सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटका

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. तालुक्‍यात सुमारे ४० गुऱ्हाळघरे आहेत. मात्र, मजूर टंचाईमुळे दरवर्षी गूळ निर्मिती करणाऱ्या गुऱ्हाळघरांची संख्या कमी होऊ लागली आहे. यामुळे गुळाचे उत्पादनही कमी होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या गूळ हंगामात गतवर्षीच्या तुलनेत गाळपात मोठी घट झाल्याची माहिती गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

शिराळा तालुका हा गूळ उत्पादक तालुका म्हणून ओळखला जातो. आजही या तालुक्याची अशीच ओळख आहे. तालुक्‍यात सुमारे ४० च्या आसपास गुऱ्हाळ घरे आहेत. मात्र, दरवर्षी मजूर टंचाईमुळे गूळ उत्पादन करणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. मुळात, या तालुक्‍यातील गुळाला नेहमीच दर चांगला मिळतो. गूळ उत्पादक शेतकरी गूळ विक्रीसाठी कऱ्हाड येथे नेतात. मात्र, यंदा सुरवातीलाच गुळाला ३ हजार प्रति क्विंटल असा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन करण्याकडे पाढ फिरवली. 

तसेच शिराळा तालुक्‍यात दोन साखर कारखाने असल्याने शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस देण्यास प्राधान्य दिले. गूळ हंगाम यंदा लवकर आटोपला असून गुळाच्या उत्पादनात २० टक्‍क्‍यांनी घट झाल्याची माहिती गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. तालुक्‍यात यंदाच्या हंगामात हाताच्या बोटावर मोजण्याइतके गुऱ्हाळ घरे सुरू झाली. एक गुऱ्हाळ घर दिवसाकाठी सर्वसाधारणपणे सरासरी १० टन इतके उसाचे गाळप करते. तालुक्‍यात सुमारे ८ ते १० गुऱ्हाळ घरे सुरू झाली.

एक गुऱ्हाळघर शंभर दिवस चालले दर प्रति दिवसाला १० टन म्हणजे शंभर दिवसाला एक हजार टन उसाचे गाळप होते. म्हणजे १० गुऱ्हाळ घरात सरासरी १० हजार टन उसाचे गाळप होते अशी माहिती गुऱ्हाळघर मालक अमर मुलाणी यांनी दिली. याचाच अर्थ गेल्या वर्षी पंधरा गुऱ्हाळ घरे सुरू होती. यंदाच्या हंगामात १० गुऱ्हाळ घरात गुळ उत्पादन झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५ हजार टन इतके ऊस गाळप कमी झाले.

मजुरांच्या कमतरतेमुळे गुऱ्हाळघर चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे दरवर्षी गूळ उत्पादन आणि ऊस गाळपात घट होत चालली आहे. त्याचा फटका गूळ उत्पादक आणि गुऱ्हाळघर मालकांना बसू लागला आहे. - अमर मुलाणी, गुऱ्हाळघर मालक, कोकरूड, ता. शिराळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com