agriculture news in marathi, agrowon, special article on animal husbundary | Agrowon

पशुधन विकासात आपण मागे का?
बॉन निंबकर
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

आपणही आपले प्राणी सुधारायचे नाहीत आणि दुसऱ्यांनाही सुधारू द्यायचे नाहीत, अशा कूपमंडूक वृत्तीमुळे आपण पशुधन विकासात आज फार मागे पडलो आहोत. ही वृत्ती आणि शुद्धतेचा आग्रह या दोन्ही गोष्टी आपण कधी सोडणार आहोत की नाही?
 

गुरुवार १४ सप्टेंबरच्या अॅग्रोवनमध्ये डॉ. स्वामिनाथन यांच्या पुणे भेटीची बातमी आली होती. पुण्यात बायफ येथे बोलत असताना ते म्हणाले की ‘‘पीक विज्ञानापेक्षा पशुविज्ञानाचा विस्तार वेगाने होत आहे, मात्र शेती संरचनेतून पशुधन बाजूला गेल्याने पशुधनाचे योग्य पोषण हेदेखील एक आव्हान आहे.’’ आपल्याकडे पशुविकास इतका दुर्लक्षित का आहे याचा विचार करता एक कारण मला असे वाटते, की आपल्याकडे शुद्धतेवर खूप भर आहे. जातिव्यवस्थेत वंशाची शुद्धता कायम राखणे हेच महत्त्वाचे मानले जाते. प्राण्यांचा संकर करून त्यामध्ये सुधारणा करणे म्हणजे या शुद्धतेला धक्का पोचवणे. 
दुसरे म्हणजे आपल्या पशुशास्त्रज्ञांचा आग्रह केवळ उत्तम नर असणे एवढाच असतो. प्रजोत्पादनात अर्धा सहभाग मादीचा असतो, हे साधे जनुकीय शास्त्र त्यांच्या लक्षात कसे येत नाही? यातील फोलपणा समजण्यासाठी शेतीचे उदाहरण घेता येईल. बीज कितीही उत्तम असले तरी रुजण्याचे माध्यम म्हणजेच जमीन चांगली नसेल तर चांगले पीक येईल का? पुरुष किंवा नराला अवास्तव महत्त्व देणे हा प्राचीन काळापासून चालत आलेला मूर्खपणा आहे. या असल्या मानसिकतेमुळे आपण आपले प्राणी कधीच सुधारू शकलेलो नाही.
पशुसंशोधनात आपण मागे असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे आपण पुरेशा नोंदी ठेवत नाही. मी अर्धा अमेरिकन आहे. माझ्या सर्व पूर्वजांची अगदी तपशीलवार माहिती मला पुस्तकांतून सापडते. परदेशांत नोंदींचे महत्त्व फार आहे. आपल्याकडे अर्धवट नोंदी ठेवल्या जातात. मी त्र्यंबकेश्वरला गेलेलो असताना तिथल्या भटजीबुवांनी पत्रावळ्या काढून माझे आजोबा आणि पणजोबा तिथे कधी आले होते ते सांगितले. काशीलाही असे सांगतात. पण तेवढीच माहिती त्यांच्याकडे असते. अमुक साली तुमचे तमुक आले होते. बस एवढेच! याउलट माझ्या आईच्या बाजूच्या लंडी कुटुंबाबद्दलच्या पुस्तकात कुणाचे कुणाशी लग्न झाले, जन्म, मृत्यू, सगळ्यांचे व्यवसाय, सगळ्यांच्या भानगडी यांची तपशीलवार माहिती आहे. ही संस्कृती आपल्याकडे नाही. आता कुठे जरा नोंदी ठेवणे सुरू झाले आहे. पशुविकासात किंबहुना एकूणच संशोधनात नोंदींना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उत्तम संतती मिळवण्यासाठी जनुकांची सरमिसळ होणे आवश्यक असते. हायब्रीड व्हिगर किंवा संकरित जोम वाढायचा असेल तर शुद्धता काही कामाची नाही. आज जगातील आपण सर्व लोक हे वेगवेगळ्या वंशांचे मिश्रण आहोत. पूर्ण शुद्ध लोक अतिशय कमी राहिले आहेत आणि अंत:प्रजननामुळे (इन्ब्रीडिंग) ते विनाशाच्या दिशेने चालले आहेत. जातिव्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात अंत:प्रजनन होते. यामुळे हृदयाचे आजार होण्याचे तसेच चेतासंस्थेशी निगडित विकारांचे प्रमाण वाढते. याचे मुख्य कारण अंत:प्रजनन हेच आहे. असे असताना आपण मूर्खासारखे शुद्धतेचा आग्रह का धरत आहोत? मला जेव्हा लोक म्हणायचे की हायब्रीड मका नको, तेव्हा मी त्यांना विचारायचो की मग तुम्हाला हायब्रीड निंबकर कसा काय चालतो?  
