दुधाला तर सोडाच, कष्टालाही किंमत उरली नाही

दुधाला तर सोडाच, कष्टालाही किंमत उरली नाही
दुधाला तर सोडाच, कष्टालाही किंमत उरली नाही

सोलापूर ः "स्वतःचं शेत नाही, विकतचा चारा घेऊन दूध व्यवसाय करतो. उधारीवर एकेक लाखाच्या तीन गाई घेतल्या, पाच-सहा महिनेच झालेत, पण दूधाला मिळणाऱ्या १७ रुपयांच्या दरावर हे तीन लाख फेडायचे कसे, कावळा बसायला अन फांदी तुटायला, अशी अवस्था झालीय बघा, पार बुडालोय, दुधाला तर नाहीच, कष्टालाही किंमत उरली नाही. पण मुक्‍या जित्राबात जीव अडकतोय काय करणार,'' अशा आर्त स्वरात मोहोळ तालुक्‍यातील सावळेश्‍वर येथील हनुमंत चटके आपली व्यथा सांगत होते. त्यांच्या परिसरातील अन्य शेतकऱ्यांचेही प्रश्‍न काहीसे असेच आहेत. पण दुधाला दर नाही, आमचं कसं होणार हा मात्र सगळ्यांचा समान प्रश्‍न, त्यांच्या बोलण्यातून आणि चेहऱ्यावरून चिंता दाखवत होता.  

जिल्ह्यातील पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, माळशिरस, मंगळवेढा या पट्ट्यात दूध व्यवसाय चांगलाच तेजीत असतो. पंढरपूर, माढा, माळशिरस या ऊस पट्ट्यात तर प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई आणि म्हशींचे गोठे हमखास दिसतातच. पण अलीकडच्या काही वर्षांत उसाला मिळणारा दर आणि अन्य पिकांच्या बेभरवशामुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादनाकडे शेतकरी अधिक वळले आहेत. पण यंदाच्या वर्षी सरकारच्या दुर्लक्षामुळे या व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकऱ्यांचा पुरता घात करून टाकला आहे. गेल्या दहा वर्षांत दूध व्यवसायाची वाताहत झाली नाही, एवढी वाताहत या वर्षी झाली आहे, याच आपत्तीला बळी पडलेले सावळेश्‍वरमधील हनुमंत चटके या दूध उत्पादकाची ही प्रातिनिधिक व्यथा बरंच काही सांगून जाते. 

सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्‍वर पंचक्रोशीत जवळपास पाच ते सहा दूध संस्था आहेत. जवळपास तीन हजारांहून अधिक लिटर दुधाचे रोजचे संकलन या भागातून होते. श्री. चटके यांना स्वतःचं शेत नाही, पण घर चालवण्यासाठी विकतचा चारा घेऊन दूध व्यवसाय करावा म्हणून गावातील एका खासगी डेअरी मालकाकडून उचल घेऊन सहा महिन्यांपूर्वीच प्रत्येकी एकेक लाखाच्या तीन गाई घेतल्या आहेत. दोन्ही वेळेला एक गाय १२ ते १५ लिटर दूध देते. दुधाला गाई चांगल्या आहेत. पण दूध दरामुळे अडचण झाली आहे. सध्या प्रतिलिटर १८ ते २० रुपयांचा दर मिळतो. पण मिळणारा दर आणि खर्च जाऊन उरणारे पैसे याचा मेळ बसत नाही. 

महिन्याकाठी २५ हजार रुपये मिळतात, त्यात चारा, पाणी व अन्य असा १५ हजारांचा खर्च होतो. उरलेल्या दहा हजारांत उचल घेतलेले पैसे द्यायचे की घर चालवायचे, असा प्रश्‍न त्यांना पडतो. कष्टाला किंमत उरलेली नाही, पण काय करायचं जित्राबात जीव अडकलाय, असे चटके सांगतात, तेव्हा आपल्याही जिवाला चटका लागतो. 

सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्था (दूध पंढररी) आणि शिवामृत दूध उत्पादक संस्था (अकलूज, माळशिरस) हे दोन्ही मोठे सहकारी दूध संघ आहेत. त्याशिवाय लोकमंगलसह अन्य काही खासगी दूध संघांमार्फत दुधाचे संकलन होते. जिल्हा दूध संघाचे रोजचे संकलन दीड लाख लिटरपर्यंत आहे. तर खासगी संघाचे सुमारे आठे ते लाखापर्यंत आहे. पण या संकलनात आता मोठी घट आणि तूटही येऊ लागली आहे. दुसरीकडे पशुखाद्य, ओला, सुका चाऱ्याचे दर आणि मजुरी यांच्या दरातही मोठी तफावत आढळून येते. परिणामी गाई, म्हशींना अपेक्षित खाद्य  देण्यातही शेतकरी कमी पडत आहेत. त्यातच आता पाणीटंचाईही भर टाकत आहे. कात्रीत सापडलेल्या सुपारीसारखी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. 

