साडेसहा हजार शेतकऱ्यांचे तुरीचे चुकारे थकले

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या जुलै-आॅगस्ट महिन्यात बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या ८३ हजार ४८७ क्विंटल तुरीचे ६ हजार ६१४ शेतकऱ्यांचे ४२ कोटी १६ लाख ११ हजार ८७५ रुपये चुकारे थकले आहेत.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील १३ खरेदी केंद्रांवर डिसेंबर २०१६ ते ३१ आॅगस्ट २०१७ या कालावधीत आधारभूत किंमत दराने शासनातर्फे ३२ हजार ९०३ शेतकऱ्यांची ४ लाख ७८ हजार ०२१.८५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गतवर्षी खुल्या बाजारातील दर आधारभूत किंमती पेक्षा कमी झाल्यामुळे डिसेंबर अखेरपासून नाफेड, भारतीय अन्न महामंडळ, विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यामार्फत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हादगांव, भोकर, धर्माबाद, देगलूर या ५, परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, गंगाखेड या ५ केंद्रावर आणि हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, जवळा बाजार या ३ केंद्रांवर अशी एकूण १३ केंद्रांवर आधारभूत किंमत (५,०५० रुपये प्रतिक्वंटल) दराने तूर खरेदी करण्यात आली.

अपुरे वजनकाटे, साठवणुकीसाठी अपुरी गोदाम व्यवस्था तसेच अपुरा बारदाणा पुरवठा, प्रतवारीवरून ग्रेडर आणि शेतकरी यांच्यातील वाद आदी कारणांवरून तूर खरेदी बंद राहू लागल्यामुळे या केंद्रांवर वजनमापासाठी २० ते २५ दिवस शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. त्यानंतर केंद्रावर शिल्लक राहिलेल्या तुरीमुळे एप्रिलनंतर तब्बल ६ वेळा मुदत वाढ देण्यात आली. 

मुदतवाढीच्या कालावधीत राज्य सरकारने डिसेंबर ते आॅगस्टअखेरपर्यंत नांदेड जिल्ह्यात ११ हजार ५५३ शेतकऱ्यांची १ लाख ९७ हजार ४७७.५० क्विंटल, परभणी जिल्ह्यात १७ हजार ४६९ शेतकऱ्यांची २ लाख २२ हजार ५३१.३५ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ३ हजार ८८१ शेतकऱ्यांची ५८ हजार ०१३ क्विंटल अशी एकूण ३२,९०३ शेतकऱ्यांची ४,७८,०२१.८५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तुरीची एकूण किंमत २४१ कोटी ४० लाख १० हजार ३४२ रुपये होते.

राज्य शासनाच्या बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत ३१ आॅगस्टपर्यंत टोकन दिलेल्या शेतकऱ्यांची तूर पडताळणीनंतर २७ जुलै ते ३१ आॅगस्ट या कालावधीत खरेदी करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात २ हजार ०१३ शेतकऱ्यांची २३ हजार १९८.५० क्विंटल, परभणी जिल्ह्यात ४ हजार ०२२ शेतकऱ्यांची ४९ हजार ४१७.५० क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ५७९ शेतकऱ्यांची १० हजार ८७१.५० क्विंटल अशी एकूण ६ हजार ६१४ शेतकऱ्यांची ८३ हजार ४८७.५० क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून या तूरीचे एकूण ४२ कोटी १६ लाख ११ हजार ८७५ रुपये चुकारे थकले आहेत.

खरेदी बंद होऊन तब्बल २३ दिवसाचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप या शेतकऱ्यांना तूरीचे चुकारे मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांना थकित चुकारे अदा करण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. लवकरच शेतकऱ्यांना चुकाऱ्यांच्या रक्कम मिळेल, असे नांदेड जिल्हा विपणन अधिकारी आर. डी. दांड यांनी सांगितले.

नांदेड, परभणी, हिंगोली  जिल्ह्यातील थकित चुकारे स्थिती

जिल्हा तूर ( क्विंटल) शेतकरी
नांदेड २३,१९८.५० २०१३
परभणी ४९,४१७.५०  ४,०२२
हिंगोली १०,८७१.५०  ५७९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com