याबद्दल एक गंमत सांगतो. आपल्याकडे बऱ्याच स्थानिक शेळ्या फार दूध देत नाहीत; पण आम्हाला फलटणजवळच्या एका खेडेगावात एक भरपूर दूध देणारी शेळी सापडली. मालकाशी बोलल्यानंतर असे लक्षात आले की त्या शेळीची आई नारायणगावच्या सानेन जातीच्या बोकडाशी संकर केलेली होती, आणि त्यामुळे तिच्यात भरपूर दूध द्यायचा गुणधर्म आला होता. आफ्रिकन बोअरशी संकर केल्याने आज आपल्याकडच्या बऱ्याच शेळ्या मटणासाठी उत्तम बनल्या आहेत. 
पशुधन विकासात आपण मागे असण्याचे आणखी एक कारण म्हणजे प्राण्यांसोबत काम करणे हे आपल्याकडे खालच्या दर्जाचे मानले जाते. गवळी, धनगर, कातडीकाम करणारे, कत्तल व्यवसाय करणारे यांच्याकडे कुणी आदराने पाहत नाही. क्षत्रियांकडेही घोडे होते; पण ब्राह्मण या सर्वोच्च जातीने प्राण्यांना स्वतःकडे फिरकूही दिलेले नाही. गाईची पूजा एवढाच काय तो त्यांचा प्राण्यांशी संबंध. त्यालाही ३३ कोटी देवांची आणि अतिशुद्धतेची जोड दिल्याने काम सोपे झाले.
माझ्या मुलीची नुकतीच साबरमती आश्रम गोशाळेच्या व्यवस्थापकांशी भेट झाली. त्यांनी सांगितले, की होल्स्टीन संकरित गाईंचा प्रोजेनी टेस्टिंग कार्यक्रमातून विकास गेली २० वर्षे चालू आहे. परंतु अचानक केंद्र सरकारने निर्णय घेतला की यापुढे यासाठी केंद्र सरकार कुठलेही अनुदान देणार नाही. होल्स्टीनच्या संकरातून निपजलेले बैल आता इथून पुढे प्रजननासाठी वापरायचे नाहीत असा आदेश आहे. २० वर्षांचे काम गेले वाया! आता ‘अशुद्ध’ झालेल्या गाईंना मारून टाका, असे ते अर्थातच म्हणलेले नाहीत. परदेशी अशुद्ध गाईंच्या पोटातही देव असतात का? जर नसतील तर त्यांचे मांस खायला काय हरकत आहे; आणि असतील तर अशुद्धतेची काय भानगड आहे?
सेंटर फॉर इंटरनॅशनल ट्रेड इन अॅग्रिकल्चर अँड अॅग्री-बिझनेसेसतर्फे (CITA) १६ सप्टेंबरला मुंबईत आयोजित केलेल्या विशेष बैठकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले, की ब्राझील देशाने १९ व्या शतकात भारतातील तिरुपती परिसरातून नेल्लोर जातीच्या गाई नेल्या. तसेच गुजरातमधून ओंगल आणि गीर या जातीही नेल्या. तिथे त्यांचे वेगवेगळ्या जातींशी संकर करून आज ब्राझीलने भरपूर फायदा मिळवला आहे. ‘नेल्लोर बीफ’ हे आज जगभरात उत्तम मानले जाणारे गाईचे मांस आहे. केवढा हा विरोधाभास! 
पण आज भारतीय पशूंच्या जाती परदेशांत विकायला परवानगी नाही. आपण आपल्या जाती परदेशांत दिल्या तर आपल्या येथील जैवविविधता कमी होईल, अशी आपल्या लोकांची एक विचित्र आणि हास्यास्पद संकल्पना आहे. आपणही आपले प्राणी सुधारायचे नाहीत आणि दुसऱ्यांनाही सुधारू द्यायचे नाहीत. अशा कूपमंडूक वृत्तीमुळे आपण पशुधन विकासात आज फार मागे पडलो आहोत. ही वृत्ती आणि शुद्धतेचा आग्रह या दोन्ही गोष्टी आपण कधी सोडणार आहोत की नाही?

