बीड : प्रदीप थिटे यांच्या शेतातील मिरचीला आलेला बहर.
बीड : प्रदीप थिटे यांच्या शेतातील मिरचीला आलेला बहर.

वाहनचालकाच्या प्रयत्नातून शेतीचे महत्त्व अधोरेखित

बीड : एकीकडे शेती नकोशी वाटणाऱ्यांची संख्या वाढत चालली असताना काहींनी शेती करण्यासाठी केलेले प्रयत्न शेतीचे महत्त्व अधोरेखित करत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या अंबाजोगाई आगारातील चालक प्रदीप अप्पाराव थिटे त्यापैकीच एक.

शेती करण्याच्या प्रबळ इच्छेने त्यांना भकास माळाला शेतीत परावर्तित करायला लावले. प्रदीपर यांच्या माळावरील बोअरलाही चांगले पाणी लागल्याने त्यांच्या परिश्रमाचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांचे परिश्राम जवळून पाहणाऱ्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकते आहे.

प्रदीप यांना नोकरीबरोबरच शेतीचे प्रचंड आकर्षण. आपल्याकडेही सर्व सोयी असलेली शेती असावी ही त्यांची इच्छा. त्या इच्छेला परिश्रमाची जोड देण्याची त्यांची तयारी. त्यामुळे त्यांनी नोकरीतून पै पै जमा करून काही रक्‍कम जमविली. जास्त शेती कसण्यापेक्षा गावालगत असलेल्या दोन एकर माळाला शेतीत परावर्तित करण्यासाठी त्यांनी काही जमीन विकून त्यामधून काही रक्‍कम उभी केली.

जमा झालेल्या रकमेतून माळाच्या उबडखाबड जमिनीला शेतीत परावर्तित करण्याचे काम जून २०१६ मध्ये सुरू केले. हे करीत असताना अनेकांना ५० ते ६० वर्षांपासून पडीक असलेल्या शेतीत एवढे पैसे हा कशाला टाकतोय असा प्रश्न पडला, काहींनी तो बोलूनही दाखविला. परंतु कोण काय बोलतं यापेक्षा आपल्याला काय करायचं यावरं लक्ष केंद्रित केलेल्या प्रदीपर यांनी आई व पत्नीच्या साथीनं माळरानाला शेतीत परावर्तित करण्यासाठी जवळपास ९ लाख रुपये खर्ची घातले.

शेतात धरणातील गाळ आणून टाकला. दोन एकरांत पहिलंच पीक हरभरा घेतले. जवळपास ८ क्‍विंटल हरभरे झाले. मार्च २०१७ मध्ये  बोअर घेतला. त्यावर मोटारपंपासह लाखभर रुपये खर्ची घातले. त्याला ८० फुटांवरच पाणी लागल्याने प्रदीपरावांचा उत्साह वाढला.

यंदा ५ जनूला दोन एकरांपैकी जवळपास ३० गुंठ्यांवर मिरचीची लागवड केली. त्या मिरचीचा बहर सुरू असून, आजवर तीन तोड्यांतून जवळपास ३५ क्‍विंटल मिरची लातूरच्या बाजारात विकली. या मिरचीला २५ ते ३६ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. उर्वरित क्षेत्रातील कपाशीचे पीकही जोमात आहे.

शेती ठिबकवर पाण्याचे महत्त्व जाणून असलेल्या प्रदीप यांनी आपली दोन एकर शेती ठिबकवर केली आहे. त्यासाठी त्यांनी जवळपास ८५ हजार रुपये खर्ची घातले. बोअरवेलला चांगले पाणी असताना देखील त्यांनी ठिबकचा पर्याय निवडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com