‘एमपीएससी’ भरतीबाबत लवकरच निर्णय घेणार : मुख्यमंत्री

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.१३) दिले. मात्र, सध्या सुरू असलेली काही आंदोलने ही खासगी क्लासेस पुरस्कृत असल्याचा दावादेखील मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. 

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. ते म्हणाले की, या सरकारच्या काळात आंदोलन केल्याशिवाय न्याय मिळू शकत नाही, हे कालच्या आदिवासी शेतकरी आंदोलनावरून स्पष्ट झाले.

लोकसेवा आयोगाच्या पदांची भरती होत नसल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये प्रचंड असंतोष असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो तरुणांचा मोर्चा मुंबईला आला आहे. राज्यात सुमारे दीड लाख पदे रिक्त असताना एमपीएससीच्या माध्यमातून केवळ ६९ पदांची जाहिरात देण्यात आली. एकीकडे वर्षाला दोन कोटी नोकरभरतीची घोषणा केली जाते. तर दुसरीकडे शासकीय नोकरभरतीत ३० टक्के कपात करण्याचेही प्रस्तावित केले जाते, ही विसंगती विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. 

एमपीएससीत काही गैरव्यवहार होत असतील तर ते दूर केले पाहिजेत. परंतु, त्यासाठी अनेक वर्ष स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधःकारमय करणे योग्य नसल्याचेही विखे पाटील म्हणाले. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात स्पर्धा परीक्षांसाठी जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. परंतु, भरतीच होणार नसेल तर या मार्गदर्शन केंद्राचा काय उपयोग? अशीही विचारणा विखे पाटील यांनी केली. सरकारने तातडीने भरती करून राज्यातील बेरोजगार तरुणांचा असंतोष कमी करावा. अन्यथा सरकारला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वेळी दिला. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी भरती करण्याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल, असे सूतोवाच केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com