जलयुक्त शिवार, परिवर्तनकारी गावांवर आज चर्चा

जलयुक्त शिवार, परिवर्तनकारी गावांवर आज चर्चा

पुणे : आळंदीत सुरू असलेल्या ‘सकाळ अॅग्रोवन’च्या सातव्या सरपंच महापरिषदेचा समारोप आज (ता.१६) राज्याचे मृद्‌ व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत होत आहे. परिषदेत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घडून आलेल्या ग्रामविकासाच्या मंथनामुळे गावाच्या विकासासाठी प्रोत्साहन आणि दिशा मिळाल्याची भावना सरपंचांमध्ये आहे.   महापरिषदेचे मुख्य प्रायोजक “फोर्स मोटर्स” हे असून स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेड, विक्रम चहा हे प्रायोजक आहेत. या उपक्रमासाठी राज्य शासनचा जलसंधारण विभाग, रोजगार हमी विभाग, पशुसंवर्धन विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान यांचाही सहयोग मिळाला आहे.  सरपंच महापरिषदेच्या दुसया दिवशाची सुरवात आज सकाळी पुण्याचे महसूल आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाने होईल. आयएएस अधिकारी असलेले श्री. दळवी हे मूळचे साताऱ्याच्या खटाव भागातील निढळ गावचे भूमिपुत्र असून मोठे पद मिळवूनही गावाला न विसरणारा अधिकारी गावशिवारासाठी किती झपाटल्यासारखे काम करतो याची माहिती श्री. दळवी यांच्याकडून निढळ गावाची यशोगाथा ऐकताना मिळणार आहे.  जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव प्रत्येक ग्रामपंचायतीत पोचले आहे. या अभियानाची पुढील वाटचाल आणि गावाची भूमिका कशी असेल याविषयी प्रा. शिंदे काय बोलतात याकडेही सरपंच मंडळींचे लक्ष लागून आहे. प्रा. शिंदे यांच्याकडून सरपंचांशी या वेळी थेट संवाद साधला जाणार आहे.   पाण्याच्या वापरासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीच्या प्रत्येक पाइपलाइनला वॉटर मीटर बसविणारी जुनोनी गाव राज्यात चर्चेचा विषय ठरले आहे. इस्राईलच्या धर्तीवर शेतीच्या प्रत्येक पाइपलाइनला वॉटर मीटर बसविण्याची किमया सोलापूरच्या सांगोला भागातील जुनोनी गावाने कशी साधली याची माहितीदेखील सरपंचांना मिळणार आहे. जुनोनी गावाचा हा प्रयोग सांगण्यासाठी प्रा. डॉ. भुपाल पाटील, संजय कांबळे, लक्ष्मण केंगार, भारत व्हनमाने आज सरपंच मंडळींशी खास संवाद साधणार आहेत.  कृषिविकास आणि ग्रामसमृद्धी कसे परस्परपूरक आहेत, कृषिकेंद्रित गाव घडविण्यासाठी कसे नियोजन करावे लागते याविषयी आज दुपारच्या सत्रात चंदू पाटील, अॅडव्होकेट विकास जाधव, सौ. शीतल गावडे या मान्यवर सरपंचांकडून आपले अनुभव सांगितले जाणार आहेत.  गावाचा विकास हा शेतीवर अवलंबून असून शेतीचे भवितव्य मातीच्या गुणवत्तेवर आहे. मातीचे महत्त्व राज्यभरात समजावून सांगण्यासाठी अॅग्रोवनकडून चालू वर्ष हे जमीन सुपिकता वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. गाव, ग्रामपंचायत आणि सरपंच यांची भूमिका जमीन सुपिकतेसाठी महत्त्वाची असल्यामुळे आज सरपंच महापरिषदेत जमीन सुपिकतेवरही चर्चा होणार आहे.  गाव आणि जमीन सुपिकता या विषयावरील खास परिसंवादात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लिमिटेडचे उपसरव्यवस्थापक संजय जगताप, कृषी आयुक्तालयातील मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते सहभागी होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com