दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर द्यावा : शेतकरी

दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर द्यावा : शेतकरी
दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर द्यावा : शेतकरी

पुणे ः महत्त्वाचा शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय राज्यात विस्तारला आहे.  दुष्काळी तसेच सधन भागातील शेतकरी या व्यवसायाकडे वळले आहेत; परंतु अलीकडच्या काळात उत्पादन खर्चही निघत नसल्याने दूध उत्पादक अडचणीत आले आहेत. त्यामुळे किमान २७ ते ३६ रुपये प्रतिलिटर दर जाहीर करावा, शासनाने दूध खरेदी करून ब्रॅंडखाली विक्री करावी, दुग्धजन्य पदार्थ व भुकटी निर्यातीला प्रोत्साहन द्यावे, दूध संघांतील राजकारण थांबवावे आदी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच दुग्ध व्यवसाय टिकण्यासाठी शाश्वत दर द्यावा, अशी मागणीही केली आहे.  

अनियिमत, अपुऱ्या पावसामुळे शेतीतून उत्पन्नाची खात्री कमी होत असल्यामुळे या भागातील शेतकरी दूध व्यवसायाकडे वळले आहेत. दूध व्यवसायामुळे उत्पन्नाचा पर्यायी स्राेत निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना उभारी मिळत आहे. शेतीपूरक पशुपालन, दुग्ध व्यवसाय असलेल्या भागात शेतकरी आत्महत्या नाहीत. त्यामुळे शासनाने या भागात हा व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासकीय दूध संकलन व्यवस्थेतील त्रुटी दूर केल्यातरच दुधाची नासाडी थांबले. शासकीय शीतकरण केंद्रांवर दूध गुणवत्ता तपासणीसाठी अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून द्यावीत. शीतकर केंद्रामधील बल्क कूलरची क्षमता वाढवावी. गायीच्या दुधाला ३.५-८.५ गुणप्रतीसाठी प्रतिलिटर किमान ३० रुपये दर मिळायला हवा.  - विठ्ठल गिराम, शेतकरी, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी.

दुष्काळात जगण्याचं साधन म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला जातो. त्यामुळे अतिरिक्त दूधामुळे दर कोसळतात. या परिस्थितीत दुधाचा वापर वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. शाळा, अंगणवाड्या, रुग्णालये या ठिकाणी पोषण आहार म्हणून दूध देणे आवश्यक आहे. ४० ते ४५ टक्के दूध भेसळयुक्त असते. भेसळीमुळेदेखील दूध अतिरिक्त ठरते. त्यामुळे भेसळ थांबविणे अंत्यत महत्त्वाचे आहे. दुधाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शासनाकडून दूधाचे मार्केटिंग करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शासकीय ब्रॅंड विश्वासनीय असतो. त्यामुळे शासकीय दूध संकलन केंद्रातील दुधाचे पॅकिंग करून ब्रॅंड तयार करावा. - भगवान सावंत, दुग्ध प्रक्रिया उद्योजक, जवळा बाजार, जि. हिंगोली.

आमच्या गोठ्यात ३० गाई आणि १८ म्हशी होत्या. दररोज ५०० लिटर दूध डेअरीला द्यायचो, मात्र ऑक्टोबर २०१७ मध्ये दुधाचे दर २७ रुपये लिटरवरून २१ रुपयांवर घसरले. प्रतिलिटर ६ रुपयांप्रमाणे दररोज ३ हजार म्हणजेच महिन्याला एक लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तीन महिने स्वत: दरमहा ५० हजार रुपये टाकावे लागत होते. त्यामुळे एकाच दिवशी २० गाई विकल्या. त्यानंतर ८ म्हशीही विकून टाकल्या. दुधाचे दर कमी असल्याने दुधासाठी लागणारा खर्चही भरून निघत नसल्याचे जनावरे संभाळणे परवडत नाही. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर दुधाची भुकटी पडून असून, त्यामुळे दुधाचे दर काेसळले आहेत. सरकारने भुकटीच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे आवश्‍यक आहे. दूध ही अत्यावश्‍यक गोष्ट असून, सर्वसामान्यांना स्वस्तामध्ये द्यायचे असेल, तर सरकारने शेतकऱ्यांना प्रतिलिटर किमान सात रुपये अनुदान दिले पाहिजे. तरच शेतकऱ्याचा दूध व्यवसाय टिकेल. - हेमंत पासलकर, दूध उत्पादक शेतकरी, माले, ता. मुळशी, जि. पुणे. 

