दूध व्यवसायाने कोंडी केलीय...!

सामनगाव, जि. नगर : बळीराम काळे तोट्यातील दूध व्यवसायाबद्दल व्यथा मांडताना त्यांच्या चेहऱ्यावर दुधाला दर नसल्याची हतबलता दिसत होती. (छायाचित्र : सूर्यकांत नेटके)
सामनगाव, जि. नगर : बळीराम काळे तोट्यातील दूध व्यवसायाबद्दल व्यथा मांडताना त्यांच्या चेहऱ्यावर दुधाला दर नसल्याची हतबलता दिसत होती. (छायाचित्र : सूर्यकांत नेटके)

नगर : ‘‘आजोबांपासून दूध धंदा जोपासला, शेतीला जोड म्हणून धंद्यात विस्तार केला. बरं चाललं होतं; पण सहा महिन्यांपासून धंद्याने कोंडी केलीय; पण इलाज नाही. दर मिळत नसल्याने धंदा ठेवावा की मोडून टाकावा वाटतो, पण धाडस होत नाही. सध्या दूध व्यवसाय मिळणाऱ्या दरामुळे तोट्यात नेत असतानाही दावणीची जनावरं जगवायची म्हणून धंदा सुरू ठेवलाय, पण अशीच परिस्थिती राहिली तर नाईलाज होईल,’’ दुधाला दर नसल्याने हतबल झालेले देहेरे (जि. नगर) येथील शेतकरी व्यथा मांडताना त्याची हतबलता स्पष्ट दिसत होती.

ऊस आणि बागायतदाराचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्हामध्ये शेतीला जोड धंदा म्हणून दूध व्यवसाय वर्षानुवर्षे जोपासला जात आहे. मात्र गेल्या सहा-सात महिन्यांपासून दुधाचे दर वाढण्यापेक्षा वरचेवर कमी होत आहेत. त्यामुळे दूधव्यवसाय अडचणीत येत आहे. सरकारने शेतकरी संपावेळी घोषणा केली, मात्र अंमलबजावणी झाली नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर दूध व्यवसायिकांच्या व्यथा जाणल्या. दुधाला दर मिळत नसल्याने प्रत्येक व्यावसायिक हतबल आहेत.

देहरे (जि. नगर) येथील दूध व्यावसायिक दुधाला दर नसल्याने हतबलता होती. ‘‘आजोबापासून आम्ही दूध व्यवसाय जोपासला, सुरवातीला चार गायी होत्या,  त्यात विस्तार करून आता अठरा केल्या. बंदिस्त गोठा होता, कर्ज काढून मुक्त गोठा केला. घरासाठी, दूध व्यवसायाच्या विस्तारासाठी कर्ज घेतले. चांगलं चाललं होतं सात महिन्यांपासून मात्र परिस्थिती बदललीय. दूध धंदा तोट्यात करतोय, असं वाटतं हा धंदा बंद करून रोजंदारीच्या  कामावर जावं; पण दावणीतली जनावरं काय करायची, त्यांच्यातून जीव निघत नाही. सारं घरदारं राबतं, तोट्यात का होईना, व्यवसाय जपतोय; पण परिस्थिती बदलली नाही. दर वाढले नाही तर दूध व्यवसाय उद्‌ध्वस्त होईल'' दूध व्यवसायाची परंपरा जपणारे तरुण शेतकरी मनोज करंडे हतबल होऊन व्यथा मांडत होते. दूध उत्पादकांच्या व्यथा... click video..

दुष्काळी पट्टा असलेल्या शेवगाव तालुक्‍यातील दूध उत्पादकांनी मागील सहा- सात वर्षांच्या काळातील दुष्काळात हार मानली नाही. संकटावर मात करत जनावरे जगवली. छावण्यांनी आधार दिला. दुधाला दर चांगला असल्याने दुष्काळातही परिस्थिती चांगली होती. आताच्या परिस्थितीचा विचार केला तर दूध व्यवसाय बंद करण्याची मानसिकता असल्याची भावना मांडताना सामनगाव, मळेगाव, बोधेगाव, अमरापूर भागातील दूध व्यवसायाला प्राधान्य देणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी तोट्यातील दूध व्यवसायामुळे हतबलता व्यक्त केली. 

रिती दावणं कशी पाहणार ‘‘गावांत जवळपास सगळेच शेतकरी दूध व्यवसाय करतात. कित्येक वर्षांपासून दारातली दावण जनावरे, गाई-म्हशींनी भरलेली. दुधाला दर नसल्याने जनावरे सांभाळणे आता अवघड झालंय. दूध धंदा बंद करावा वाटतोय, पण काय करणार रिती दावण कशी पाहणार? दारात जनावरं नसली तर सारं लुटून नेल्यासारखे वाटते; पण आज ना उद्या दुधाला दर मिळेल'''' अशी अाशा दूध उत्पादकांच्या बोलण्यातून दिसत होती.

