सव्वासात लाख हेक्‍टरवर पेरणी प्रस्तावित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : येत्या खरीप हंगामात औरंगाबाद जिल्ह्यातील ७ लाख १८ हजार हेक्‍टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७ लाख २१ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या ४८ हजार ९६४ क्‍विंटल बियाण्यांची गरज भासणार असून ३ लाख ४ हजार ७४० मेट्रीक टन खताची मागणीही नोंदविण्यात आली आहे.  औरंगाबाद येथील वाल्मीच्या सभागृहात शुक्रवारी (ता. २७) औरंगाबाद जिल्ह्याची खरीप आढावा बैठक पार पडली. २०१८-१९ या हंगामात कडधान्याचे क्षेत्र ६० हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले आहे. गळीतधान्याचे क्षेत्र २३ हजार हेक्‍टरवर प्रस्तावित करण्यात आले असून, सोयाबीन व भूईमूग या पिकाचा आंतरपीक पद्धतीत नावीन्‍यपूर्ण समावेश करण्यावर भर राहणार आहे. तर १ लाख ९७ हजार हेक्‍टरवर मकाचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. कमी पावसातही शाश्वत उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा बाजरी पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे या पिकाचे क्षेत्र ३८ हजार ७२५ हेक्‍टवर प्रस्तावित करण्यात आले आहे. 

गुणवत्ता नियंत्रण अभियानासाठी जिल्हास्तरावर सहा, उपविभागस्तरावर सहा व तालुकास्तरावर १८ असे एकूण ३० गुण नियंत्रण निरीक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात बियाण्यांचे ७३७, खताचे ७८३, कीटकनाशकांचे ३३५ नमुने काढण्याचे उद्दीष्ट निश्चीत करण्यात आले आहे. उत्पादन वाढण्यासाठी दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी शासन आग्रही असून, शेतकऱ्यांची या प्रकरणी फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री डॉ. सावंत यांनी  सांगितले. 

कपाशीच्या क्षेत्रात घट अपेक्षीत औरंगाबाद जिल्ह्यात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ३७ हजार हेक्‍टर आहे. परंतू वाढता उत्पादन खर्च, गुलाबी बोंड अळीचे आक्रमण लक्षात घेता यंदा ३ लाख ७७ हजार हेक्‍टरवरच कपाशीची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे. स्थानिक सिंचन उपलब्धतेनुसार जिल्ह्यातील पैठण, गंगापूर, कन्नड व वैजापूर तालुक्‍यांतील काही भागात कापूस पिकाचे क्षेत्र ऊस या पिकाखाली परावर्तित होत असताना दिसून येत आहे.

सव्वादोन लाख टन खत मंजूर औरंगाबाद जिल्ह्यात गत तीन वर्षाचा आढावा घेता सरासरी २ लाख २२ हजार ९१५ टन रासायनिक  खताचा  वापर केला जातो. तर प्रत्यक्षात १ लाख ८७ हजार ६८२ टन रासायनिक खताची विक्री होते. येत्या खरीप हंगामासाठी पाच प्रकारच्या खतांची ३ लाख ४ हजार ७४० टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली. त्या तुलनेत २ लाख २७ हजार ३०० टन रासायनिक खताचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. 

बहुतांश लोकप्रतिनिधींची दांडी शेतकऱ्यांच्या खरीप आढाव्यात प्रशासनाचे नेमके नियोजन काय, त्यामध्ये कोणत्या बाबींचा अंतर्भाव असावा याची संधी या बैठकीच्या निमित्ताने लोकप्रतिनिधींना मिळते. परंतु, जिल्ह्यातील नऊपैकी सात आमदार या बैठकीला हजर नव्हते. पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संदीपान भूमरे, आमदार अब्दूल सत्तार, जिल्हा परिषद अध्यक्ष ॲड. देवयानी डोणगावकर यांचीच सभेला उपस्थिती होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com