गाव बदललेल्या सरपंचांनी दिला नियोजनाचा मूलमंत्र

गाव बदललेल्या सरपंचांनी दिला नियोजनाचा मूलमंत्र
गाव बदललेल्या सरपंचांनी दिला नियोजनाचा मूलमंत्र

आळंदी, जि. पुणे : आपल्या कामाचे नियोजन करा, ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका, विरोध होईल हे गृहीत धरून काम करीत राहा. पाच वर्षे असं काम करा, की पुढच्या पाच पिढ्या तुमचं नाव घेतील. अडचणींचा बाऊ करू नका. विकासाच्या कामात लोकसहभाग वाढवा. प्रामाणिक प्रयत्न वाया जात नाही. बदल निश्‍चित घडतो, असे आवाहन शुक्रवारी (ता.१६) यशस्वी, अनुभवी सरपंचांनी ‘ॲग्रोवन सरपंच महापरिषदे’त उपस्थित राज्यभरातील सरपंचांना केले. ‘आम्ही बदललं गाव’ या परिसंवादात  राजगडचे (जि.चंद्रपूर) सरपंच चंदू पाटील, बारडगाव सुद्रीकच्या (जि. नगर) सरपंच डॉ. शीतल गावडे, कळंबवाडीचे (जि. सोलापूर) सरपंच ॲड. विकास जाधव यांनी मार्गदर्शन केले. ‘ॲग्रोवन’चे सरव्यवस्थापक प्रमोद राजेभोसले यांनी वक्‍त्यांचा परिचय करून दिला. 

गावात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या ॲड. विकास जाधव म्हणाले, की या आधी झालेल्या सरपंच महापरिषदेमध्ये मिळालेल्या मार्गदर्शनाच्या शिदोरीवर मी माझ्या गावातील कामांची वाटचाल सुरू केली आहे. श्रमदानातून कामे करण्यावर भर दिला. आतापर्यंत विविध क्षेत्रांतील कामांसाठी आमच्या गावाला १० व व्यक्तिगत सरपंच म्हणून मला ४ पुरस्कार मिळाले आहेत. सुरवातीला केवळ ३५ हजारांचा निधी ग्रामपंचायतीकडे होता. लोकांच्या सहभागातून कामे करण्यावर भर दिला. जलसंधारण, हागणदारीमुक्ती ही कामे उच्च दर्जाची झाली. मूलभूत सुविधा देण्यावर भर दिला. १०५० लोकसंख्येच्या गावात आम्ही महिलांचे १० बचत गट सुरू केले. त्यातून त्यांना स्वयंरोजगार मिळवून दिला. गावात रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. उत्पादक कामांवर लक्ष केंद्रित करा डॉ. शीतल गावडे म्हणाल्या, की माझे २००५ ला लग्न झाले. बारडगावात क्‍लिनिक सुरू केले. याच काळात गावात दुष्काळाची परिस्थिती होती. पेशंटची संख्या घटली. डॉक्‍टरला इतका फटका बसतो, तर ज्याचा चरितार्थ शेतीवर आहे, त्याचे नुकसान किती मोठे असेल? या विचाराने अस्वस्थ झाले. ठरवून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवरून योजनांची माहिती घेतली. त्या गावात राबविण्यावर भर दिला. २ वर्षांच्या अभ्यासातून ‘करू या जलसाक्षर बारडगाव’ हे पुस्तक लिहिले. उत्पादक कामांवर मी कायम लक्ष केंद्रित करते. अडचणी हळूहळू कमी होत जातात हा माझा अनुभव आहे.

अहंकार सोडून विकासकार्यात उतरा चंदू पाटील म्हणाले, की अहंकार सोडून गावासाठी विकासकार्यात उतरा; तुमचा उद्देश प्रामाणिक असेल तर लोक साथ देतातच.  ग्रामपंचायतीचे उत्पन्न कमी असतानाही गेल्या अठरा वर्षांत वाहते सांडपाणी, रोगराई, वाढलेली बेरोजगारी अशा समस्यांच्या गर्तेतून मी गावाला बाहेर काढू शकलो आहे. हे काम अजूनही सुरूच आहे. मात्र ठरवलं तर बदल घडू शकतो हे मी जवळून पाहिलं आहे. गावातील गटारी स्वच्छ करण्याच्या कामापासून श्रमदानाला सुरवात केली. उकिरड्यांचं रूपांतर मोठ्या कष्टांने नंदनवनात झालं. सार्वजनिक शौचालयांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविले. विकासासाठी लोकांची मानसिकता बदलवली. ग्रामपंचायतीची इमारत १० हजार चौरसफुटांची सुसज्ज अशी तयार केली आहे. गाव महोत्सवसारखे उपक्रम राबविण्यावर भर दिला. केवळ भांडत बसू नका. निधीची वाट पाहत बसू नका. काम सुरू करा. आपोआप मार्ग सापडत जातो, असेही त्यांनी सांगितले. ...तर माझे गाव देशात आदर्श बनले असते चंदू पाटील म्हणाले, की माझ्या गावाला २ राष्ट्रपती पुरस्कार तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मागील १८ वर्षांपासून लोकांच्या आग्रहाने बिनविरोध सरपंच होत आहे. सर्व प्रकारचे पुरस्कार मिळूनही आमचे काम थांबलेले नाही. सुरवातीला माझं जरा चुकलं. आधी गावाचा प्लॅन तयार करायला हवा होता. त्या वेळी जर अशी सरपंच महापरिषद असती तर माझे गाव आज देशात आदर्श बनले असते. पाटील यांच्या विधानाला सभागृहातील सरपंचांनी टाळ्यांच्या कडकडाट करत दाद दिली. सरपंचांनी दिलेल्या टिप्स

  • अभ्यासाचा ध्यास घ्या.
  • निधी कमी असताना श्रमदानावर भर द्या.
  • गावातून स्थलांतरित झालेल्यांची यादी करा.
  • छोट्या सामाजिक कार्यात लोकसहभाग वाढवा.
  • एक काम हाती घेतलं की ते पूर्ण होईपर्यंत थांबू नका.
  • एका वेळी एका विषयावर फोकस करा.
  • आपल्या प्रश्‍नांची उत्तरे शोधाच शोधा. 
  • केवळ भाषणे नकोत; कृतीवर भर द्या. 
  • मानसिकता बदलण्यावर भर द्या.
  • व्यवस्था बदलत बसू नका; आपले काम मार्गी लावण्यावर भर द्या.
  • गावाच्या विकासाचा प्लॅन तयार करा.
  • काम, रेकॉर्ड आणि प्रेझेंटेशन याकडे नीट लक्ष द्या.
  • टीका आणि भांडणे यापासून दूर राहा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com