कापूस उत्पादकतेत भारत मागे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : जगात सर्वाधिक कापूस लागवड करणारा देश म्हणून भारताची ओळख आहे, परंतु चांगल्या कापूस वाणांचा अभाव, नैसर्गिक समस्या व सिंचनासंबंधीच्या अडचणी यामुळे उत्पादकतेमध्ये भारत जगात मागे आहे. भारताला कापूस उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरी गाठणेही अवघड झाले असून, बीटीसंबंधीचे बीजी-३ (बॅसीलस थुरेलेंझीस ः जेनेटिकली मॉडीफाईड) तंत्रज्ञान वेळेत आत्मसात न केल्याने उत्पादकतेच्या अडचणी वाढल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

भारतात बीटीमधील बीजी १ व २ प्रकारचे तंत्रज्ञान येऊन सुमारे १५ वर्षे झाली. बीजी तंत्रज्ञानात दर १० वर्षांनी सुधारणा, बदल अपेक्षित असतात. पण याकडे देशात दुर्लक्ष झाले. अशातच २०१५ मध्ये जळगावातील जैन हिल्स येथे झालेल्या अखिल भारतीय कापूस उद्योग परिषदेत (कॉटन मीट) थ्री जीएम तंत्रज्ञानाची मागणी करण्यात आली. अमेरिका व ऑस्ट्रेलियाचे दाखले त्यासंबंधी कापूस उद्योगातील भीष्म अशी ओळख असलेले सुरेश कोटक (मुंबई) यांनी दिले. 

बीजी- २ तंत्रज्ञान व्यापक स्वरुपात देशभरात पोचले, तेव्हा त्यावर गुलाबी बोंड अळी येत नाही, असे दावे तोंडी स्वरुपात करण्यात आले. म्हणून कामगंध सापळे व इतर प्रिव्हेंटिव कार्यक्रम कुणी घेतले नाहीत. रेफ्युजकडेही दुर्लक्ष झाले. परिणामी गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने कापूस उत्पादकता ५७७ किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंत खाली आल्याची माहिती खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद जैन यांनी दिली. 

इतर देश चाचण्या करून पुढे जनुकीय सुधारित वाण (जीएम) किंवा बीटी तंत्रज्ञानाच्या नव्या वाणांच्या चाचण्यांना किमान पाच वर्षे कालावधी लागतो. ऑस्ट्रेलिया व अमेरिकेने या तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरूच ठेवल्या. अमेरिकेत थ्री जीएम तंत्रज्ञान आले. तेथे यापुढच्या आवृत्तीची तयारी सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने बीजी ४ चे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. चीनने आपल्या देशी प्रकारच्या सुमारे ८४ वाणांचे संवर्धन केले, तंत्रज्ञानात सुधारणा केली.   

प्रभावी बीटी वाण केव्हा देणार? भारतातील शासकीय कृषी संस्थांचे देशी कापूस वाण उत्पादकतेच्या अडचणींमध्येच अडकले आहेत. दाक्षिणात्य राज्यांमध्ये प्रसारित झालेला जेएलए ७५४ व महाराष्ट्रासाठी राहुरी कृषी विद्यापीठाने दिलेला जेएलए ५०५ हे कोरडवाहू आणि कमी पाण्यात येणारे वाण आहेत. उत्पादकतेच्या अडचणी त्यांच्यासाठी कायम आहेत. मोन्सॅन्टोच्या सहकार्याने अकोला व परभणी येथील कृषी विद्यापीठात बीटी हायब्रीड वाणांवर काम सुरू आहे. राहुरी कृषी विद्यापीठाने २०१८-१९ च्या हंगामात  बीटी वाण देऊ, असे म्हटले होते. पण त्यासंबंधीचे सकारात्मक चित्र तूर्त दिसत नाही. 

जगातील प्रमुख देशांची कापूस उत्पादनासंबंधीची स्थिती  (क्षेत्र हेक्‍टरमध्ये, उत्पादकता किलो रुई व प्रतिहेक्‍टरी, उत्पादन लाख गाठींमध्ये) देश            लागवडीखालील क्षेत्र               उत्पादकता           उत्पादन भारत              १२२ लाख                           ५७७               ३६२ ते ३६७  चीन                ४१ लाख                             १८००             ३५० अमेरिका          २७ लाख                             २०००             २३० ऑस्ट्रेलिया       ११ लाख                            १५००              ६१

चांगल्या, कमी पाण्यात येणाऱ्या देशी कापूस वाणांचे संशोधन राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून झाले आहे. त्यांचे उत्पादन निर्देशानुसार येते. उत्पादनाच्या काही मर्यादा आहेत, पण पावसाचा ताण ते सहन करतात. शाश्‍वत उत्पादन येते. दाक्षिणात्य व मध्य भारतात कापूस उत्पादक देशी वाणांना पसंती देतात.  - डॉ. संजीव पाटील, कापूस पैदासकार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com