बॉन निंबकर
 ः ०२१६६-२६२१०६
(लेखक निंबकर कृषी संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)
शब्दांकन : मधुरा राजवंशी

इतर संपादकीय
आज मराठवाडा मुक्तीदिन ! संग्रामाला झाली...15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला...
‘आयपीएम’चा विसर नकोआयपीएम अर्थात एकात्मिक कीड नियंत्रण तंत्राचा वापर...
खाडी से नही, अब तेल आयेगा बाडी सेभारतीय जनता पार्टीचे छत्तीसगड राज्याचे ...
पीककर्ज द्याऽऽऽ पीककर्जखरे तर हंगामाच्या सुरवातीस पेरणीकरिता शेतकऱ्यांना...
शास्त्राशी सुसंगत असावीत शेतीची कामेआपल्या देशातील शेतीचा तीन हजार वर्षांचा ज्ञात...
इंडिया-भारतातील दरी करा कमी हरितक्रांतीमुळे उत्पादनात लक्षणीय प्रमाणात वाढ...
स्थलांतर थांबविणारा विकास हवारवांडा येथील किगॅली येथे आंतरराष्ट्रीय युवा परिषद...
पांढरे सोने झळकेल!या वर्षी बोंड अळीच्या भीतीपोटी राज्यात आणि देश...
न परवडणाऱ्या क्षेत्रात थांबणार कोण?अलीकडे उद्योग व सेवाक्षेत्रातील रोबोच्या (यंत्र...
‘सिल्क रूट’ व्हावा प्रशस्तरेशीम कोष असो अथवा इतर शेती आणि शेतीपूरक...
अव्यवहार्य नियंत्रणाची अंमलबजावणी अशक्यप्रस्तावातील एका नियमानुसार, अधिसूचित...
सहकारी बॅंकांनी असावे सजग सहकारी क्षेत्रात बॅंक स्थापनेसाठी निकष...
पशुधनालाही हवे दर्जेदार खाद्य दुग्धोत्पादनाला चालना देण्यासाठी पंजाब सरकारने...
प्रत्येक डोळ्यातील अश्रू मिटवू या...३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधी यांच्या...
अनियंत्रित कीड नियंत्रणराज्यात मागील १५ ते २० दिवसांपासून सतत ढगाळ...
हमला लष्करी अळीचाआफ्रिका खंडात कहर केल्यानंतर लष्करी अळीने (आर्मी...
विनाशकारी विकास नकोचइस्त्रोचे माजी अध्यक्ष डॉ. माधवन नायर सुद्धा...
‘मिशन’ फत्ते करासेंद्रिय शेती-विषमुक्त शेतीच्या राज्य पुरस्कृत...
ताळेबंदातील हेराफेरी ः एक वित्तीय संकटसहकारी संस्था/ बॅंकांमध्ये ताळेबंदाला फार महत्त्व...
उपसाबंदीपेक्षा नैसर्गिक पुनर्भरण करा!महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) नियम, २०१८...