जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्प

जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्प
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्प

परभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील पाच आणि मध्य प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये भारतातील अन्न सुरक्षेसाठी मृदा संरक्षण आणि जमीन सुपीकतेसाठी पुनर्जीवन प्रकल्प (प्रो- साॅईल) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांअंतर्गत नाईस या माहिती तंत्रज्ञान प्रणालीच्या माध्यामातून लाभार्थी शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन केले जाणार आहे. या अंतर्गत शेतकरी-शास्त्रज्ञ असा दोन्ही बाजूंनी संवाद साधला जाणार आहे.

शाश्वत उपाय योजनांची अंमलबजावणी करून हिणकस मातीचे पुनर्जीवन करून सुपीकता वाढीसाठी या आधी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम घेतलेल्या महाराष्ट्रातील नगर, अमरावती, धुळे, जालना आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य प्रदेशातील बालाघाट आणि मांडला या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

प्रो-साॅईल प्रकल्पाअंतर्गंत राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मॅनेज)तर्फे लहान शेतकऱ्यांना क्षमता बांधणीचे प्रशिक्षण देऊन तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालय, कृषी तंत्रज्ञान विस्ताराचे कार्य करणारे कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), इक्रिसॅट या संशोधन संस्था, बायफ, वाॅटर, फाउंडेशन फाॅर ईकाॅलाॅजीकल सेक्युरिटी (एफईएस) यांच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांमध्ये शेत जमिनीतील मातीचे संरक्षण आणि पुनर्जीवन, जमीन सुपीकतेसाठी व्यवस्थापन, हवामान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक (नाबार्ड) आणि जीआयझेड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रो- साॅईल प्रकल्प राबविल्या जात आहे. या अंतर्गंत निवड झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संबंधित कृषी विद्यापीठ तसेच कार्यक्षेत्रातील कृषी विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ नियमित सल्ला आणि मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी नेटवर्क फाॅर इन्फार्मेशन क्लायमेट इक्सेंज (नाईस) प्रणालीच्या माध्यमातून शेतकरी-शास्त्रज्ञ असा दोन्ही बाजूंनी संवाद साधल्या जाणार आहे. निवड झालेल्या गावांमध्ये एका प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यातील आठ गावांचा समावेश जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई टेपली, चांदई ठोंबरी, चिंचोली, देऊळगांव, पिंपळगांव बारव, थिगळखेडा, बाणेगांव आणि पळसखेडा ठोंबरी या आठ गावांची या प्रकल्पांअंतर्गंत निवड करण्यात आली आहे. या गावातील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ यांच्यासाठी मॅनेजतर्फे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये मंगळवार (ता. १७) आणि बुधवारी (ता. १८) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी वनामकृविचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. पी. जी. इंगोले, कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र प्रमुख डाॅ. यू. एन. आळसे, जीआयझेडचे विभागीय अधिकारी रणजित जाधव आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com