agriculture news in marathi agrowon special article on exhibition on farmers photograph by small kid | Agrowon

चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरी
DR. NAGESH TEKALE
सोमवार, 21 मे 2018

अनेकजण शेतकऱ्यांचे दु:ख शोधतात, मात्र छोट्या रुनिलने त्यांच्यामधील फक्त आनंद शोधला, तो कॅमेरात बंद केला आणि जनतेसमोर छायाचित्रांमधून सादर केला. 

आपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर अर्थात नकारार्थीच असू शकते. काही अपवाद वगळता प्रसारमाध्यमांमधून शेतकरी हा अतिशय दु:खी, गरीब, अन्याय झेलणारा, परिस्थितीस तोंड देत खचून गेलेला असेच चित्रण असते. यात चूक असे काही नाही. मीसुद्धा आतापर्यंत शेकडो अल्पभूधारक कोरडवाहू शेतकऱ्याशी संवाद साधला असता दु:खाशिवाय त्यांच्याकडे कसलीही श्रीमंती नव्हती. आनंदी शेतकऱ्यांच्या शोधात भटकत असताना तो मला अरुणाचल प्रदेश, मेघालयमध्ये भेटला; पण त्यांच्या आनंदाचा निर्झर शेताभोवतालच्या घनदाट जंगलातच जास्त वसलेला होता. जंगलांच्या, वृक्षांच्या सहवासात केलेली शेती आनंददायी आणि ताणतणाव विरहित असते. आनंदी शेतकरी मी सिक्कीम आणि भूतानलाही पाहिला. पुढे मला तो ‘फिलिपिन्स’मध्येही भेटला. हे सर्व सेंद्रिय शेतीचे पुजारी होते. अगदी मागच्या महिन्यात तो मला मुंबईतसुद्धा भेटला; मात्र एका छायाचित्र प्रदर्शनात. 

१३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत मुंबईमध्ये भरलेले निवडक छायाचित्रांचे एक सुरेख प्रदर्शन निमदरी (ता. जुन्नर) या लहानशा गावामधील आनंदी शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या हिरव्या तसेच फुललेल्या शेतांचे होते. हजारो मुबंईकरांनी भेट दिलेले हे प्रदर्शन सहा वर्षांचा एक मुलगा रुनिल सोनावणे या छायाचित्रकाराचे होते. या चिमुकल्या जिवाने गळ्यात जड कॅमेरा अडकवून शेतकरी, त्यांची शाश्वत शेती, पशुधन, भाजीपाला, वाहती नदी आणि फुलांना कॅमेरात बंद केले होते. या छायाचित्र प्रदर्शनाचे दूरदर्शन आणि वृतपत्रांमधून खूपच कौतुक झाले. रुनिलने वयाच्या चवथ्या वर्षापासून केलेली ही मेहनत आहे. जुन्नरपासून ८ कि.मी.अंतरावर, जेमतेम ३५०० लोकसंख्या असलेले निमदरी हे गाव ‘मीना’ नदीच्या काठावर वसलेले आहे. शिवनेरी किल्ला येथून जवळच असल्यामुळे या गावास शिवाजी महाराजांच्या इतिहासाचीही जाण आहे. गावातील अल्पभूधारक शेतकरी खाऊन पिऊन सुखी, आनंदी वाटला. मुख्य गाव निमदरी आणि त्याच्या परिसरामधील ५-६ वाड्या शेतकऱ्यांच्याच आहेत. शेतीमुळे या गावाचा खूपच विकास झाला आहे. भात, गहू, सोयाबीन, ऊस या मुख्य पिकांबरोबरच येथील शेतकरी कलिंगड, खरबूज, भाजीपाला, कांदा, बीट, झेंडू यांचेही उत्पादन घेतात. आंबा आणि चिकूच्या अनेक बागा आहेत. 

