केळी खरेदीसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : फिलिपिन्स व इक्वेडोर या जगातील आघाडीच्या केळी उत्पादक देशांमध्ये पनामा रोगाने धुमाकूळ घातल्याने उत्पादनावर परिणाम झाला. यासोबतच तेथील केळीचा जागतिक बाजारातील पुरवठा कमी झाल्याने केळी निर्यातदार बहुराष्ट्रीय किंवा बड्या कंपन्या प्रथमच महाराष्ट्रातील केळी उत्पादकांच्या दाराशी आल्या आहेत. आजघडीला देशातून रोज ४० कंटनेर केळीची आखाती देशांमध्ये निर्यात होत आहे. या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा अधिक असून, राज्यात जळगाव जिल्ह्यातून रोज सहा कंटनेर केळीची निर्यात आखातात होऊ लागली आहे.

आखाती राष्ट्रे केळीचे प्रमुख खरेदीदार देश आहेत. त्यात सौदी अरेबिया, बहरीन, इराण आदींचा समावेश आहे. त्यापाठोपाठ युरोपातही केळीचा पुरवठा जागतिक बाजारातून होतो. निर्यातीत फिलिपिन्स व इक्वेडोर हे देश आघाडीवर आहेत. परंतु तेथील केळीला पनामा या रोगाचा मोठा फटका बसला आहे. इक्वेडोरचे उत्पादन ४० टक्‍क्‍यांनी घटले आहे. तर फिलिपिन्समधील केळीला रोगराईचा फटका बसलाच, सोबत तेथील हंगाम अंतिम टप्प्यात आहे.

या सर्व बाबी भारतीय केळी उत्पादकांच्या पथ्यावर पडल्या असून, जागतिक बाजारातील केळीचा पुरवठा कायम टिकविण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात प्रथमच डोल, चिकिता या अमेरिकन केळी निर्यातदार किंवा खरेदीदार कंपन्या दाखल झाल्या आहेत. या कंपन्या इक्वेडोरमधील केळीवर अवलंबून होत्या, परंतु तेथील उत्पादन घटल्याने त्यांना भारताकडे यावे लागले आहे. 

देशातून सध्या रावेर व सावदा (जि. जळगाव), थेनी (तमिळनाडू), टेंभुर्णी (जि. सोलापूर), बडवानी (मध्य प्रदेश) आणि सीमांध्रमधील गोदावरी जिल्ह्यातून केळीची निर्यात होत आहे. देशातून रोज सुमारे ४० कंटनेर म्हणजेच ८०० मेट्रिक टन केळीची निर्यात होत आहे. या निर्यातीत महाराष्ट्राचा अधिक वाटा असून, रोज सुमारे १० कंटनेर केळी महाराष्ट्रातून आखाती राष्ट्रांमध्ये पाठविली जात आहे. जळगाव जिल्ह्यातून प्रतिदिन सहा ते सात कंटनेर म्हणजेच १८० मेट्रिक टन केळीची निर्यात होत आहे. 

अमेरिकन कंपन्यांसह एकदंत ॲग्रो, इकोफ्रेश, देसाई फ्रूट्‌स, आयएनआय, पीक ॲँड सर्व्ह या भारतीय कंपन्यादेखील केळीची निर्यात महाराष्ट्रातून करीत आहेत. कंटनेरमध्ये १३ किलोच्या बॉक्‍सचा उपयोग पॅकिंगसाठी केला जात आहे. जळगाव जिल्ह्यातील केळी मुंबई येथील न्हावाशेवा बंदरातून आखातात पाठविली जात असल्याची माहिती मिळाली. पुरवठा कायम राहावा यासाठी अलीकडेच अमेरिकेतील केळी निर्यातदार कंपन्यांनी रावेरातील केळी उत्पादक, पॅक हाउसचे संचालक यांच्यासोबत बैठकी घेतल्या आहेत.

पाकिस्तानमधील केळी निर्यात रखडत सुरू

रावेरातून पाकिस्तानमधील केळी निर्यातही सुरू झाली आहे. पाकिस्तानमधून सावदा व रावेर येथून रोज ८०० क्विंटल केळी तेथे पाठविली जात आहे. तेथून रोज तीन हजार क्विंटल केळीची मागणी आहे. परंतु वित्तीय व्यवहारांवरील निर्बंधामुळे एवढा पुरवठा होत नाही. सावदा येथील व्यापारी श्रीनगर (जम्मू काश्‍मिर) येथे बॉक्‍समध्ये केळी पॅक करून पाठवित आहेत. ट्रकमध्ये वाहतूक होत असून, १६ किलोचा बॉक्‍स केळी पॅकींगसाठी वापरला जात आहे. श्रीनगरातील व्यापारी पाकिस्तानात केळी पाठवितात व पाकिस्तानमधील खरेदीदार केळीच्या बदल्यात कापड, सुकामेवा पाठवित आहेत. वित्तीय किंवा थेट पैशांमध्ये पाकिस्तानशी व्यवहार होत नसल्याने मागणी असताना कमी पुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले.

केळीची महाराष्ट्रीतील निर्यात पुढे आणखी वाढेल. सध्या आगाव नवती बागा व पिलबागांमधून केळी उपलब्ध होत असून, तिला ऑनचे दरही मिळू लागले आहेत. अनेक दिवसानंतर केळीची मागणी अधिक व पुरवठा कमी, अशी स्थिती आहे. आखातात सर्वाधिक केळी निर्यात जळगाव जिल्ह्यातून होत आहे.  - बाबासाहेब आडमुठे, केळी निर्यातदार, कोल्हापूर

पनामा रोगामुळे इक्वेडोर व फिलिपिन्सच्या केळीला फटका बसला आहे. रावेरात प्रथमच बड्या कंपन्या केळी निर्यातीसंबंधी दाखल झाल्या आहेत. जागतिक बाजारात केळीची जेवढी मागणी आहे, तेवढा पुरवठा नाही. यामुळे केळीचे दर टिकून राहतील. सीमांध्रमधील केळीचा हंगाम संपला आहे. सध्या देशात तमिळनाडू व महाराष्ट्रात चांगली केळी उपलब्ध आहे.  - प्रशांत वसंत महाजन, महाजन बनाना एक्‍स्पोर्ट, तांदलवाडी (जि. जळगाव)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com