गाईच्या दुधाला किमान प्रतिलिटर २७ रुपये दर देण्याबाबत शासनाचा आदेश होऊनही त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही, हे दुदैवीच आहे. आज दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर १७ रुपये इतका खाली आला आहे. सुमारे १० रुपयांचा तोटा रोज शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. एका गाईला सांभाळण्याचा दिवसाचा खर्च २०० रुपये आहे, तर दुधाचे उत्पादन सरासरी ३०० रुपये होते. त्यात चारा- पाण्यावर २०० रुपयांचा खर्च होतो, त्यातून १०० रुपये हातात राहतात, पण त्यातून आमचा पगारही निघत नाही. इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. जादा दूध, दूध पावडर यांसारख्या विषयात आम्हाला रस नाही, अलीकडेच दूध भुकटीला प्रतिलिटरमागे तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा झाली. पण नेमके कारखाने कोणाचे आहेत? तयार पावडर कुठे विक्री होते याचे सामान्यांना काही देणेघे नाही. त्याऐवजी दुधाला थेट हमीभाव द्यावा, त्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही व्यावसायिक गोडी लागेल आणि दूधदराची हमी असल्याने खात्रीशीर उत्पन्नही मिळेल. - महादेव सलगर, दूध उत्पादक, जामगाव (ब्रु.),  ता. मोहोळ, जि. सोलापूर

सध्या शासन देत असलेला दर हा दूध उत्पादकाला अजिबात परवडणारा नाही. गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये लिटर व म्हशीच्या दुधाला ४० रुपयांचा दर मिळाला तरच दूध उत्पादक अाजच्या या महागाईच्या काळात तरू शकतो. सध्या ३-५ फॅटला २७ अाणि ६-०ला ३६ रुपयांचा दर मिळत अाहे. अाज पशुखाद्य, पिण्याचे पाणी, अारोग्यावरील खर्च या सर्वच बाबींवर पशुपालकांचा मोठा खर्च होत अाहे. त्यामुळे १० लिटरपेक्षा कमी दूध जनावर देत असेल तर ते कुठल्याच पशुपालकाला परवडत नाही. अाज उत्पन्नाच्या बरोबरीने अशा जनावरांवर खर्च करावा लागत अाहे. शासनाने पशुपालकांना वाचवण्यासाठी दूध दरवाढ व त्या धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याची नितांत गरज अाहे. - मोहन देशमुख, दूध उत्पादक, पिंपळखुटा, जि. अकोला 

सध्याच्या दूध दरानुसार शेतकऱ्यांना एक रुपयादेखील शिल्लक राहात नाही. ही काेंडी कशामुळे झाली काय राजकारण आहे हे कळत नाही. पण शेतकरी मात्र यात हाेरपळला जात आहे. माझ्याकडे अनेक वर्षांपासून २५ गाई असून सध्याचे राेजचे १८० लिटर दूध उत्पादन आहे. सध्याच्या दूध दराबाबत ताेडगा काढण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान सरकारने द्यावे. - बाळासाहेब साेकाेरे, केंदूर, ता. शिरूर जि. पुणे 

दुधाचा प्रश्‍न वर्षभरापासून गाजत आहे. गायीच्या दुधाला तर दर द्यायला संघ तयार नाहीत. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळले. याचा परिणाम चांगला व्हायला हवा होता; परंतु शासनाकडे दुधाच्या विक्रीचे, त्याचा खप वाढविण्याचे प्रभावी माध्यमच नाही. यामुळे दुधाचे दर कमी होत आहेत. जिल्ह्यात खासगी डेअऱ्या व सहकारी संस्थांमध्ये हवे तसे दर दुधाला नाहीत. गायीच्या दुधाचे दर दोनदा संघाने कमी केले. दूध संकलन वाढले म्हणून दर कमी केले, असे सांगितले जाते. परंतु दुधाचे विक्री दर संघ व डेअऱ्या कमी करीत नाहीत. आपला नफा कमी व्हायला नको. महागाई वाढत आहे; पण दूध उत्पादकांचा विचार न करता दर कमी दिले जात आहेत. शेतकरी कितीही विनवण्या करतील, त्याचे शासन ऐकणार नाही. शासनाला फक्त आंदोलनाचीच भाषा समजते. - किशोर शांताराम पाटील,  दूध उत्पादक, साकरे, ता. धरणगाव, जि. जळगाव

