सेंद्रिय शेतीसाठी निधीची तरतूद करा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अधिकाधिक सेंद्रिय शेती वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी आराखडा तयार करून निधीची तरतूद करा, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्या. 

कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम नियोजन व जलयुक्त शिवार अभियान सनियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्तलयात गुरुवारी (ता. १२) झाली. या वेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, पुणे विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. जे. पलघडमल, आमदार भीमराव तापकीर, बाळा भेगडे, राहुल कुल, सुरेश गोरे, तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे सभापती आदी उपस्थित होते. 

श्री. बापट म्हणाले, शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत; परंतु सेंद्रिय खत उपलब्ध होत नाही. त्यासाठी पशुधन वाढविण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेणखत घ्यावे लागते.

प्रत्येक गावात जनावरांना एकत्रित करून एखाद्या ठिकाणी सेंद्रिय खत प्रकल्प उभा करून त्या माध्यमातून सेंद्रिय खत शेतकऱ्यांपर्यंत पोचविले पाहिजे. यासाठी सेंद्रिय खताचे प्रकल्प उभा केले, तर मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध होईल. सरकारच्या माध्यमातून अनुदान देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्या संदर्भातील नवीन आराखड्याची निर्मिती करावी. गेल्या वर्षी ९६२ पॉस मशिनद्वारे किती शेतकऱ्यांना खते दिली. या मशिनद्वारे किती शेतकऱ्यांना फायदा झाला. किती मेट्रिक टन खत याद्वारे दिली याची माहिती अधिकाऱ्यांकडून मागितली असता, त्यावर संबधित अधिकाऱ्यांनी माहिती नसल्याचे उत्तर दिले. त्यावर गिरीश बापट यांनी उदाहरण देत संबधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 

उन्हाळ्यात जलयुक्तच्या कामावर भर द्यावा  जलयुक्तची कामे करण्यासाठी अवघी दोन महिने बाकी आहेत. भविष्यातील टँकरमुक्त जिल्हा करण्यासाठी जलयुक्तची कामे महत्त्वाची आहेत. येत्या दोन महिन्यांत ती गतीने करणे गरजेचे आहे. या कामामध्ये टेंडरची कामे अजून शिल्लक आहेत. त्यामुळे कामे करण्यास उशीर होतो. या विषयाचे गांभीर्य ओळखून यावर अधिक भर देण्याची गरज आहे. याशिवाय धरणातील गाळ काढण्यासाठी प्रशासनाने  पुढाकार घ्यावा. त्यासोबत आणखी स्वयंसेवी संस्थाचा सहभाग मिळत असेल तर त्यांनाही सहभागी करून घ्यावे. त्यासाठी गावपातळीवर अधिकाऱ्यांनी संपर्कात राहून गावातही गाळ काढण्याची कामे हाती घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com