जळगाव बाजार समितीत लिलाव प्रक्रियेला अडतदारांचा खोडा

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.

जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या धान्याची विक्री लिलाव प्रक्रियेद्वारे करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने सुरू केला; मात्र अडतदारांनी किमान आधारभूत मूल्याऐवढे (एमएसपी) दर मूग, उडदाला नसल्याने लिलाव प्रक्रियेत जादा दरात धान्य कसे खरेदी करायचे, अशा आशयाचे पत्र देत संचालक मंडळाच्या लिलाव प्रक्रियेला खोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

जळगाव बाजार समिती जिल्ह्यात सर्वांत मोठी व महत्त्वाची आहे. यात १०८ कर्मचारी असल्याने वेतनावर मोठा खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन महसूलवाढीच्या दृष्टीने बाजार समितीने शेतकऱ्यांना अधिक व योग्य दर मिळावेत, यासाठी लिलाव प्रक्रिया सोमवारपासून (ता. ११) सुरू केली.

मात्र व्यापाऱ्यांनी किमान आधारभूत मूल्यापेक्षा सध्या मूग व उडदाला दर नाहीत. त्यांची कमी दराने खरेदी लिलाव प्रक्रिया केल्याची तक्रार दाखल झाल्यास आमच्यावर फौजदारी कारवाई होईल.

तसेच लिलाव प्रक्रियेत आम्ही कमी दरात किंवा किमान आधारभूत मूल्यापेक्षा खरेदी केली तर बाजार समिती प्रशासन, संचालकांची भूमिका काय असेल, अशा आशयाचे एक पत्र शनिवारी (ता. ९) जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अडत असोसिएशनने दिल्याची माहिती बाजार समितीचे उपसभापती कैलास चौधरी यांनी दिली.

सोमवारी सकाळी १०.२५ वाजता शेतकऱ्यांच्या धान्याची विक्री लिलाव प्रक्रियेद्वारे बाजार समितीमध्ये सुरू झाली. लिलावांसाठी बाजार समितीच्या धान्य मार्केट यार्डात स्वतंत्र व्यवस्था केली आहे; पण त्यावर शेड नाही. उघड्यावर ही प्रक्रिया सुरू झाली. सुरवातीला गहू व दादरची (रब्बी ज्वारी) लिलाव प्रक्रिया झाली.

गव्हाला प्रतिक्विंटल १८६१, तर दादरला १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मूग, उडीद यांचीही आवक झाली होती. उडदाला अडीच हजारांपासून, तर मुगाला दोन हजारांपासून बोली लावली गेली. फारशा व्यापाऱ्यांनी या प्रक्रियेत सोमवारी सहभाग घेतला नाही, अशी माहिती मिळाली. मुगाला ३००० ते ४२०० आणि उडदाला ३२०० ते ४३०० असे दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

सध्या किमान आधारभूत मूल्यापेक्षा मूग व उडीद यांना कमी दर आहेत. त्यांची यापेक्षा कमी दरात खरेदी केली, तर शासनाकडून व्यापाऱ्यांवर कारवाई होऊ शकते. ही बाब लक्षात घेता संचालक मंडळाला अडत असोसिएशनने पत्र दिले व वस्तुस्थिती मांडली. लिलाव प्रक्रियेला कुठलाही विरोध नाही. सर्व प्रकारच्या धान्याची व्यापाऱ्यांनी खरेदी केली. - शशिकांत बियाणी, व्यापारी प्रतिनिधी (संचालक), जळगाव बाजार समिती

जिल्ह्यात अमळनेर, चोपडा येथे रोज लिलाव प्रक्रियेने धान्याची विक्री होते. जळगावात ही पद्धत अनेक वर्षे नाही. शेतकरी आपला शेतमाल किंवा धान्य आणून ते अडतदारांकडे टाकतात. हे धान्य १० ते १२ दिवस पडते. त्याची नासाडी होते. उंदीर नुकसान करतात. अनेक शेतकरी चोपडा येथे आपले धान्य नेतात. म्हणून महसूल वाढविण्यासह शेतकऱ्यांना जळगाव बाजार समितीमध्ये धान्य अधिक आणावे, यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली; पण अडतदारांनी आता किमान आधारभूत मूल्याचा मुद्दा मांडला आहे. - कैलास चौधरी, उपसभापती, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com