agriculture news in Marathi, agrowon, milk producers of pune in Trouble | Agrowon

‘जीव जाईना म्हणून हातपाय खुडायचे’
अमोल कुटे
गुरुवार, 10 मे 2018

पुणे ः भाजीपाला करावा, तर त्याला बाजार नाही. काढून टाकण्यासाठी खर्च वाढू नये म्हणून उभ्या मालात शेळ्या मेंढ्या सोडाव्या लागल्या. शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही. दूध व्यवसाय जरा व्यवस्थित होता. त्यावरही आता गदा आली असून, दूध दराची अशी परवड झाली आहे. महागाईमुळे खर्च वाढतच आहेत. दुधाचा भाव पडल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण काठावर आले आहे. दुग्ध व्यवसाय एकदा मोडला तर परत उभा राहणार नाही. त्यामुळे ‘जीव जाईना म्हणून हातपाय खुडायचे’ अशी अवस्था असल्याची संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादक देत आहेत.
 

पुणे ः भाजीपाला करावा, तर त्याला बाजार नाही. काढून टाकण्यासाठी खर्च वाढू नये म्हणून उभ्या मालात शेळ्या मेंढ्या सोडाव्या लागल्या. शेतकऱ्यांना काहीच परवडत नाही. दूध व्यवसाय जरा व्यवस्थित होता. त्यावरही आता गदा आली असून, दूध दराची अशी परवड झाली आहे. महागाईमुळे खर्च वाढतच आहेत. दुधाचा भाव पडल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण काठावर आले आहे. दुग्ध व्यवसाय एकदा मोडला तर परत उभा राहणार नाही. त्यामुळे ‘जीव जाईना म्हणून हातपाय खुडायचे’ अशी अवस्था असल्याची संतप्त प्रतिक्रिया दूध उत्पादक देत आहेत.
 

शेतकऱ्यांपुढे अस्मानी, सुलतानी संकटे ‘आ’ वासून उभी अाहेत. यातच शेतमालाला भाव नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. भाजीपाल्यापेक्षा दुधाला किमान हमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती सोडून दुग्धोत्पादन हाच मुख्य व्यवसाय केला आहे. मात्र दुधाचे दर कोसळल्याने शेतकरी सर्व बाजूने कात्रीत सापडले आहेत. दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने जनावरे पाळणे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येण्याची भीती आहे.

जनावरे पाळण्यापेक्षा बाहेर मजुरी केली तरी जास्त पैसे मिळतात. मात्र वाडवडिलांनी वाढविलेला व्यवसाय आहे, जनावरांची आवड आहे, म्हणून तोटा सहन करूनही शेतकरी जनावरांना संभाळत आहेत.

जिल्ह्यातील दुधाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. विविध संस्थांकडून गाईच्या दुधाला प्रतिलिटर १७ ते २० रुपये तर म्हशीच्या दुधाला २७ ते ३५ रुपयांचा दर मिळत आहे. दूध हा नाशवंत माल असल्याने काहीही दर द्या मात्र दूध घेऊन जा, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पशुखाद्य, औषधांसह वाढत्या उन्हाळ्यामुळे ओल्या व सुक्या चाऱ्याचे दरही भडकले आहेत. 

पाणी, वीजबील यासाठीही खर्च करावा लागत आहे. दुधाचे दर वाढल्यानंतर पशुखाद्य, औषधांच्या किमती वाढतात. मात्र दुधाचे दर कमी झाल्यावर किमती कमी होत नाहीत. परिणामी उत्पन्न आणि खर्चातील तफावत वाढत आहे. सध्या दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. शेतकऱ्याचा दूध धंद्यापासून मिळणारा नफा पूर्णपणे बुडाला असून, दुधाला भाव नसला तरी जनावरांच्या पोटाला खाद्य द्यावेच लागते. जनावरे संभाळण्यासाठी पदरमोड करण्याची वेळ आली आहे. दिवसरात्र कष्ट करूनही हाती काहीच मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

