नंदुरबारमध्ये दीड लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीचा अंदाज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नंदुरबार : रब्बी हंगामाची तयारी जिल्ह्यात सुरू झाली आहे. नंदुरबार व शहादा तालुक्‍याचा पूर्व भाग पुरेशा पावसाअभावी होरपळला, पण नवापूर, शहादा व तळोदा तालुक्‍यातील बहुतांशी भागात पावसाची स्थिती बरी आहे. या तालुक्‍यांमध्ये रब्बी पेरणीची भिस्त असून, जवळपास दीड लाख हेक्‍टरवर पेरणी होईल, असे संकेत आहेत.

या दृष्टीने नंदुरबार येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. यंदा जिल्ह्यात खरिपातील पेरणीच्या वेळेस हवा तसा पाऊस नव्हता. तिबार पेरणी करायची वेळ आली. या स्थितीत आता रब्बी हंगाम उभा करायचा आहे.

नंदुरबार तालुक्‍यातील भालेर, तिसी, होळ, चौपाळे, रनाळे, खोंडामळी आदी भागात स्थिती बिकट आहे. शहादा तालुक्‍यात कहाटूळ, बामखेडा, सारंगखेडाचा उत्तर पट्टा आदी ठिकाणीदेखील पिकांची स्थिती नाजूक बनली. आता रब्बीच्या पेरणीसाठी या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

तळोदा, शहादा व नंदुरबारचा तापीकाठालगतचा भाग, नवापूर या तालुक्‍यांमध्ये स्थिती बरी आहे. तसेच शहादा तालुक्‍यातील सातपुडालगतची गावे, मध्य प्रदेश सीमेलगतच्या खेडदिगर, जवखेडा, ब्राह्मणपुरी आदी भागातही स्थिती समाधानकारक आहे. या तालुक्‍यांमध्ये उडीद काढणी जवळपास पूर्ण झाली असून, गहू, मका आदींच्या पेरणीसाठी शेती तयार करण्याचे कामही काही ठिकाणी सुरू झाले आहे.

गव्हाची पेरणी या भागात आगाप केली जाते. त्यावर उन्हाळ्यात मे महिन्याच्या मध्यात कपाशी लागवडीचे नियोजन असते, अशी माहिती मिळाली. तापीनदीवरील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचा लाभ शहादा व नंदुरबार तालुक्‍यातील गावांना रब्बीसाठी निश्‍चितच होईल.

खतांची गरज, काही साठा शिल्लक खरिपात हव्या त्या वेळी पाऊस नव्हता. त्यामुळे खते शिल्लक राहिली असून, त्यांचा उपयोग आता रब्बीसाठी होईल. शिल्लक खतांमध्ये संयुक्त खतांसह पोटॅश, सुपर फॉस्फेटचा समावेश असून, जवळपास सात ते आठ हजार मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. रब्बीसाठी जवळपास एक लाख ६५ हजार टन खतांची गरज असेल. त्यात एकट्या युरियाची ६५ हजार टन गरज भासू शकते. त्यापाठोपाठ संयुक्त खतांची २५ हजार, पोटॅशची २० हजार तर सिंगल सुपर फॉस्फेटची ३० हजार टन गरज भासेल. तसेच डीएपीचीदेखील १० हजार टन किमान गरज असेल. ही बाब लक्षात घेता खतांची मागणी करण्यात येणार आहे.

बियाण्याची गरज पूर्ण होणार जिल्ह्यात महाबीजकडून अपेक्षित बियाण्याचा पुरवठा होणार आहे. तसेच मका, गहू याचे बियाणे खासगी कंपन्यांकडूनही उपलब्ध करून घ्यावे लागेल. गव्हाचे जवळपास २५ हजार, मक्‍याचे चार हजार, ज्वारीचे दोन हजार तर हरभऱ्याचे १५ हजार क्विंटल बियाणे लागेल. अनेक शेतकरी महाबीजचे हरभरा बियाणे घेतात, त्या दृष्टीने महाबीजचे हरभरा बियाणे अधिक प्रमाणात उपलब्ध करून घेण्याकडे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा कल आहे.

जिल्ह्यात यंदा पाऊस हवा तसा नव्हता. अजूनही पाऊस पुरेसा नाही. नंदुरबार व शहादा तालुक्‍यातील पूर्व भागात गहू, मका यांची पेरणी फारशी होणार नाही. उडदाची काढणी अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. पाऊस जोरदार आला तर पेरणी अपेक्षित क्षेत्रावर होईल. - दशरथ पाटील,  शेतकरी, बामडोद (जि. नंदुरबार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com