किसान सभेचा आजपासून नाशिक ते मुंबई लाँगमार्च

किसान सभेचा आजपासून नाशिक ते मुंबई लाँगमार्च

नाशिक : संपूर्ण कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी किसान सभेतर्फे मंगळवारीपासून (ता. ६) नाशिक ते मुंबई लॉंगमार्च आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील शेतकरी दुपारी १ वाजता नाशिकच्या सीबीएस चौकात जमतील. त्यानंतर लॉंगमार्चचे नियोजन मांडण्यात येईल. ३ वाजता शेतकरी हजारोंच्या संख्येने मुंबईच्या दिशेने वाटचाल सुरू करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. खचून जाऊन आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटाच्या काळात सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा करत आहे. कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यात तब्बल १७५३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. किसान सभेने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पुन्हा एकदा आरपार लढा करण्याचा निर्णय घेतला आहे.

लढ्याच्या पहिल्या टप्प्यात किसान सभेच्या नेतृत्वाखाली विधानसभा अधिवेशन काळात राज्यभरातून हजारो शेतकरी नाशिक येथून मुंबई विधानसभेवर पायी चालत येत लॉंग मार्च काढणार आहेत. ६ मार्च २०१८ रोजी दुपारी ३ वाजता सीबीएस चौक, नाशिक येथून या लॉंग मार्चची सुरवात होणार आहे. नाशिक येथून मुंबईपर्यंत पायी चालत आलेले हे शेतकरी अधिवेशन सुरू असताना विधानसभेला बेमुदत महाघेराव घालणार आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत हा बेमुदत घेराव सुरू राहणार आहे.

डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ. अजित नवले, सुनील मालुसरे, बारक्या मांगात, इरफान शेख, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, रतन बुधर, रडका कलांगडा, इंद्रजीत गावीत आदी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. 

"शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीत सरकारने शेतकऱ्यांची जीवघेणी चेष्टा मांडली आहे. गारपीट व बोंड अळीसारख्या संकटाने शेतकरी कोलमडून पडले असताना सरकार केवळ फसव्या घोषणा करत आहे. दीडपट हमी भावासाठी कोणतीही ठोस तरतूद करण्याची सरकारची तयारी नाही. वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, शेतकरी पेन्शन यांसारखे प्रश्न भिजत पडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी पुन्हा एकदा लढ्याला सज्ज झाले आहेत." डॉ. अजित नवले  सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य किसान सभा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com