अवघ्या ६५ रुपयांची कमाई गोपालकृष्ण गावडे यांच्याकडे १२ गाई आहेत. त्यापैकी एका गाईचा रोजचा खर्च आणि उत्पन्न याचा मेळ घालता, एका गाईला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस सरकी पेंड, भुस्सा याचा १०० रुपये आणि मका, कडवळ अशा वैरणीचा ७० रुपये खर्च येतो. याप्रमाणे साधारण १७० रुपये खर्च होता, त्याशिवाय इतर खर्च २० रुपये धरून एकूण १९० रुपये त्यांचा सरासरी खर्च होतो, ही गाय प्रतिदिन १५ लिटर दूध देते, १७ रुपयांचा प्रतिलिटरचा दर गृहीत धरता २५५ रुपये होतात, १९० रुपयांचा खर्च वजा जाता ६५ रुपये त्यांच्या हातात पडतात, रोजंदारीच्या मजुराएवढीही मजुरी त्यातून मिळत नाही, मग कसा दूध व्यवसाय करायचा, असा प्रश्‍न गावडे करतात. बहुतेक दूध उत्पादकांचे गणित थोड्या फार फरकाने असेच आहे. 

ना नफा, ना तोटा तत्त्वावर रुपयाचा जादा दर सावळेश्‍वरमधील ब्रह्मनाथ दूध संकलन केंद्राने आपल्या स्वतःची परदरमोड करून सरकारच्या मदतीची अपेक्षा न करता आपल्या पातळीवर अन्य दूध संस्थांपेक्षा एक रुपया जादा देण्याचे ठरवले आहे. तसा फलक गावाच्या चौकात लावला आहे. एक रुपयाने फारसा फरक पडणार नसला, तरी जेवढे शक्‍य आहे, तेवढे तर करू, असे संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ गावडे यांनी सांगितले. 

आम्ही दुधाला ६०-७० रुपये द्या, असे म्हणतच नाही, पण खर्च वजा जाता कुटुंबातील एकाला दिवसाची मजुरी मिळावी, अशी साधी अपेक्षा आहे. गाईच्या दुधाला प्रतिलिटर किमान ४० रुपये आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर ५० रुपये दर दिल्यास हे गणित जुळू शकते. पण सरकार २७ रुपये देण्याचे जाहीर करूनही ते देऊ शकत नाही. आता तर १७ रुपये दर मिळतो, १० रुपयांची ही तूट कशी भरायची, शेतकऱ्यांनाही दर देताना आम्हाला अडचण होते.    - हरिदास गावडे, चेअरमन, ब्रह्मनाथ दूध उत्पादक सहकारी संस्था, सावळेश्‍वर  

घरची वैरण आहे, म्हणून चाललंय, नाही तर कशी सांभाळायची जनावरं हा प्रश्‍न होता. दहा वर्षे झाली, हा व्यवसाय करतो, पण यंदा दुधाचे दर बरेच पडले आहेत. उत्पादन आणि उत्पन्नाचा मेळ बसत नाही. पाणी, चाऱ्याचे प्रश्‍नही आहेतच.   - संतोष आमले, दूध उत्पादक, सावळेश्‍वर

दुधाचे उत्पादन आणि मिळणारा दर, याचा मेळ अजिबात बसत नाही, दहा वर्षे झाली, हा व्यवसाय करतो, गेल्या दहा वर्षांत दूध व्यवसायाची एवढी वाताहत कधीच पाहिली नाही, दूध दर तर पडले आहेतच, पण पशुखाद्याचे दरही काही स्वस्त राहिलेले नाहीत, त्यांचे दरही वर्षाला वाढतच आहेत, सरकारने गांभीर्याने याकडे पाहिले पाहिजे.  - गोपालकृष्ण गावडे, दूध उत्पादक, सावळेश्‍वर  

आमच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांना शेतीला दूध व्यवसाय चांगला पूरक व्यवसाय होऊ शकतो. मी तर शेत नसतानाही गाई करण्याचे धाडस केले. विकतचा चारा-पाणी करून गाई सांभाळतो. पण आता चूक झाल्यासारखे वाटते. पण काय करणार? पर्याय नाही. सरकारने तातडीने यातून मार्ग काढला पाहिजे, अन्यथा आम्ही उद्‍धवस्त व्हायला वेळ लागणार नाही. - हनुमंत चटके, दूध उत्पादक, सावळेश्‍वर

माझ्या दोन गाई आहेत. दूध बी चांगल्या देत्यात, पण आता पुरतं घाईला आणलंय. पाण्याची परिस्थिती बरी हाय, पण वैरणीनं घाईला आणलंय, त्यात आता हे दराचं काय चाललंय कुणास ठाऊक, १७ रुपयं कुठं दर असतोय काय? पाण्याची बाटली २० रुपयाला मिळती, आमचं दूध १७ रुपये चेष्ठा लावलिया सरकारनं?  - पांडुरंग सोनटक्के, दूध उत्पादक, सावळेश्‍वर  

माझ्याकडे ३० गाई आहेत, गेल्या दोन वर्षांपासून मी या व्यवसायात आहे. यंदाच्या वर्षी दूध दर बरेच पडले आहेत. उत्पादन खर्च आणि मिळकत, याचं गणित जुळत नाही. नफा तर दूरच राहिला. दूध व्यवसाय अत्यंत महत्त्वाचा आणि ताजं चलन देणारा व्यवसाय आहे, या व्यवसायाची ही वाताहत म्हणजे शेतकऱ्यांची वाताहत आहे. ती थांबली पाहिजे.

- मिलिंद देशपांडे, दूध उत्पादक, सावळेश्‍वर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com