एका गाईमागे दीडशे रुपये तोटा ‘‘कष्टातून दूध व्यवयाय करून कुटूंब सावरण्याचा अनेक तरुणांचा प्रयत्न आहे. सध्याचा व्यवयाय मात्र पूर्णतः तोट्यात नेणारा आहे. एक संकरित गाय भाकड काळ धरून साधारण दर दिवसाला बारा ते पंधरा लिटर दूध देते. सात किलो खुराक, दीडशे रुपयांचा चारा, रोजंदारी, दवाखान्याचा खर्च आणि इतर खर्च धरला तर आजच्या दूध दरानुसार शंभर ते दीडशे रुपये एका गाईमागे दर दिवसाला तोटा येत आहे,’’ बळीराम काळे यांनी एका जनावरामागच्या तोट्याचा हिशेब मांडतानाच ‘केवळ जनावरे जगली तर पुढच्या काळात परिस्थिती सुधारेल’ असा आशावादही व्यक्त केला.   

सत्ताधारी आणि विरोधकही जबाबदार संघर्षातून दूध व्यवसाय उभा करणारे नवनाथ करंडे यांनी तर थेट सत्ताधारी आणि विरोधकांवरही संताप व्यक्त केला. ‘‘सरकार लक्ष देत नाहीच; पण विरोधकांनाही दूध व्यावसायिकाला काहीच मदत केली नाही. त्यांचेच दुधाचे धंदे, त्यामुळे दर मिळू नये म्हणून सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही हात आहे. या लोकांनी दूध व्यावसायिकाला देशोधडीला लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दूध व्यवसायाला वाचवण्याची गरज आहे.’’ शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय केला जातो. तोट्यातील शेतीला दूध व्यवसायाने वाचवले, आता दूध व्यवसायलाच वाचवण्याची गरज आहे. सरकारने दखल घेऊन दरवाढ केली नाही, तर शेतकरी आणि पर्यायाने शेती उद्‌ध्वस्त होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सध्या दुधाला मिळणारा दर नफा देणारा नाही. सात ते आठ महिन्यांपासून दर वरचेवर कमी होत आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय करत असून अनेकांचे घर-संसार त्यावर अवलंबून आहे. किती दिवस तोटा सहन करणार? सरकारने दर वाढवले पाहिजेत. अन्यथा व्यवसाय मोडकळीस येईल. घर चालवण्याचे आर्थिक नियोजन कोलमडेल. - विजय लांडगे, दूध संकलन केंद्र चालक, देहरे, (जि. नगर) 

दहा वर्षांपासून दुधासाठी जनावरं सांभाळलीत. मधल्या चार- पाच वर्षांच्या काळात दुष्काळ होता, चारा, पाण्याची टंचाई असतानाही हिम्मत धरून दुभती जनावरं पोसली. आता मात्र दुष्काळापेक्षाही वाईट परिस्थिती झालीय. दुधाला दर मिळेल की नाही याची खात्री नाही; पण चांगले दिवस येतील एवढ्याच आशेवर जनावरं तोट्यात सांभाळतोय. - बळीराम काळे, सामनगाव, ता. शेवगाव

आजचे दिवस बदलतील आणि चांगले दिवस येतील एवढ्याच आशेवर दूध व्यवसाय अनेक शेतकऱ्यांनी सुरू ठेवलाय. थेट ग्राहकाला दूध देण्याचा मात्र चांगला फायदा आहे. मधली साखळी कमी होते. शेतकऱ्यांना बरे पैसे मिळतात, ग्राहकाला कमी पैशाच दूध मिळते. सरकारने मोठ्या शहरात थेट दूध विक्री करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि किमान २७-३० रुपये हमी दर मिळावा. -  ज्ञानदेव मोहन जाधव, लोळेगाव, ता. शेवगाव

औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा निर्णय योग्य

दुधाला सत्तावीस ते तीस रुपये दर मिळाल्याशिवाय धंदा परवडणारा नाही. बारा गाई होत्या, वाढ करून सतरा केल्या, आता दर नसल्याने पश्‍चाताप आल्यासारखा होतोय. शेतकऱ्यांनी अांदोलन केले की, सरकार तेवढ्यापुरते अाश्‍वासन देऊन गप्प करतात. सात-आठ महिन्यांपासून परिस्थिती सुधारली नाही. सरकार शेतकऱ्यांकडून अठरा ते वीस रुपयांनी घेतलेले दूध लोकांना चाळीस- पन्नास रुपये लिटरने विकले जातेय. जर मातीमोल दराने दूध विकावे लागत आहे. त्यापेक्षा फुकट देणे काय वाईट, लेकराबाळांना आशीर्वाद तरी लागतील. औरंगाबाद जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी घेतलेले निर्णय योग्य आहे. यापेक्षा दूध उत्पादक वेगळं तरी काय करणार? - सुनील निकम, मळेगाव, ता. शेवगाव  

...त्यांचे दर कसे कमी होत नाहीत

शेतकऱ्यांच्या दुधाला दर द्यायला सरकारला परवडत नाही. मात्र नगर जिल्ह्यासह राज्यभरात अनेक दूध संघ, संस्था दुधावर प्रक्रिया करून उपपदार्थ तयार करतात. त्याचे दर मात्र कधीच कमी झालेले दिसत नाहीत. असं का होतेय, दूध जर कमी दराने मिळत असेल तर उपपदार्थाचे दर कमी व्हायला पाहिजेत. सात- आठ महिन्यांत तसं झालेलं दिसत नाही. सरकारने दूध उत्पादकांनाच छळायचं ठरवलयं का?  - ज्ञानेश्‍वर वावरे, वरुर, ता. शेवगाव  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com