कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवा

सर्व्हर डाउन, फिंगरप्रिंट, आधार कार्डसाठी आम्हाला सातत्याने अडचणी आल्या. वेळेत हे काम पूर्ण होईल असे वाटत नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या अर्जासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ मिळण्याची गरज आहे. - चंद्रशेखर दिवटे, शेतकरी, मैंदर्गी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
रजापूर येथील सुविधा केंद्रावर कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी आलेले शेतकरी
रजापूर येथील सुविधा केंद्रावर कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी आलेले शेतकरी

 राज्य शासनाने शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आणि १५ सप्टेंबर आॅनलाइन अर्ज भरण्यास सांगितले. मात्र सर्व्हर डाउन, कागदपत्रांची जंत्री, आधार क्रमांक नमूद न होणे, बोटांच्या ठशांचा प्रश्न, केंद्रांवरील गर्दी आणि त्यातच गटसचिवांचे आंदोलन यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाइन अर्ज भरताना अनेक अडचणी आल्या. अर्ज करण्याची अंतिम मुदत दोन दिवसांवर आली तरीही सेवा केंद्रांबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा कायम आहेत. मुदत वाढवून न दिल्यास हजारो शेतकरी अर्ज भरू शकणार नाहीत. त्यामुळे अर्जाची नोंदणी व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि अर्जातील दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांसह संघटनांनी केली आहे. सर्वत्र अर्ज प्रक्रिया गतीने सुरू असल्याने अनेक केंद्रावर सातत्याने सर्व्हर डाऊन, अंगठा मॅच न होणे यासारख्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अर्जाची नोंदणी कमी होत आहे. नोंदणीचे पैसे घेतले जाऊ नयेत याबाबत आदेश असूनही झेरॉक्‍स नावाखाली पैसे घेण्याचे प्रकार सुरू आहेत. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत दोन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज मुदतीत करण्यासाठी धावपळ सुरू आहे. सातारा जिल्ह्यात केंद्रांवर शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख २४ हजार ४२१ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. पण अजूनही सुमारे २१ हजार शेतकरी रांगेत आहेत. नाशिक जिल्ह्यात दोन लाख ५९ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले असून, ७५ हजारांपेक्षा अधिक शेतकरी निकष आणि तांत्रिक गोंधळामुळे वंचित  राहण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात अद्याप ३४ हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज दाखल झालेले नाहीत. त्यामुळे पुढील दोन दिवसात ३४ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज कसे भरणार हा प्रश्न बाकी आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात शनिवार (ता.९) अखेरपर्यंत २५ लाख १२ हजार ९२५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ११ लाख ९८ हजार ९७७ शेतकऱ्यांचे अर्ज परिपूर्ण असल्याची माहिती समोर आली होती.  नागपूर जिल्हयात ८५ हजार शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून त्यापैकी आजवर ७५ हजारावर शेतकऱ्यांनी या संदर्भाने ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण केली आहे. वर्धा, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या सातही जिल्ह्यात हा आकडा ८५ ते ९० हजार शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातील १० टक्के शेतकऱ्यांनी अर्ज भरण्याचे राहिले आहेत. त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार राज्यभरात लाखो शेतकऱ्यांनी अद्यापही अर्ज भरले नाही. आॅनलाइन नोंदणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांनी प्रक्रिया पुर्ण केलेली नाही त्यामुळे विहित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करणे अशक्या आहे. त्यामुळे अर्ज भरण्याला मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पात्र-अपात्रमुळे अस्वस्थता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्जमाफीसाठी करण्यात आलेल्या अर्जात दहा लाख शेतकरी बोगस असल्याचे विधान केले होते. या विधानामुळे कर्जदार शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. आपण केलेला अर्ज बरोबर आहे, त्याची नोंदणी बरोबर आहे, निकषात आपण पात्र आहे, याबाबत शेतकऱ्यांच्या मनात द्विधा स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी प्रतिक्रिया कर्जमाफीचे अर्ज भरण्यास सर्व्हर डाउनच्या अडचणी येत असल्याने बराच वेळ जात आहे. शासनाने त्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी आमची मुख्य मागणी आहे. खासगी केंद्रावर शंभर ते दीडशे रुपये घेत आहेत. - सचिन खोपडे, शेतकरी, वडगाव डाळ, ता. भोर, जि. पुणे

जिल्ह्यातील डिजिटल यंत्रणा, ग्रामीण भागातील संथ इंटरनेटसेवा यामुळे सर्व पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज मुदतीत भरणे शक्‍य नाही. अर्ज भरण्यास आणखी १० दिवस मुदतवाढ दिली जावी. - अजय बसेर, शेतकरी, जळगाव खुर्द (जि.जळगाव)

निकषाची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागत आहे. ऑनलाइन यादी पाहावी लागते हे अनेकांना माहितीच नाही. त्यासाठी शासनाने मुदत वाढवून विशेष मोहीम राबवावी. - आप्पासाहेब भोईटे, सिरसदेवी ता. गेवराई, जि. बीड

कर्जबाजारी सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. याउलट धनदांडग्यांना सवलतीसाठी हे सरकार तत्पर राहते. ऑनलाइन प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार नसल्याने सरकारने या प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी. - संजय सत्येकार, शेतकरी, कन्हान, जि. नागपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com