पोळ्याला पाऊस आला; पण खरीप हातचा गेला

जून व जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने मूग, उडीद, ज्वारी ही पिके हातची गेली. आता १५ दिवसांपासून पाऊस नाही. पिकांची स्थिती नाजूक आहे. रब्बी हंगामाबाबतही आशादायी चित्र नाही. - सुरेश पाटील, शेतकरी, होळ, ता. नंदुरबार
बामडोद, ता. नंदुरबार ः खंडेराव नथ्थू पाटील यांच्या हलक्‍या जमिनीतील कापसाचे पीक आता पावसाअभावी माना टाकू लागले आहे.
बामडोद, ता. नंदुरबार ः खंडेराव नथ्थू पाटील यांच्या हलक्‍या जमिनीतील कापसाचे पीक आता पावसाअभावी माना टाकू लागले आहे.

पेरणीच्या वेळेला भुरभुर पाऊस आला... नंतर त्याने दडी मारली... पुन्हा तो आला; पण तोपर्यंत दुबार पेरणी करण्याची वेळ आली... पिके मोडून पुन्हा पेरणी केली... पण दुसऱ्या पेरणीनंतरही पावसाने ओढ दिली... आणखी तिबार पेरणी केली... त्यावरही कमी अधिक पाऊस पडला... मग गेलेला पाऊस थेट पोळा सणाला परतला... पण तोपर्यंत उशीर झाला. याचा मिरची, कापूस, सोयाबीन, उडीद, मूग या सर्वच पिकांना फटका बसला.

जायेल देव पायाले येस, तसा देव पोयाले ऊना, पन आमना हागाम ली गया... (दडी मारलेला पाऊस अनेकदा पोळ्याला येतो, अशी म्हण आहे. तसाच यंदा पोळ्याला पाऊस आला, पण खरीप हंगाम हातचा गेला), अशा हताश प्रतिक्रिया नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.  नंदुरबार, शहादाच्या पूर्व भागातील गावांमधील पिके आता भाद्रपदच्या उन्हात माना टाकत आहे. कापसासह सोयाबीन, मका पिकाची स्थिती बिकट बनली आहे. बामडोद (ता. नंदुरबार) येथे तर पाणीटंचाई निर्माण झाली असून, याच गावातील आनंदा विठ्ठल पाटील यांची कूपनलिका पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहित करावी लागली आहे.

सध्या नंदुरबार व शहादा परिसरातील पूर्व भागातील गावांमध्ये १५ दिवसांपासून पाऊस नाही. जून व जुलैमध्येही या भागात तीन-तीन आठवडे पाऊस गायब झाला होता. दुसरीकडे मिरचीची पेरणी लांबल्याने तिला कृत्रिम जलसाठा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी पाणी दिले.

नंदुरबार व शहादा तालुक्‍यांतील पूर्व भागात हलकी व मध्यम जमीन आहे. तिला पाण्याची अधिक गरज असते. तसेच या भागात कृत्रिम जलसाठ्यांची हवी तशी सुविधादेखील नाही. याचा नंदुरबार तालुक्‍यातील चौपाळे, रनाळे, तिसी, भालेर, होळ,  खोंडामळी आदी गावांना अधिक फटका बसल्याचे दिसते. या भागात कापसाची उंची वितभर, जेमतेम पाते व फुले, अशी स्थिती आहे. 

मूग, उडीद पूरते गेले आहेत. कोळदा (ता. नंदुरबार) येथील गावानजीकचा नाला अजूनही खळखळून वाहिलेला नाही. समशेरपूर, बामडोद, लहान शहादे येथील हलक्‍या जमिनीतील कापसाचे पीक माना टाकू लागले आहे. त्यावर पाऊस नसल्याने रब्बीबाबतही आशावादी वातावरण नाही.

तालुक्‍यातील धमडाई, पथराई, बामडोद, कोठली, बामडोद या भागात मिरचीची लागवडही कमी पावसाने थांबली होती. ज्यांनी लागवड केली होती. त्यांना नंतर कृत्रिम जलसाठ्यांद्वारे पाणी देण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगतात. काही शेतकऱ्यांच्या विहिरी, कूपनलिकांना अजूनही पाणी हवे तसे नसल्याने ते कापसाच्या पिकात सूक्ष्म सिंचन यंत्रणा असतानाही पुरेसे पाणी देऊ शकत नाहीत.

दरम्यान तापी काठालगतच्या मनरद, नांदरखेडा, शहादा, प्रकाशा आदी परिसरलाही पावसाच्या ओढीने फटका बसला आहे. नांदरखेडा व परिसर पपईसाठी प्रसिद्ध आहे. पण या भागातील पपईमध्ये फूलगळ झाली.

शहादा तालुक्‍यातील जयनगर, मोहिदे, जवखेडा सारंगखेडाचा उत्तर भागही पावसाचा खंड पडल्याने प्रभावित झाला. तर ब्राह्मणपुरी,  खेडदिगर, पाडळदे, पिंप्री, काकरदा, जवखेडा, धुरखेडा, कुढावद, लोणखेडा आदी गावांमधील केळी, पूर्वहंगामी कापसावरही परिणाम झाला. केळीच्या निसवणीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. 

