलेल्या साथीनं आजवर रेटता आला. आता खरिपाची तयारी करण्यासाठी कर्जमाफीच क्‍लिअर झालं नाही तं पैसे उभे करण्यासाठी हालचाल करावीच लागणार. यंदा मका, अद्रक, टोमॅटोचे क्षेत्र वाढविणारं कपाशी चार एकर कायम राहिलं. पण ज्या शेतात गतवर्षी कपाशी लावली त्यात यंदा लावणार नाही. अंबादास गवळी, शेतकरी, माळीवडगाव,  ता. गंगापूर, जि. औरंगाबाद. 

    माझ्या शेतात आजवर २० एकर असणारी कपाशी येत्या खरिपात दहा एकरांवरच असंल. शिवाय गुलाबी बोंड अळीमुळं यंदा कपाशीची पूर्वहंगामी लागवड नाही. गतवर्षी चार एकर असलेली हळद बारा एकरांवर तर तीन एकर असणारी अद्रक चार एकरांवर नेण्याचं नियोजन केलंय. माझंच काय सर्वच शेतकऱ्यांना खरिपासाठी पैशाची गरज आहे; पण पैसा नाही. कर्जमाफीचं भीजत घोंगड राहिल्यास शेतकऱ्यांना खासगीतून कर्ज उचल केल्याशिवाय पर्याय नाही. बॅंकांच्या शाखांमध्ये पैसच नसतात. कपाशीच्या देशी वाणाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळताहेत.  - ईश्वर पाटील, शेतकरी, तिडका,  ता. सोयगाव, जि. औरंगाबाद. 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com