मराठवाड्यातील डाळिंब पीक संकटाच्या फेऱ्यात

तेल्या, सर्कोस्पोरानं डाळिंब उत्पादकांना जेरीस आणलं. खर्चाला परवडलं पण गतवर्षीच्या तुलनेत दर निम्मे आहेत. बाजारपेठ नसल्यानं मोठी अडचण आहे. - कल्याण पोफळे, डाळिंब उत्पादक, जि. औरंगाबाद.
 डाळिंबावर सर्कोस्पोराचा प्रादुर्भाव झाल्याने फळांची झालेली अवस्था.
डाळिंबावर सर्कोस्पोराचा प्रादुर्भाव झाल्याने फळांची झालेली अवस्था.

औरंगाबाद : मोसंबीचे आगार असलेल्या मराठवाड्यातील शेतकरी गत काही वर्षांत डाळिंबाकडे वळले. त्यामुळे डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली. खर्चाच्या तुलनेत उत्पादन देणारे हे पीक मानले जात असले, तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत मिळत नाही. यंदा तर कीड-रोगामुळे उत्पादन खर्च व कमी दरामुळे उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यातील डाळिंब पीक संकटाच्या फेऱ्यात अडकले आहे. 

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत १० हजार ६७६.११ हेक्‍टरवर डाळिंबाचे क्षेत्र विस्तारले आहे. त्यामध्ये औरंगाबाद विभागात सर्वाधिक ९४१२.३७ हेक्‍टर, तर लातूर कृषी विभागातील १२६३.७४ हेक्‍टर क्षेत्र आहे. डाळिंबाने काही शेतकऱ्यांना आधार दिला. त्यामुळे इतर शेतकऱ्यांचा कल डाळिंबाकडे वाढला. परंतु डाळिंबातील नफा जसा जास्त तसे नुकसानही जास्तच असते असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तुलनेत मोसंबीचा खर्चही कमी आणि वातावरण बऱ्यापैकी पोषक असल्याने पाण्याचा विषय वगळता खर्चाला परवडणारे पीक ठरल्याचे डाळिंब व मोसंबी या दोन्ही पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. ५५ हजारांपासून सव्वा लाखापर्यंत एकरी खर्च येणाऱ्या डाळिंबाचे एकरी सरासरी उत्पादन ८० क्‍विंटलच्या आसपास येते. जवळपास सात महिने जपल्यानंतर गोडीपेक्षा दिसण्यावर त्याचे दर ठरविले जातात.

 सर्वांचेच डाळिंब दिसायला चांगले असतील असे नाही, त्यामुळे किती दर मिळतील याची शाश्‍वती नाही. गतवर्षी १५० ते ३०० ग्रॅम वा त्यापुढे वजन असलेल्या डाळिंबाला ७० ते १०० रुपये किलोपर्यंत दर मिळाला. यंदा १५० ते २५० ग्रॅम वजन असलेल्या डाळिंबाला आजघडीचा ५० रुपये प्रतिकिलोच्या आसपास, तर त्यापुढील वजनाच्या डाळिंबाला ५५ ते ६० रुपये किलोपर्यंतच सरासरी दर मिळतो आहे. गतवर्षी डाळिंब खरेदीदार शेतकऱ्यांच्या दारात होते तर यंदा उत्पादकला डाळिंब घेऊन नाशिक सोलापूरची बाजारपेठ गाठावी लागली. २५० ग्रॅमच्या पुढील डाळिंबालाच व्यापारी यंदा विचारीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खासकरून आंबे व लेट मृग बहर घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या डाळिंब दराबाबत अशी स्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

तेलकट डागररोग, सर्कोस्पोराचे आक्रमण मराठवाड्यातील डाळिंबावर यंदा तेलकट डागररोगाबरच सर्कोस्पोरा व मर रोगाचे आक्रमण झाले. मध्यंतरी दमट वातावरण रोगांना वाढविण्यास पोषक ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनखर्चात वाढ झाली. प्रचंड खर्च करूनही नियंत्रण मिळविता न आल्याने शेतकऱ्यांनी बागा काढूनही टाकल्या.

मराठवाड्यात मार्केट नाहीच डाळिंबाला मराठवाड्यात मार्केट नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एकतर व्यापरी येईल, आपल्याला परवडणारा दर देईल या आशेवर मालाला जपावे लागते किंवा नाशिक, सोलापूरची बाजारपेठ गाठून तिथे मिळणाऱ्या दरावर समाधान मानाव लागते. त्यामुळे औरंगाबादसारख्या ठिकाणी डाळिंबाची बाजारपेठ उभी केली जावी. त्यामुळे डाळिंबाच्या विस्ताराला वाव मिळेल अशी शेतकऱ्यांची भावना आहे.  जिल्हानिहाय डाळिंबाचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) जिल्हा-----------क्षेत्र औरंगाबाद-----४३७७.५५ जालना---------२४२३.८६ बीड------------२६१०.९६ लातूर----------४९८.२६ नांदेड-----------१४.८९ उस्मानाबाद----६६५.३३ परभणी----------६१.८० हिंगोली----------२३.४६ प्रतिक्रिया तीन वर्षांपासून उत्पन्नात सातत्याने तोटा आला. सहा एकरांतील डाळिंबावर यंदा साडेपाच लाख खर्च झाले. ५० टन माल होता, एक्‍स्पोर्टरने ८० रुपये किलोने मागितले. नमुना द्यायचा तर सरकारने एक्‍स्पोर्टवर बंदी आणली. त्यानंतर सर्कोस्पोरा आला. कवडीमोल दराने डाळिंब विकावे लागले. कसेबसे सहा लाख वसूल झाले. दोन दिवसांपूर्वी बाग काढून टाकली.  - राजेंद्र चोरमले, घुंगर्डे हदगाव, ता. अंबड, जि. जालना. खर्चाच्या तुलनेत पैसे उरतात पण मोसंबीच्या तुलनेत मेहनत जास्त आहे. महिनाभरापूर्वी ३० ते ३५ रुपये किलो सरासरीने डाळिंब विकले. ८० टक्‍के शेतकऱ्यांनी डाळिंब विकल्यावर चांगल्या मालाला आता थोडे बरे दर मिळताहेत. - विठ्ठल धस, डाळिंब उत्पादक, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com