आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून?

जमिनीत पाण्याचा साठाच राहिलेला नाही, मग पाणी येणार कोठून? थोडक्यात आडातच नाही, तर पोहऱ्याने पाणी काढण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. यामुळे पर्यावरणाची खूप मोठी हानी होत आहे. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.
संपादकीय
संपादकीय

दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा स्पर्धा सुरू आहे. जमिनीत पाणी नाही आणि आपण सामान्य माणूस बोअर घेऊन अधिकच अडचणीत येत आहोत. मटका किंवा लॉटरी लावल्यासारखे देवावर भरोसा ठेवून आणि फुफाटा काढून नशिबाला दोष देत आहोत. पाणी लागलेच तर एक महिना किंवा दोन महिनेसुद्धा टिकत नाही. जमिनीत पाण्याचा साठाच राहिलेला नाही मग पाणी येणार कोठून? थोडक्यात आडातच नाही, तर पोहऱ्याने पाणी काढण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. यामुळे पर्यावरणाची खूप मोठी हानी होत आहे व त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत.

पाणी ही मूलभूत गरजापैकी एक गरज आहे त्यामुळे आपले गाव, पाडा, वाडा, वस्ती, शहर, पाण्याजवळ वसलेले आहे. जगात जवळपास ९० टक्के वस्त्या या नदीकाठावर वसलेल्या आहेत. भारतात तर बहुतांश धार्मिक स्थळ नदीकाठी आहेत. जगातील सर्व संस्कृतींचा विकास नदीकाठावर झालेला आहे. हडप्पा, मोहनजोंदडो, इजिप्तची सांस्कृती पाच हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होत्या त्यासुद्धा नदीकाठी होत्या. पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही म्हणून मानवी वस्ती नदीकाठावर आढळते. पण आज नदीला पाणी राहिले नाही. त्यामुळे विहिरींचा शोध लागलेला आहे. बायबलमधे विहिरीचा उल्लेख आहे. ज्या भागात कमी पाऊस पडतो व वर्षभर नदीला पाणी नसते अशा ठिकाणी विहीर खोदून पाण्याची गरज भागवली जाते. आपण पाण्याचा बेसुमार वापर करत असल्याने पाणी पातळी ३०० ते ४०० फुटांवर गेलेली आहे. तसेच काही भागात तर ७०० ते १००० फूट खोलवर पाणीपातळी गेलेली आहे. आपण ५० हजार ते एक लाख रुपये खर्च करून हजार फुटांपर्यंत सहा आणि आठ इंच बोअर घेत आहोत. शंभरपैकी दहा बोअरलासुध्दा पाणी लागत नाही आणि ज्यांना पाणी लागलेले आहे ते क्षारयुक्त असते. त्याचा वापर आपण पिण्यासाठी करू शकत नाहीत. क्षारयुक्त पाणी पिकासाठी वापरल्यास त्यापासून जमीन नापिक बनण्याची भीती आहे. आपण ते पाणी पिण्यासाठी वापरतो, त्यामुळे अनेक पोटाचे आजार उद्भवत आहेत. अशा आजारांवर भरमसाठ खर्च करावा लागत आहे. पाणी शुद्ध असेल तर माणूस क्वचितच आजारी पडतो, पण आपल्याला शुद्ध पाणी मिळत नाही. आपण पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतो आणि आजार ओढवून घेतो, हे आपल्या लक्षातही येत नाही. 

हलके पाणी व जड पाणी असते हे आपल्याला माहिती आहे. जड पाणी हे समुद्रातील खारे पाणी किंवा जास्तीत जास्त क्षार असलेले पाणी असते. हलके पाणी हे गोड असते व ते नदी, तलाव आणि भूगर्भात असते. हलके पाणी शुद्ध असते व ते जमिनीच्या वरच्या भागात असते. म्हणून विहिरीचे पाणी गोड लागते तसेच जे बोअरवेल १०० ते १८० फूट असतात तेच पाणी शुद्ध व गोड असते. मग आपण उगाचच खूप सारा पैसा खर्च करून अशुद्ध व जमीन नापिक करणारे पाणी अतिखोल बोअरद्वारे काढत आहोत. आपण म्हणाल की, इतर वापरासाठी बोअरवेलचे पाणी वापरल्यास काय हरकत? हा प्रश्न आपला योग्य आहे, पण आपण हे कधी लक्षात घेत नाहीत की, जनावरांना क्षारयुक्त पाणी योग्य नाही. तसेच क्षारयुक्त पाण्याने कपडे धुतल्यास कपडे खराब होतात. आपले आरोग्य व पर्यावरणाचा धोका टाळण्यासाठी आपण २०० फुटांपेक्षा जास्त खोल बोअरवेल घेऊच नये.  

शुद्ध पाण्याची गरज भागविण्यासाठी शासन, सामाजिक संस्था काम करत आहेत. पण आजपर्यंत आपण ६० टक्के सुद्धा गावांची शुद्ध पाण्याची गरज भागवू शकलो नाहीत. याची अनेक करणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे पाण्याची पातळी खालवलेली आहे. खालावलेली पाणी पातळी भरून काढण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करत नाहीत. शासन किंवा सामाजिक संस्था काम करतात तर त्यास गावातील लोकांचा आवश्यक तेवढा सहभाग मिळत नाही. ही गरज असते आपली, पण आपण सहज बोलून जातो ते शासनाचे काम आहे. असे बोलून आपण हात झटकून मोकळे होतो. म्हणून मग त्यामध्ये भ्रष्टाचाराला वाव मिळतो व कामाचा दर्जा घसरतो.  पानाडे व बोअरवेल मशिनवाले यांचा धंदा जोरदार सुरू आहे. मशीन मालकाने गावोगाव एजंट व पाणी सांगणारे नेमलेले आहेत. पानाड्यांचे आश्चर्य वाटते की, त्यांनी कधी पाणी बचत, साठवणूक किंवा पाणी व्यवस्थापन यासाठी काम केलेले नाही. त्यांचे शिक्षणसुद्धा झालेले नाही पण मला पाणी कळते, अशा जाहिराती ते करत असतात. जर एखाद्याला पाणी लागले तर त्याचा संदर्भ देऊन सामान्य जनता लुटली जात आहे. दुष्काळात अमूक ठिकाणी बोअरला पाणी लागले, फवारे उडत आहेत, अशी प्रसिद्धी देणे मीडियाने सुद्धा टाळले पाहिजे. यातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसगत होऊ शकते, हे लक्षात घ्यायला हवे. पाण्याचे योग्य संवर्धन आणि कार्यक्षम वापर हाच शाश्वत पाण्याचा मूलमंत्र आहे. उगाच बोअरवेल च्या माध्यमातून जमिनीत खोल खोल पाणी शोधत बसू नये, हे शेतकऱ्यांना माझे सांगणे आहे.                              

संजय शिंदे ः ९८५०५२३९६९ (लेखक शेती- पाणीप्रश्नांचे  अभ्यासक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com