भात ठिकठाक नंदुरबार व शहादा या तालुक्‍यांमध्ये पावसाने ओढ दिली, पण गुजरातनजीक असलेल्या नवापूर तालुक्‍यातील भारडू, ढोंग, सोनखांब, विसरवाडी, पळसूल, पालीपाडा, चोरविहीर, बोकळझर, मालानी, चौकी, निंबोणी, पळाशी, नवापाडा, सावनी आदी गावांमधील भाताच्या पिकावर फारसा ताण पडला नाही. या भागात हव्या त्या वेळी पाऊस आला. पोळा सणाच्या वेळेस या भागात जोरदार पाऊस झाल्याची माहिती  मिळाली. 

पावसाअभावी पर्यटनावर परिणाम सातपुड्यातील तोरणमाळ (ता. धडगाव) हे थंड हवेचे ठिकाण आहे. पण या भागातही पोळा सणापूर्वी हवा तसा पाऊस नसल्याने नाले, ओढे खळखळून वाहत नव्हते. तोरणमाळ येथील सीताखाईनजीकचा धबधबाही प्रवाही नव्हता. त्यामुळे या भागातील पर्यटनावर परिणाम झाल्याचे नांदरखेडा, मनरद भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. 

पेरणीची स्थिती (क्षेत्र हेक्‍टरमध्ये) पीक    सरासरी    प्रत्यक्ष    टक्केवारी तृणधान्य    ९२१९७    १०९६५४    ११९ कडधान्य    ४४३७९    ३२२७४    ७३ गळीतधान्य    ३४१३२    ३४६२९    १०१ कापूस    ८२६४०    १०१५२८    १२३

दृष्टिक्षेपात नंदुरबार जिल्हा (क्षेत्र हेक्‍टरमध्ये) खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र  ः २,६३,१५७  प्रत्यक्ष पेरणी ः  २,८८,१८१ टक्केवारी : ११०

३० ऑगस्ट अखेरचा पाऊस (मिलिमीटरमध्ये) तालुका    अपेक्षित    प्रत्यक्ष    टक्केवारी नंदुरबार    १७८.६    ९८.७    ५५.३ नवापूर    ३३२.४    १८०.०    ५४.२ शहादा    १८५.३    ८९.३    ४८.२ तळोदा    २२६.१    ९९.०    ४३.८ धडगाव    १९७.७    १७७.६    ८९.८

कर्जवाटपाचा लक्ष्यांक फक्त ३५ टक्के नंदुरबार येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात खरिपाच्या कर्ज वाटपाचा ३५ टक्के लक्ष्यांक साध्य झाला आहे. त्यात धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला ६५ कोटींचा लक्ष्यांक होता. या बॅंकेने फक्त ३२ कोटी कर्ज वितरित केले. तर राष्ट्रीयीकृत बॅंकांना ५०० कोटींचा लक्ष्यांक होता. या बॅंकांनी १७८ कोटींचे वितरण केल्याची माहिती मिळाली.  जोरदार पावसाने पूर्वहंगामी कपाशीचे नुकसान  तळोदा तालुक्‍यातील बोरद, प्रतापपूर, गोपाळपूर, रांझणी, मोड, आमलाड आदी गावांमध्ये पूर्वहंगामी कापसाचे पीक ओढ दिल्यानंतर आलेल्या जोरदार पावसाने खराब झाले आहे. चिनोदा, बोरद भागातील डाळिंब, पपईच्या पिकात फूलगळ झाली आहे. आता पाऊस हवा आहे. मात्र आणखी १५ दिवसांनंतर पाऊस आला तर पूर्वहंगामी कपाशीच्या कैऱ्या सडतील, अशी स्थिती आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.... -------------------------------- आमच्या भागातील डाळिंब व पपईच्या पिकात फूलगळ सुरू आहे. सातपुडा पर्वतालगतच्या गावांमध्ये पर्जन्यमान बरे आहे. पूर्वहंगामी कापूस लवकरच वेचणीला येईल. पण त्याला आताच पावसाची गरज आहे. नंतर पाऊस आला तर कैऱ्या सडून नुकसान होईल.  - विजय जीवन मराठे,  शेतकरी, बोरद, ता. तळोदा

जून व जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याने मूग, उडीद, ज्वारी ही पिके हातची गेली. आता १५ दिवसांपासून पाऊस नाही. पिकांची स्थिती नाजूक आहे. रब्बी हंगामाबाबतही आशादायी चित्र नाही.  - सुरेश पाटील,  शेतकरी, होळ, ता. नंदुरबार

आमच्याकडे ऊस, सोयाबीन, मका ही पिके अधिक आहेत. पर्जन्यमान बरे दिसत असले तरी खांडबारा भागात पाऊस फारसा नाही.  - ईश्‍वर गावित,  शेतकरी. विसरवाडी, ता. नवापूर

पाऊस नसल्याने मिरचीच्या पिकात फूलगळ होत असून, पानेही काहीशी गळत आहेत. त्यावर कीडनाशकांच्या फवारण्या घेतल्या, पण उपयोग होत नाही. आमच्या गावात पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होत आहे.  - कैलास दशरथ पाटील,  शेतकरी, बामडोद, ता. नंदुरबार

आमच्या भागात कापूस, पपईचे पीक अधिक आहे. पण त्याला पावसाशिवाय चांगली फळ, फूलधारणा होताना दिसत नाही. रोगराईदेखील वाढत असून, फवारण्यांसाठी अधिकचा खर्च करावा लागत आहे.  - भिका लक्ष्मण पाटील,  शेतकरी, औरंगपूर, ता. शहादा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com