5 सहकारी तर शंभराहून अधिक खासगी संस्थांकडून संकलन
जिल्ह्यात पाच सहकारी संघांकडून तसेच शंभर नोंदणीकृत संस्थांकडून दैनंदिन दुधाचे संकलन केले जाते. नोंदणी नसलेल्या स्थानिक खासगी खरेदी संस्थांची संख्याही अधिक आहे. सहकारी संस्थांमध्ये पुणे जिल्हा सहकारी दूध संघ कात्रज, बारामती सहकारी दूध संघ, सुभाषअण्णा कुल सहकारी दूध संघ, दौंड, मंगल सिद्धी दूध, इंदापूर, श्रीराज सहकारी संघ, भोर यांच्याकडून चार लाख ९१ हजार लिटर स्थानिक दूध संकलन होते. तर सोनाई, पराग डेअरी, डायनामिक, रियल डेअरी, सह्याद्री अॅग्रो, गायत्री कोल्ड स्टोरेज, सुरची, कुतवळ फुड्स, अनंत दूध, अमूल सटेलाईट, शथेभी अॅग्रो आदी प्रमुख खासगी संस्थांसह १०० नोंदणीकृत संस्थांकडून सुमारे १५ लाख ७३ हजार, तर शासकीय दूध डेअरीकडून १ लाख ५६ हजार लिटर असे एकूण २२ लाख २० हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते. उत्पादकांकडून थेट ग्राहकांना होणारी विक्री आणि इतर खासगी संस्थांकडूनही खरेदी होणारे दूधही याहून अधिक आहे.

राज्यातील एकूण दुधापैकी सुमारे ६० टक्के दूध संकलन करणाऱ्या खासगी दूध संस्थांवर सरकारचे नियंत्रण नाही. अशा वेळी सरकारने दुधाचे दर न ठरविता समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे. सहकारी संस्थांना दर देण्याची सक्ती केल्यास सहकार संपुष्टात येईल. राज्याबाहेरून येणारे दूध थांबविले तरी दूध दराचा प्रश्‍न सुटू शकेल. स्पर्धा थांबविण्यासाठी एक ब्रॅण्ड नाही, नियोजन नाही अशावेळी शासनाने वडीलकीची भूमिका घेतली पाहीजे.
- डॉ. विवेक क्षीरसागर, 
कार्यकारी संचालक, जिल्हा सहकारी दूध संघ पुणे.

दुधाला भाव नसल्याने उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फुकट जनावरे संभाळावी लागत आहेत. घरचा चारा असल्याने शेतकरी जनावरे सांभाळू शकत आहेत. तो खर्च धरला तर सध्या दूध धंदा खूपच तोट्यात आहे. दुधाला भाव मिळत नसल्याने गाईचे खरेदी विक्री व्यवहार मंदावले आहेत. गाईच्या किमतीमध्ये सुमारे २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. अशी स्थिती असली तरी आवड आणि अनेक वर्षांचा व्यवसाय आहे, म्हणून शेतकरी तोटा सहन करूनही जनावरे संभाळत आहेत.
- रामचंद्र पादीर, 
दूध उत्पादक शेतकरी, पिंपरी पेंढार, ता. जुन्नर
 

पूर्वानुभव पाहता दुधाच्या भुकटीला अनुदान दिले म्हणजे दुधाचे दर वाढतील ही शंका आहे. यातच भुकटीसाठी वापरण्यात येणाऱ्या तीस ते पस्तीस टक्के दुधाला अनुदान दिले तर उर्वरीत दुधाचे काय करणार हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. भुकटीसाठी बाहेरच्या राज्यातील दुधाचा वापर होतो, त्याला हे अनुदान मिळेल. दुधाला दर द्यायचे असतील, तर शेतकऱ्यांकडून घेतले जाणारे दूध आणि विक्रेत्यांना दिले जाणारे पिशवी बंद दूध यांच्या दरातील तफावत कमी केली पाहिजे. दुधाच्या पिशवीसाठी प्रतिलिटर सुमारे २० रुपयांपेक्षा अधिक नफा कमविला जातो. यातील निम्मा खर्च धरला तरी उर्वरीत रक्कम जाते कोठे यांचा विचार केला पाहिजे. काही लोक विक्रेत्यांना दहा लिटर दुधाला चार लिटर दूध मोफत देतात. हे प्रकार बंद केले तर शेतकऱ्यांना न्याय देता येईल.
- प्रकाश कुतवळ, ऊर्जा दूध.  
 