शेतकरी मेहनत करून, गावोगावी फिरून आपल्या दुधाला दर मिळवू शकत आहेत; परंतु त्यांना त्यासाठी आपल्या दुधाचा दर्जा, विश्‍वासार्हता सिद्ध करावी लागते. देशी गायींच्या दुधाला दर मिळत आहेत. मला दर बऱ्यापैकी मिळतात; परंतु इतर गायींचे जे दूध संघ, डेअऱ्यांमध्ये येते, त्याला दर नाहीत. दूध पावडर मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. ती पडून आहे. तिची विक्री झाली असती तर ही वेळ आली नसती. अशा स्थितीत अधिकाधिक दुधाचा खप कसा वाढेल यासाठी उपाययोजना सरकारने करायला हव्यात. - नरेंद्र पाटील, दूध उत्पादक, कापडणे, जि. धुळे

किमान महागाई, उत्पादन खर्च हे मुद्दे शेतीप्रमाणे दूध  धंद्यालाही लागू करायला संघ, शासन व डेअऱ्या विसरत आहेत.  फक्त दुधाला मागणी नाही, पुरवठा अधिक आहे, असे म्हणून दर कमी केले जात आहेत. दूध धंदा सुरू करायचा सल्ला गावोगावी राजकारणीच देतात. शेतकरी त्याकडे वळले तर मार्केटिंगची समस्या पुढे केली जाते. डेअरी, संघ श्रीमंत होत आहेत. पण दूध उत्पादकाला चारा, ढेप, गोठ्यांचे व्यवस्थापन, वीज व्यवस्था, मजुरी आदी खर्च किती लागतो, याचा विचार कुणी करीत नाही. एक लिटर शुद्ध पाणी  व एक लिटर गायीचे दूध यांचे दर सारखेच आहेत. मग बाटलीबंद  पाणी विक्रेते दूध उत्पाकांपेक्षा चांगले, असे म्हणण्याची वेळ आली आहे. - पुरुषोत्तम पटेल, दूध उत्पादक, शहादा, जि. नंदुरबार 

देशात १९८० मध्ये गाईचे एक लीटर दूध बरोबर एक लिटर डिझेल आणि म्हशीचे एक लिटरबरोबर एक लिटर पेट्रोल ही भाव पातळी होती. त्या वेळी दूध उत्पादकांना दूध विक्री करून दुधाचा उत्पादन खर्च भागून स्वतःहाची उपजीविका साधणे शक्य होत होते. सध्या मात्र दुधाचा उत्पादन खर्च ४२ रुपये प्रतिलिटर झाला असून, दधू उत्पादकांच्या हातात मात्र केवळ १८ रुपये पडत आहे. म्हणजे दूध उत्पादकांना वीस ते बावीस रुपये प्रतिलिटर तोटा सहन करून दूध विकावे लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात दूध विक्री झाल्याने दूध उत्पादक दुधाचा उत्पादन खर्च वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाचे पशुखाद्य जनावरांना देत आहे. त्याचा परिणाम ग्राहकांनासुद्धा सकस दूध मिळत नाही. यावर उपाय शोधायचा झाल्यास सरकारने या अगोदर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी  करणे अपेक्षित आहे. अथवा ऊस धंद्याप्रमाणे व इतर देशातील कच्च्या शेतमालाला दर देण्याचे सूत्र ७०ः३० स्वीकारले पाहिजे. म्हणजे कच्या उत्पादकांना ७० टक्के रक्कम व त्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगास तीस टक्के रक्कम दिली पाहिजे. असे झाले तरच हा दूधधंदा शेतकरी करतील; अन्यथा शेती व्यवसाय व पशुधन यावर फार मोठा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मागील दोन वर्षांत या पद्धतीने आपल्या देशाला दुसऱ्या देशाकडून चौपट भावाने तूर खरेदी करावी लागली. त्याच पद्धतीने दूध व दुग्धजन्य पदार्थ दुसऱ्या देशाकडून आयात करावे लागतील. पुढील धोका समजून घेऊन सध्याच्या सरकाराने योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.  - पांडुरंग रायते,  अध्यक्ष, पुणे जिल्हा, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com