प्रतिकूल हवामानासह वाढता खप देणार बाजाराला आधार

ब्राॅयलर, अंडी
ब्राॅयलर, अंडी

पुणे ः येत्या दिवसांत उपवासाचे सण नसल्याने आणि प्रतिकूल हवामानामुळे पक्ष्यांचा पुरवठा नियंत्रित राहणे, या दोन्ही बाबी ब्रॉयलर्सच्या बाजाराला आधार देतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाशिक विभागात शनिवारी (ता. २९) रात्री ७६ रु. प्रतिकिलो दराने `फार्म लिफ्टिंग’ झाले. घटस्थापनेनंतरच्या चार दिवसांत ८० रु. प्रतिकिलो या पातळीवर बाजार होता. मात्र त्यानंतर मागील आठवड्याच्या सुरवातीलाच ७१ रु. पर्यंत बाजार नरमला होता. आठवड्याच्या शेवटी पुन्हा बाजार सावरला आणि ७५ रु. प्रतिकिलोच्या वरील पातळीवर स्थिरावला. घटस्थापनेनंतर ८० रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. श्रावणानंतर बाजाराने प्रथमच ८० चा टप्पा गाठला. श्रावण ते नवरात्रीच्या कालावधीत अलीकडील वर्षांच्या सरासरी भावाच्या तुलनेत यंदा बाजार जास्त तुटला नाही. बाजार खाली येताच वेगाने सुधारणा झाली आहे.  पुण्यातील पोल्ट्री उद्योजक डॉ. अजय देशपांडे म्हणाले, ‘‘देशभरात ब्रॉयलर्सचा दर ७० रु. प्रतिकिलोच्या वर आहे. ऑक्टोबर हिट, आर्द्रता आदी कारणांमुळे पक्ष्यांची वजनवाढ नियंत्रणात राहत आहे. एकूण पुरवठा नियंत्रण असणे आणि चिकनच्या खपामध्ये अडथळा नसणे, या दोन्ही गोष्टी बाजारासाठी पूरक ठरतील. मात्र, सध्याच्या प्लेसमेंटबाबत मात्र सावध निर्णय घेतले पाहिजेत. गेल्या काही वर्षांमध्ये मार्गशीर्ष आणि नोव्हेंबर महिना बाजारासाठी अनुकूल ठरलेला नाही. या काळात पक्ष्यांची उत्पादकता चांगली राहते आणि उपलब्धतेच्या तुलनेत मालास उठाव मिळत नाही. यामुळे एकूण उत्पादन नियंत्रित राहणे गरजेचे वाटते.’’ तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दशकभरात नवरात्रीत मंदीत राहणारा बाजार यंदा अनपेक्षितरित्या तेजीत होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, पुर्वानुभव लक्षात घेत अनेकांनी या काळासाठी उत्पादन कमी ठेवले होते. नवरात्रीच्या आधी पक्ष्यांच्या विक्रीत शिस्तबद्ध सातत्य होते. माल रोखण्याची पुनरावृत्ती झाली नाही. सध्याची प्लेसमेंट नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर निघेल. यावेळी थंडीचे प्रमाण वाढून तापमान पक्ष्यांसाठी अनुकूल राहू शकते. त्यामुळे सध्याच्या तुलनेत पक्ष्यांची वजने ही चांगली आणि वेगाने येतील. दुसरी गोष्ट, गेल्या वर्षभरातील सातत्यपूर्ण तेजीमुळे एकूण उत्पादनात वाढ होण्याचा संभव आहे.  मागील वर्षाचा दसरा ते यंदाचा दसरा हा कालावधी पोल्ट्री उद्योगासाठी किफायती राहिला आहे. सरासरी विक्री दर ७२ रु. प्रतिकिलोच्या वर येईल. दुसरीकडे, कच्चा मालाच्या किमती नियंत्रणात राहिल्यामुळे मार्जिन वाढला आहे. ब्रीडर्स नसणारे इंटिग्रेटर्स आणि ओपन फार्मर्ससाठी उद्योगातील वाटा मात्र घटला आहे. पुढील दसऱ्यापर्यंत पुढील घटक ब्रॉयलर्सचा बाजारावर परिणामकारक असतील. १. वातावरणातील चढ उतार. २. बदलत्या वातावरणात ब्रॉयलर्स पक्ष्यांची कामगिरी. ३. देशपातळीवर चिक्सची उपलब्धता. सदर तिन्ही घटक उत्पादनवाढीच्या दृष्टीने सध्या तरी प्रतिकूल आहेत. त्यामुळे बाजारभाव किफायती राहू शकतो. कच्चा मालाची उपलब्धता आणि बाजारभाव, देशांतर्गत ब्रॉयलर्सच्या मागणीत होणारी सातत्यपूर्ण वाढ, बीफ बंदीसारख्या तत्सम बाबी ब्रॉयलर पोल्ट्रीचा मार्जिन वाढण्यासाठी येत्या वर्षांत अनुकूल राहतील, असे दिसते. प्रकार--------भाव---------परिमाण-------बाजारपेठ ब्रॉयलर-------७१---------प्रतिकिलो------नाशिक अंडी-----------३५०-------प्रतिशेकडा-----पुणे चिक्स----------४२--------प्रतिनग--------पुणे हॅचिंग एग्ज-----३१-------प्रतिनग------- मुंबई मका-----------१४७०------प्रतिक्विंटल-----सांगली सोयामिल-----२३५००-----प्रतिटन---------इंदूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com