शेतमालाला भाव नाही. दुधामुळे शेतकरी कसाबसा तग धरून होता. मात्र दुधाला २७ ते २८ रुपये दर होते. ते आता उतरून २० रुपयांवर आले आहेत. पशुखाद्य, चाऱ्यासह इतर खर्च जाऊन हातात काहीच पडत नाही. या जनावरांपासून मिळणारे शेण विकूनही शेतकऱ्यांचा खर्च भागणार नाही. घरातील चार माणसे यासाठी दिवसरात्र काम करतात. त्यांच्या कष्टाचा तर विचारच करायचा नाही. शेतकरी सर्व बाजूने अडचणीत सापडला आहे. त्याची व्यथा ऐकणारा कोणीच नाही.
- संदीप हडवळे, राजुरी, ता. जुन्नर

दूध व्यवसाय खासगी संस्थांच्या ताब्यात गेला आहे. एक ब्रॅण्डच्या नुसत्या घोषणा होतात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सहकार मोडीत काढण्याचे लक्षण दिसत आहे. १९७६ सालापासून आमची डेअरी सुरू आहे. तेव्हापासून पाहिलं तर उन्हाळ्यात दुधाला वर्षभरातील सर्वाधिक दर मिळतो. मात्र यंदा दुधाचे दर पहिल्यांदाचा एवढे कोसळले अाहेत. गेल्या वर्षी आमच्या डेअरीने शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३१ रुपयांचा दर दिला होता. आता मात्र २० रुपये दर द्यावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांना तर पारावारच रहिलेला नाही, तरीही दूध धंदा परवडत नाही आणि सोडवतही नाही, अशी स्थिती आहे.
- गोविंदराव औटी, 
चेअरमन, गणेश डेअरी, राजुरी, ता. जुन्नर

आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे दर घसरल्यामुळे देशातून भुकटीची निर्यात होत नाहीये. भुकटीचे २४० रुपयांपर्यंत असलेले दर सध्या १४० रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांना दूध व्यवसाय परवडत नसल्याने जनावरे विकण्याची वेळ आली आहे. एकदा हा व्यवसाय मोडल्यावर पुन्हा उभा राहणे अवघड आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे. काही राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचे वाटप, दुधाची भुकटी दिली जाते. कर्नाटक, हरियाणा राज्यांमध्ये सरकार थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सबसिडी जमा करते. राज्य सरकारने अशी पावले उचलणे आवश्‍यक आहे.
- वैशाली नागवडे, 
माजी अध्यक्षा, महानंद, राज्य सहकारी दूध संघ.

पंधरा लिटर दूध देणाऱ्या गाईला सकाळी आणि संध्याकाळी मिळून आठ किलो खाद्य द्यावे लागते. वीस रुपये किलो दराप्रमाणे यासाठी १८० रुपये खर्च येतो. १२ किलो बार्लीसाठी ९६ रुपये, उसाचे वाढे, मका, घास, हत्ती गवत, कडबा, गहू भूस या खाद्यासाठी या खाद्यासाठी १९० रुपये, वैद्यकीय व इतर खर्च ५० रुपये असा सुमारे पाचशे रुपयांहून अधिक खर्च येतो. या गाईपासून दररोज १५ लिटर दूध मिळाले, तर २० रुपये लिटर दराप्रमाणे तीनशे रुपये शेतकऱ्याच्या हाती येतात. सध्या उत्पादक शेतकऱ्याला जनावरे संभाळण्यासाठी शारीरिक कष्टापोटी एक दमडीही न मिळता दोनशे रुपयांचा भार सोसावा लागत आहे.
- दत्तात्रय काकडे, 
आदर्श गोपालक, पिंपळवंडी, ता. जुन्नर
 

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...