‘निसाका’साठी वन टाइम सेटलमेंटचा पर्याय

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

निफाड, जि. नाशिक  : निफाड तालुक्याला वरदान ठरलेला निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी मुंबई येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जिल्हा बँकेने ''निसाका''वरील थकीत कर्जांपैकी व्याज माफ करून फक्त मुद्दल ''वन टाइम सेटलमेंट'' या योजनेत स्वीकारावी, अशा सूचना सहकारमंत्री देशमुख यांनी बँकेचे चेअरमन केदा अाहेर व कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांना केल्याची माहिती आहे. 

निसाकावर जिल्हा बँकेचे व्याजासह १४२ कोटींच्या आसपास कर्ज आहे. कर्जाची मूळ रक्कम १०९ कोटी असून, जिल्हा बँकेने एकरकमी परतफेड योजनेत फक्त मुद्दल घ्यावी, अशी सूचना सुभाष देशमुख यांनी केली. त्यामुळे निफाड कारखाना सुरू होण्यासाठी निधीची असलेली तरतूद आटोक्यात राहील अशा अर्थाने हा प्रस्ताव मांडला आहे. 

केंद्राच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी निसाका कार्यस्थळावर ट्रायपोर्टला मंजुरी दिली असून, यासाठी ५०० कोटींची आर्थिक तरतूद केल्याचेही दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे बैठकीत जाहीर केले होते. त्यानुसार जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा निसाका कार्यस्थळ व परिसराची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार आता सरकारकडून सकारात्मक पावले उचलायला सुरवात झाल्याचे या बैठकावरून लक्षात येते. 

मात्र यामध्ये जिल्हा बँकेच्या कर्जावरील तोडगा महत्त्वाचा आहे. सध्या निसाकावर जिल्हा बँकेने जप्ती केली आहे. त्यामुळे सहकार मंत्री देशमुख यांच्या सोबतच्या बैठकीत जिल्हा बँकेचे चेअरमन केदा अाहेर यांनाही निमंत्रित केले होते. या बैठकीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे उपाध्यक्ष बन्सल, नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,जिल्हा बँक चेरमन केदा आहेर, कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल, निफाडचे प्रांत महेश पाटील, भाजपचे नेते सुरेशबाबा पाटील, डॉ. प्रशांत पाटील, ट्रायपोर्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील बैठकीत निसाकावरील असलेली कर्जाची मूळ रक्कम स्वीकारण्यासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे निफाड कारखाना सुरू होईल आणि ट्रायपोर्टच्या कामालाही वेग येईल. सोमवारी (ता.१२) याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक आहे. त्यात ट्रायपोर्ट प्रोजेक्टला आणि निसाका सुरू होण्यासाठीही गती मिळेल, असे सुरेशबाबा पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com