अतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल : गुलाबराव डेरे

अतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल : गुलाबराव डेरे
अतिरिक्त दूध कमी झाले की दर वाढेल : गुलाबराव डेरे

राज्यात दूध दराचा गंभीर प्रश्‍न तयार झाला आहे. मुळात राज्यात वेगवेगळ्या साडेतीनशे नावांनी दूध विकले जात आहे. लोक वाट्टेल तो दर द्यायला तयार असतात; पण लोकांना गाईचे जे दूध पाहिजे ते मिळत नाही. राज्यात तब्बल दहा वर्षांपासून दुधाची तपासणीच केली जात नाही. भुकटी मिसळून तयार झालेले दूध विकले जात आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण होत आहे. अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न मिटला की दूध दराचा प्रश्‍न आपोआप संपेल. त्यासाठी शासनाने मात्र यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे.    - गुलाबराव डेरे,     अध्यक्ष, दूध उत्पादक कल्याणकारी संघ, नगर   ः ९८३४२८२८९५ ---------------------------------------------

राज्यात सहकारी संघ, महानंद ३५ लाख, खासगी संघ ९५ लाख; तर दूध व्यवसायातून थेट विक्री करणारे ७० लाख लिटर असे दोन कोटी लिटर दूध आहे. बाहेरच्या राज्यांतून जवळपास २३ लाख लिटर दूध राज्यात येत आहे. भुकटी मिसळून केलेल्या ‘टोन्ड’ दुधाला सरकारची परवानगी आहे. त्यामुळे शहरात भुकटीपासून तयार केलेले दूध वितरित होते. त्यामुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न निर्माण होत असून, अतिरिक्त दुधाचा प्रश्‍न सोडवायचा असेल तर भुकटीपासून तयार केलेले, बाजारात येणारे अनैसर्गिक दूध बंद झाले पाहिजे. दूध तपासून दर्जेदार दूध लोकांना मिळाले पाहिजे. मात्र आता तसे होत नाही. पूर्वी शहरात जाणारे दूध टोल नाक्‍यावर तपासले जायचे.

गेल्या दहा वर्षांपासून दूध तपासणी यंत्रणाच बंद आहे. दुधाची तपासणी करण्यासाठी साधारण आठ ते दहा भरारी पथके असावीत. सध्या राज्य सरकार केवळ पन्नास हजार लिटर दूध संकलन करते. त्यांच्याकडे मनुष्यबळ जास्त आहे. त्यामुळे तपासणीसाठी सरकारकडे असलेले लोक अन्न व भेसळ विभागाकडे वर्ग केली तर भरारी पथके करण्याला मदत होईल. तपासणी करणारे भरारी पथके सक्रिय राहून शहरात जाणारे दूध तपासले तर दर्जा नसलेले दूध आपोआप उघडे पडेल आणि या प्रभावी उपाययोजनेतून जवळपास पंचवीस लाख लिटर अतिरिक्त दुधाचा पुरवठा बंद होईल.

पूर्वी गावांत एका ठिकाणी दूध संकलन केंद्र असायचे. तेथे दुधाचे संकलन होत असे. आता मात्र खासगी संघवाले थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दूध संकलन करतात. त्याचाही दुधाच्या दर्जावर परिणाम होतो आहे. दुधाचा दर्जा काय आहे, हे संघात गेल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे असे संकलन बंद झाले पाहिजे. याशिवाय खासगी संघ चालकांनी दोन वेळा दुधाचे संकलन ही बाबही महत्त्वाची आहे. 

राज्यात २०१३ पासून ३.५ फॅटच्या वर प्रत्येक पॉइंटला तीस पैसे दर वाढवले आहेत; मात्र संघचालक वीस पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असून, चांगल्या दर्जाच्या दुधालाही दर मिळत नाही. त्यामुळे चांगल्या दर्जाचे दूध देण्याऐवजी पाणी टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. मुळात दूध उत्पादित करण्यासाठी एका लिटरला ३६ रुपये खर्च येतो. 

लोकांचा विश्‍वासच उडालाय

राज्याची लोकसंख्या साडेअकरा कोटी आहे. प्रत्येकी पावणे तीनशे ग्रॅम दुधाची गरज पाहिली तरी साडेतीन कोटी लिटर दुधाची गरज लागते. दूध खरेदी करणाऱ्या नागरिकांनी जास्त दराने खरेदी करावी लागल्याची कधी तक्रार केलेली नाही. लोकांना दर्जदार दूध हवे आहे. मात्र सध्याच्या दुधाबाबत लोकांचा विश्‍वासच उडाला आहे. दूध भेसळीमुळे अनेक लोकांनी दूध खाणेच सोडून दिले आहे. दुधापासून तयार केलेले पदार्थही अनेक लोक खात नाहीत. मागणी वाढली की दूध दराचा प्रश्‍न आपोआप सुटेल, मात्र दुधाला मागणी वाढण्यासाठी आता पुन्हा विश्‍वास निर्माण करावा लागणार आहे.   

बाहेरच्या दुधाला कर लावा राज्यात अतिरिक्त दूध असताना गुजरातमधून १८ लाख; तर कर्नाटकातून ५ लाख लिटर असे २३ लिटर दूध दररोज महाराष्ट्रात येत आहे. त्याचाही येथील दूध दरावर परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने बाहेर राज्यांतून येणाऱ्या दुधावर ३ रुपये प्रतिलिटर कर लावला तर बाहेरून येणाऱ्या दुधाला आपोआप चाप बसेल. खासगी संघ नेत्यांचे आहेत, त्यामुळे हितसंबंध जपण्यासाठी राज्य सरकार दूध व्यवसायाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.  -  गुलाबराव डेरे, संपर्क   ः ९८३४२८२८९५ (शब्दांकन ः सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com