दूधदराविषयीच्या आदेश अंमलबजावणीवर उत्पादक ठाम

दूधदराविषयीच्या आदेश अंमलबजावणीवर उत्पादक ठाम
दूधदराविषयीच्या आदेश अंमलबजावणीवर उत्पादक ठाम

लाखगंगा, जि. औरंगाबाद  : जाहीर केलेल्या २७ रुपये प्रतिलिटर दराची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवर लाखगंगा येथील दूध उत्पादक ठाम आहेत. तसेच शासनाला दिलेली मुदत बुधवारी (ता. ९) संपत असून मारोतीरायसमोर भजन, मोफत दूध वाटपासह विकलेल्या दुधाची पावती न घेण्याची भूमिका लाखगंगा येथील ग्रामस्थानी मंगळवारी (ता. ८) कायम ठेवली. आमच्या दराच्या मागणीत चूक काय, असा सवाल दूध उत्पादक उपस्थित करीत आहेत.

खर्चाला परवडणारे दर मिळत नसल्याने फुकट दूध वाटप व संकलन केंद्रांना मोफत घालण्याचा निर्णय वैजापूर तालुक्यातील लाखगंगा येथील ग्रामसभेतून घेण्यात आला होता. ३ मे पर्यंत शासनाने दूध दरविषयी कोणतीही भूमिका न घेतल्याने अखेर लाखगंगा येथे मोफत दूध वाटपाला सुरवात केली. लाखगंगाच्या पंचक्रोशीतील गावांनीही यामध्ये सहभाग नोंदविण्याची भूमिका घेतली. तसे ठराव ग्रामसभेत घेण्यात आले.

पहिल्याच दिवशी प्रशासन गावात दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी दर कमी देणारावर कारवाईची भाषा केली. परंतु दराविषयीच्या निर्णयाच्या अंमलबजावणी अनुषंगाने पावले उचलली गेली नाही. त्यामुळे लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी फुकट दूध वाटपासह संकलन केंद्रात घातलेल्या दुधाच्या पावत्या व पैसे न स्वीकारण्याचे काम सुरूच ठेवले. 

दररोज सकाळी ग्रामदैवत मारोती मंदिरातील भजन शासनाला निर्णयासाठी दिलेल्या मुदतीच्या पूर्वसंध्येला रात्रीही करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. शासनाने सकारात्मक हस्तक्षेप करून न्यायाची भूमिका न घेतल्यास ९ मे पर्यंत शांतीच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची घोषणा केली गेली आहे.

चर्चा नको, आदेशाची  अंमलबजावणी करा शासनाने जाहीर केलेला २७ रुपये प्रतिलिटरचा दर दिला जात नाही, तोवर विक्री केलेल्या दुधाच्या पावत्या वा पैसे न स्वीकारण्यावर उत्पादक ठाम आहेत. दराविषयी शासनाने काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. चर्चा करायची तर ती उत्पादकांच्या दृष्टीने सकारात्मक हवी. मुळात चर्चा करण्याऐवजी शासनाने जाहीर केलेले दर मिळवून दिले तर बरं होईल, असेही दूध उत्पादकांचे म्हणणं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com