परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात दूध संकलनात वाढ

परभणी ः शासकीय दुग्ध शाळेतील दूध दररोज टॅंकरद्वारे अन्य ठिकाणी नेले जाते. (छायाचित्र ः माणिक रासवे)
परभणी ः शासकीय दुग्ध शाळेतील दूध दररोज टॅंकरद्वारे अन्य ठिकाणी नेले जाते. (छायाचित्र ः माणिक रासवे)

परभणी : शासकीय दूध योजनेअंतर्गत येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात गतवर्षीच्या फेब्रुवारीच्या तुलनेत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ९ लाख ९७ हजार २५७ लिटर दूध संकलन झाले. सध्या परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांतून प्रतिदिन ४० हजार लिटर दूध संकलन होत आहे. उत्पादन वाढल्यामुळे दूध शीतकरण केंद्रावरील यंत्रसामग्री अपुरी पडत आहे.

उत्पादनात वाढ होत असल्यामुळे परभणी येथील दुग्धशाळेचे बळकटीकरण करून दुधापासून दूध भुकटी, दही, ताक, तूप, पनीर आदी उपपदार्थनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक आहे. शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्धशाळेत परभणी, हिंगोली, नांदेड या तीन जिल्ह्यांतील दूध संकलित केले जाते. 

सध्या परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात २७ दूध उत्पादक सहकारी संस्था, पाथरी तालुक्यात ३१, गंगाखेड तालुक्यात ३० आणि हिंगोली जिल्ह्यात ७ अशा दोन जिल्ह्यांत एकूण ९५ दूध उत्पादक सहकारी संस्था कार्यरत आहेत. याशिवाय नांदेड येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रातील दूधदेखील परभणी येथील दुग्धशाळेत आणले जाते. या तीन जिल्ह्यांतून गतवर्षीच्या फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन सरासरी १७,८१५ लिटर याप्रमाणे एकूण ४ लाख ९८ हजार ८२९ लिटर दूध संकलन झाले होते. यामध्ये दुपटीहून अधिक वाढ झाली असून, यंदाच्या फेब्रुवारीमध्ये प्रतिदिन सरासरी ३५,६१६ लिटर याप्रमाणे ९ लाख ९७ हजार २५७ लिटर दूध सकंलन झाले आहे.

अनियमित पावसाचा विविध पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. शेतीपिकांच्या उत्पादनात सातत्याने विविध कारणांनी घट येत आहे. या परिस्थितीत उत्पन्नाचा पर्यायी स्रोत म्हणून अनेक शेतकरी शेतीपूरक दूध व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दूध संकलन वाढले आहे. विशेषतः २०१७ चा खरीप हंगाम वाया गेलेल्या पाथरी तालुक्यातील दूध संकलनात मोठी वाढ झाली आहे. गतवर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पाथरी तालुक्यात प्रतिदिन सरासरी ५ हजार ९३१ लिटर याप्रमाणे एकूण १ लाख ६६ हजार ०५७ लिटर एवढे संकलन झाले होते. 

यंदा दूध संकलनात जवळपास तिपटीने वाढ झाली असून, प्रतिदिन सरासरी १३ हजार ३३१ लिटर याप्रमाणे एकूण ३ लाख ७३ हजार २७० लिटर दूध संकलन झाले. पाथरी येथील शीतकरण केंद्रामधील बल्क कूलरची दररोज ४ हजार लिटर साठविण्याची क्षमता आहे. उत्पादन वाढल्यामुळे दूध साठविण्यासाठी अडचणी येत आहेत. दूध उत्पादक सहकारी संस्थानी संकलित केलेले दूध परभणी येथे न्यावे लागत आहे. वाहतूक खर्चाचा भुर्दंड बसत आहे. तसेच वाढत्या तापमानामुळे दुधाची नासाडी होत आहे.

परभणी येथील शासकीय दुग्धशाळेत पॅकिंग युनिट तसेच दूधापासून दूध भुकटी, अन्य उपपदार्थनिर्मितीचा प्रकल्प नाही. त्यामुळे दररोज परभणी येथून दूधाचे टॅकर मुंबई, पुणे या ठिकाणी पाठवावे लागतात. सध्या वारणानगर येथे टॅंकरने दूध पाठविले जात आहे. दुध उत्पादनातील वाढ लक्षात घेऊन पॅकिंग युनिट, दुध भुकटी, दही, ताक, तूप, पनीर आदी उपपदार्थनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्यासाठी परभणी येथील दुग्धशाळेचे बळकटीकरण करावे लागणार आहे. त्यासाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी लागेल.

परभणी शासकीय दुग्धशाळा तुलनात्मक दूध संकलन स्थिती (लिटर)

दूध शीतकरण केंद्र  २०१७    २०१८
परभणी  १,१७,४३१    २,६१,७६९
पाथरी   १,६६,०५७ ३,७३,२७०
गंगाखेड  १,०१,६४१ १,५४,२५५
हिंगोली  ३६,६१३  १,०२,९१४
नांदेड      ७७,०८७    १,०५,०४९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com