मोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानी साखर आणली

मोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानी साखर आणली
मोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानी साखर आणली

मुंबई ः देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या प्रमाणात विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात केली आहे. यामुळे साखरेचे दर कोसळणार असून याचा फटका साखर उद्योगांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाऊदऐवजी पाकिस्तानची साखर भारतात आणली, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. 

मुंबईतील गांधीभवन येथे ऊस उत्पादक शेतकरी व साखर उद्योगासमोरील अडचणी संदर्भात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकारपरिषदेला संबोधित करताना खा. चव्हाण म्हणाले, की देशात यावर्षी २५० लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा सरकारचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात यावर्षी ३२० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या प्रमाणात गोडाऊनमध्ये पडून आहे. यामुळे गेल्यावर्षी ४०-४२ रुपये प्रतिकिलो असणारे साखरेचे दर आता २५ ते २६ रुपये प्रतिकिलो रुपयांवर आले आहेत. 

दरातील घसरणीमुळे साखर उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग अडचणीत आला आहे. पुढच्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने पुढच्या तीन वर्षांसाठी साखर उद्योगासाठी धोरण तयार करावे ज्यात साखरेच्या निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. राज्य सरकारने ५० लाख टन साखरेचा बफर स्टॉक निर्माण करावा त्याचबरोबर व्याजाची प्रतिपूर्ती, साठवणूक शुल्क, विमा हप्ता आणि रखरखाव खर्च याची तरतूद करावी, इथेनॉलच्या किंमती वाढवाव्यात असे खा. चव्हाण म्हणाले.

शिवसेनेला पाकिस्तानी कलाकार चालत नाहीत मग साखर कशी चालते? असा सवाल करून पाकिस्तानातून एक रुपये किलो स्वस्त असणारी साखर आयात करून सरकार देशातल्या ऊस उत्पादक शेतऱ्यांवर अन्याय करित आहे. पाकिस्तान प्रेमापोटी देश आणि राज्यातील शेतकऱ्यांवर भाजप सरकारवर अन्याय करीत असून, सरकारने तात्काळ साखरेच्या आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.

चाॉकलेटच्या मोबदल्यात साखर आयात माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, की देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे ३० हजार कोटी रुपयांचे प्रलंबित आहे ते सरकारने त्वरित द्यावे. २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी ५५ रुपयांऐवजी १०० रुपये अनुदान द्यावे. ५० लाख टन साखरेचा बफर स्टॉक करावा, इथेनॉलचा दर प्रतिलिटर ५३ रुपयांपर्यंत वाढवावा आणि कारखान्यांकडून सुरू असलेली कर्जाची वसुली त्वरित थांबवावी, कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे व त्याच्या सूचना रिझर्व्ह बँक आणि नाबार्डला सरकारने द्याव्यात अशी मागणी केली. सकुमा नावाच्या दिल्लीच्या कंपनीने पाकिस्तानला चॉकलेट निर्यात केले. त्या बदल्यात २० हजार क्विंटल साखर विनाशुल्क आयात केली. देशातील साखरेचे दर पाडण्यासाठीच्या षडयंत्रातून ही आयात केली आहे असा आरोप करून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com