केसर आंबा संकटातच

केसर आंबा संकटातच

औरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात वातावरण बदलाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या केसर आंब्यावर आता वादळ अन्‌ तापमानवाढीचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे यंदा केसर उत्पादकांच्या पदरात उत्पादनाबाबत समाधानकारक काही पडेल असे चित्र नाही. 

सौराष्ट्रात जरी केसर पिकत असला, तरी मराठवाड्यातील केसरची चव न्यारीच. ही चव चाखण्यासाठी सारेच आतूर असतात. मराठवाड्यात आजघडीला केसर आंबाबागांचे क्षेत्र १९ हजार हेक्‍टरवर पसरले आहे. गेल्या वर्षी केसर आंब्याचे जवळपास ७० ते ७५ टक्‍के उत्पादन मिळाले. यंदा मात्र संकटांच्या अविरत मालिकेमुळे तुलनेत १० ते २० टक्‍के उत्पादन हाती येईल की नाही असा प्रश्न असल्याचे उत्पादकांनी सांगितले. 

यंदा केसरला तीन टप्प्यांत आलेल्या बहरांपैकी पहिल्या बहरावर गारपीट व वाईट वातावरणाचा परिणाम झाला. त्यानंतरच्या दोन बहरांवर आकाशात मिरवणाऱ्या ढगांमुळे ''भुरी''चा प्रादुर्भाव झाला. तो निस्तारला जात नाही, तोच फेब्रुवारीमध्ये ११ ते १३ तारखेदरम्यान गारपिटीने केसर आंबा उत्पादकांच्या आशांना सुरुंग लावला. त्याही संकटातून केसर बाहेर पडला व ३० ते ४० टक्‍के किमान उत्पादन हाती येईल असे वाटत असताना, आता पुन्हा चार ते पाच दिवसांपासून मराठवाड्यात वादळ व अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. वादळात तुटून पडणाऱ्या कैऱ्यांना बाजारातही अत्यल्प दर मिळत असल्याने केसर आंबा उत्पादकांच्या नुकसानीत भर पडत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

तापमानाचा प्रकोप वाढला

केसरची फळे चांगली राहण्यासाठी ३६ अंशांपुढे तापमान न जाणे आवश्‍यक असते. प्रत्यक्षात मराठवाड्यातील बहुतांश भागातील तापमान ४० अंश वा काही ठिकाणी त्याही पुढे गेले आहे. तापमानवाढीमुळे दिवसा झाडांची कार्यरत राहण्याची गती मंदावते. शिवाय रात्रीच्या वेळी झाड कार्यरत राहत असले, तरी त्या वेळी पाणी देण्यासाठी वीजपुरवठा राहत नसल्याने उत्पादकांच्या संकटात भरच पडत आहे. ही बाब फळगळीला सोबतच केसरच्या पक्‍वतेसह त्याच्या रंगावर आघात करत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली

आंब्याचे उत्पादन व्हावे यासाठी आंबा उत्पादक म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करतो. परंतु संकटाची मालिका थांबतच नसल्याने उत्पादन दहा ते पंधरा टक्‍क्‍यांपुढे जाईल अशी शक्‍यता नाही.  - रसुल शेख,  आंबा उत्पादक, औरंगाबाद

३६ ते ३७ अंशांपुढे तापमान गेलं की आंबा संकटात येतो. तापमान ४१ अंशांवर गेलंय. तळपणाऱ्या सूर्याच्या प्रकोपाबरोबरच वादळात बागांमधील फळं तुटून पडताहेत.  - संजय मोरे पाटील,  आंबा उत्पादक, नळविहिरा, जि. जालना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com