दोन कृषिपंपांसाठी मिळणार एक डीपी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक  : महावितरणने दोन कृषिपंपांसाठी एक डीपी देण्याचे नियोजन केले असून लवकरच वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या परंतु प्रत्यक्षात जोडणी न मिळालेल्या शेतकऱ्यांना दोन कृषिपंपासाठी एक स्वतंत्र डीपी दिली जाणार आहे. यात खंडित वीजपुरवठ्याच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका होऊ शकणार आहे. नाशिक विभागातील ५१ हजार ७९३ शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.

राज्यात सध्या ४० लाख ६८ हजार २२० कृषिपंपधारक शेतकरी आहेत. याशिवाय मार्च २०१८ अखेरपर्यंत कृषिपंप वीजजोडणीसाठी तब्बल २ लाख ४९ हजार ३५७ इतक्या शेतकऱ्यांनी महावितरणकडे पैसे भरले. यातील बहुतेक शेतकऱ्यांनी चार ते पाच वर्षांपूर्वीच महावितरणकडे पैसे भरलेले होते. आता अशा शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी वीज जोडणी देण्यासाठी महावितरणने उच्च दाब वितरण प्रणालीचे (एचडीव्हीएस) नियोजन केलेले आहे. या प्रणालीद्वारे केवळ दोन कृषिपंपांसाठी एक स्वतंत्र डीपी दिली जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणकडून पाच हजार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

सध्याच्या पद्धतीनुसार, शेतकऱ्यांना ६५ व १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रातून १५ ते २० ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते व वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय शेतकऱ्यांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वारंवार बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होणे, तांत्रिक वीज हानी, रोहित्र बिघाड, विद्युत अपघात आदींना महावितरणला सामोरे जावे लागते. या सर्व अडचणींवर एचव्हीडीएस योजनेद्वारे मात करता येणे शक्य होणार आहे. एचव्हीडीएस योजनेअंतर्गत प्रति कृषिपंप २ लाख खर्च अपेक्षित आहे. या योजनेवर ४४९६.६९ कोटी व नवीन उपकेंद्रासाठी लागणारा अंदाजे खर्च ५५१.४४ कोटी अशा एकूण ५,०४८.१३ कोटी रुपये इतक्या खर्चाला मंत्रिमंडळानेही नुकतीच मान्यता दिलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com