हरभरा मळणीला मंजूरटंचाईचा फटका

हरभरा मळणीला मंजूरटंचाईचा फटका

जळगाव : जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र सर्वाधिक होते. पेरणी अधिक होती म्हणून मजूरटंचाईही जाणवू लागली आहे. त्यातच हरभरा मळणीची मजुरी एकरी ३२०० रुपयांवर पोचली आहे. 

परंपरेनुसार एकरी ४० किलो हरभरा एक एकर कापणी व गोळा करण्यासाठी मजूर यंदा घेत आहेत. तर मळणीसाठी १५० रुपये प्रतिक्विंटल, असा दर मळणी यंत्रचालक घेत आहेत. ४० किलो हरभरा किमान १८०० रुपयांचा आहे. तर बागायती क्षेत्रात सरासरी आठ क्विंटल उत्पादन येत असून, आठ क्विंटल हरभरा मळणीसाठी १२०० रुपये खर्च लागत आहेत. तर एका क्विंटलमागे मळणी करताना मजूर शेतातच आणखी चार किलो हरभरा शेतकऱ्याकडून घेतात. प्रचलित दरांनुसार हा चार किलो हरभरा १४४ रुपयांचा आहे. अर्थातच हरभरा कापणी, तो गोळा करणे व नंतर मळणी यासाठी सुमारे ३२०० रुपये किमान खर्च शेतकऱ्यांना येत आहे. 

रावेर हा केळीचा पट्टा असला तरी यंदा या भागात मक्‍याऐवजी कमी पाणी व कमी खर्चाचे पीक आणि पुढे केळी लागवडीसाठी चांगले बेवड मिळते म्हणून हरभरा पिकाला पसंती दिली होती. यावल, चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव या भागातही रब्बी पिकांमध्ये हरभऱ्यालाच पसंती दिली होती. यंदा सुमारे ९० हजार हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली होती.

काबुली प्रकारच्या हरभऱ्याची पेरणी चोपडा, रावेर भागात अधिक झाली होती. आजघडीला अपवाद वगळदा हरभरा कापणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही भागात फक्त मळणी राहिली आहे. परंतु येत्या १० ते १२ दिवसांत जिल्हाभरात हरभरा मळणीचे काम पूर्ण होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

हरभरा मळणीसाठी पंजाबी किंवा मोठ्या हार्वेस्टरचा उपयोग करता येत नाही. लहान प्रकारातील मळणी यंत्रांचाच उपयोग करावा लागतो. त्यातच मळणीयंत्रचालकही वेळेवर मिळत नसल्याने मळणीला विलंब होत आहे. काही शेतकऱ्यांचा हरभरा कापणी व गोळा करून सहा-सात दिवस झाले, परंतु त्यांना मळणीसाठी यंत्र उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा जादा दर देऊन मळणी  करून घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. 

सध्या ढगाळ वातावरण असल्याने मळणीसंबंधी आणखीच अडचणी येत आहेत. ढगाळ वातावरण अधिक असल्याने यंत्रचालक शेतात येण्यास नकार देतात. कारण पाऊस आला तर कामाचा खोळंबा होईल आणि थोडा अधिक पाऊस असला तर यंत्र शेतातून बाहेर येणार नाही, ते चिखलात रुतेल. ज्या शेतकऱ्यांनी मळणी करून घेतली आहे, त्यांना दरांची प्रतीक्षा आहे. शासकीय खरेदी केंद्र अजूनही सुरू झालेले नसल्याने अडचणी अधिक वाढल्या आहेत, असे शेतकरी विलास देवकर (मुक्ताईनगर) यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com