संत्रा उत्पादकांना ‘सिट्रस इस्टेट’चा उपयोग व्हावा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : राज्य शासनाने सादर केलेल्या यावेळच्या अर्थसंकल्पात संत्रा पिकाच्या अनुषंगाने ‘सिट्रस इस्टेट’साठी विदर्भातील तीन जिल्ह्यांना १५ कोटी रुपये दिले अाहेत. यात अकोल्याचाही समावेश अाहे. मात्र हा ‘सिट्रस इस्टेट’चा प्रकल्प यापूर्वी राबवलेल्या इस्रायली तंत्रज्ञानाने कापूस उत्पादन प्रयोगासारखा ठरू नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत अाहेत.

अकोला विभागात संत्र्याचे क्षेत्र बऱ्यापैकी असून, सध्या या उत्पादकांना नैसर्गिक अापत्तीसोबतच सरकारी अनास्थेला सामोरे जावे लागते अाहे. अस्थिर बाजारपेठ, पीक काढणीला अालेले असताना येणाऱ्या अापत्ती, प्रक्रिया उद्योगांची वाणवा, दलालांचा विळखा अशा विविध अडचणीत संत्रा उत्पादक भरडला जात अाहे. शासनाने या वेळी अार्थिक पाठबळ देऊन संत्रा उत्पादकांच्या समस्यांवर फुंकर घालण्यासाठी ‘सिट्रस इस्टेट’चा प्रकल्प आणला आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या.  

संत्रापट्ट्यात बाजारपेठेची निर्मिती होणे गरजेचे 

संत्र्यावरील प्रक्रिया उद्योगास चालना मिळाली तर कमी दर्जाच्या फळांनासुद्धा चांगला दर मिळू शकेल. कमीत कमी खर्चात शीतगृह उपलब्ध हवे. वाहतूक खर्च कमी करण्यासाठी रेल्वेचा पर्याय अनुदानित दरात उपलब्ध हवा, निर्यातक्षम उच्च दर्जाच्या वाणांची निर्मिती करून ते शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध व्हावेत. संत्रा विक्रीसाठी उत्पादन घेतल्या जाणाऱ्या पट्ट्यात बाजारपेठेची निर्मिती व्हावी. सध्या कळमना (नागपूर) ही एकमेव बाजारपेठ अाहे जेथे शेतकऱ्यांचा हर्राशी पद्धतीने संत्रा विकाल जातो. हीच सोय संत्रापट्ट्यात करण्यास चालना देण्याची गरज अाहे.  - प्रभाकर मानकर,  कृषी उद्यानपंडीत शेतकरी, रूईखेड, ता. अकोट, जि. अकोला 

रोगराईमुळे संत्रा उत्पादक त्रस्त 

मागील काही वर्षांपासून संत्रा उत्पादकांना मोठ्या प्रमाणात अस्मानीसह सुलतानी संकटाना तोंड द्यावे लागत आहे. त्यामध्ये गेल्या वर्षी झालेली नोटबंदीसुद्धा मारक ठरली. बहार कमी फुटून चांगले भाव अपेक्षित होते पण व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक झाली व सध्याही सुरू आहे. संत्र्यावर येणारी रोगराई शेतकऱ्यांना हैराण करीत आहे. याकडे अाधी लक्ष द्यायला हवे.  - अनिल आतकड,  संत्रा उत्पादक, बोर्डी, जिल्हा अकोला.

कमी क्षेत्र असलेल्या भागातही विमा कवच हवे

संत्रा फळबागेसाठी बुलडाणा जिल्ह्याचा विचार केला तर संत्रा फळबागा फार कमी आहे. उन्हाळ्यामध्ये लागणारे भरपूर पाणी, मार्केटींगची माहिती नसणे, जवळपास एकही शीतगृह उपलब्ध नसणे, फळबागेबद्दल तांत्रिक माहितीचा अभाव, अादी कारणांमुळे शेतकरी या फळबागेकडे वळलेला आहे. सर्वात मोठी एक अडचण म्हणजे आमच्याकडील जवळपास सर्व शेतकरी संत्र्याचा मृग बहार धरतात. परंतु, हा बहार धरतांना दर तीन वर्षातून एकदा गारपिटीचा जोरदार फटका बसतो. त्यामुळे बरेचदा मोठा आर्थिक फटका बसतो. हे नुकसान टाळण्यासाठी विमा कवच असणे फार अवश्यक झाले आहे. परंतु, क्षेत्रफळ कमी असल्यामुळे आमच्या तालुक्याला ही सुविधासुद्धा मिळत नाही. तसेच नवीन फळबाग लागवड करताना कृषी विभागाकडून दोन ओळी व दोन झाडांमधील अंतर ठरविलेले आहे. त्यामध्ये बरेच वेळा शेतकऱ्यांना ते अंतर जमीन पाहून उत्पन्न वाढविण्यासाठी कमी जास्त करावे लागते. अशावेळी कृषी विभागाकडून दिले जाणारे अनुदान मिळत नाही. मी स्वत: कोणत्याही योजनेचा लाभ न घेता तीन वर्षांपूर्वी नवीन १३०० झाडे लावलेली आहेत. या अडचणी शासन, कृषी विभागासाठी मोठ्या नसल्या तरी शेतकऱ्यांच्यादृष्टीने खूप अडचणीच्या ठरतात.  - प्रभाकर शालिग्राम खुरद,  मु. पो. भोसा, ता मेहकर, जि. बुलडाणा 

संत्रा पिकासाठी विमापद्धत बदलावी

संत्रा पिकासाठी विम्याची पद्धत बदलली पाहिजे. गारपीट होऊनही अनेकदा मदत मिळत नाही. सध्या पाणीपातळी खालावल्याने व दुसरीकडे उष्णतामान वाढल्याने अडचणी तयार झाल्या. शासनाने सिंचन सुविधांसाठी उपलब्ध अनुदान पद्धत सोपी केली पाहिजे. दहा वर्षांपूर्वी पासूनचे प्रस्ताव अद्यापही पडून अाहेत.   - नितीन तांबे, सोनाळा,  ता. संग्रामपूर, जि. बुलडाणा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com