निमदरी परिसर आणि जुन्नरचा सर्व भाजीपाला नवी मुंबईत वाशी मार्केटला जातो. फुले पहाटेच दादरच्या फुलबाजारात पोचतात. मे महिन्याच्या शेवटी मुंबईत येणारा हापूस याच परिसरामधील आहे. या गावावर आतापर्यंत एकही कृषी आपत्ती आलेली नाही. येथील शेतकऱ्यांमध्ये कायम सकारात्मक विचार असतात यामुळेच कांदा, फुलांचे भाव गडगडले असतानाही त्यांना आतापर्यंत रस्त्यावर फेकून कुणी तुडविले नाही. गावामधील मंदिरात भजन, किर्तन, सप्ताह नेहमीच चालू असतात आणि सायंकाळी शेतकऱ्यांची त्यास कायम गर्दी असते. सकारात्मक विचारांची येथेच निर्मिती होते. या गावाने महाराष्ट्रास नामवंत कीर्तनकार दिले आहेत.

गावाजवळील नदीला बारमाही वाहते पाणी उपलब्ध आहे. जवळच २ कि.मी अंतरावर ‘वडज’ धरण आहे. याचाही शेतकऱ्यांच्या आनंदात सहभाग आहे. वृक्षसंपदाही चांगली आहे. छायाचित्र प्रदर्शनात शेतामधील पिके, खळाळून वाहणारी नदी, विसावलेली बैलगाडी, भाजी विकणाऱ्या हसऱ्या आजी आणि फुलशेतीत त्याच बरोबर भाजीपाला उत्पादन घेणारे आनंदी शेतकरी अशी कितीतरी छान छायाचित्रे या सहा वर्षांच्या मुलाने टिपलेली आहेत. चित्रात कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही, दिसते ते फक्त वास्तव्यच! 

रुनिल हा निमदरीचाच राहणारा; मात्र सध्या मुंबईला इंग्रजी शाळेत इयत्ता दुसरीमध्ये आहे. गावी त्याची ७ एकर जमीन आहे आणि ‘‘मी मोठे होऊन असाच आनंदी शेतकरी होणार’’ हे त्याने त्याच्या वडिलांना आत्ताच सांगून ठेवले आहे. छायाचित्रणाचे बाळकडू त्याला त्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे छायाचित्रकार असलेल्या वडिलांकडून या वयात आजही सातत्याने मिळत आहे. इतर पालक आपल्या मुलांनी खूप शिकुन परदेशी जावे अशी स्वप्न रंगवतात; पण रुनिलचे वडील मात्र त्याला आत्तापासूनच ‘‘तू एक चांगला छायाचित्रकार आणि शेतकरी हो’’ असे आवर्जुन सांगतात, हा केवढा विरोधाभास आहे. कोणताही व्यवसाय हा चांगलाच असतो; फक्त आपण तो कोणत्या दृष्टीने आणि विचाराने पाहतो त्यावर त्याचे यश अवलंबून असते. सेवा केली तर उत्पन्न भरपूर मिळते; मात्र ओरबाडतच राहिले तर शेवटी हात रिकामे राहतात. 

निमदरी गावाला मी दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष भेट दिली होती. तेथील गावकऱ्यांनी माझा ‘निमदरी समाज रत्न’ म्हणून सत्कार केला होता. या छोट्या मुलाचे शेतकऱ्यांच्या जीवनावरील हे प्रदर्शन पाहताना मला परत एकदा निमदरीस गेल्याचा आनंद मिळाला. निमदरीमधील शेतकऱ्यांच्या आनंदात भर घालण्यामध्ये तेथील स्त्रीवर्गाचा फार मोठा वाटा आहे. शेतीमालनिर्मिती आणि विक्रीमधील त्यांचे सहकार्य प्रदर्शनामधील अनेक छायाचित्रात स्पष्ट दिसत होते. रुनिलच्या कॅमेरामधून निसर्ग अणि मानव यांचा संघर्षही नकळत दिसून येतो. गावात एक प्रचंड मोठे वडाचे झाड आहे. त्याच्या अनेक पारंब्या छाटलेल्या दिसतात, मात्र त्याच्या परिसरात अनेक घरांची गर्दी वाढताना दिसते. वटवृक्ष जखमी अपंग अवस्थेत उभा राहून गावाची वाढती प्रगती पाहत आहे, हे छायाचित्र पर्यावरणाचा वेगळाच संदेश देऊन जाते. छायाचित्रकार अभ्यासकांना प्रत्येक चित्रात नवीन आशय दिसतो. मी मात्र या प्रदर्शनात फक्त आनंदच शोधला. दोन वर्षांपूर्वी गावामध्ये प्रत्यक्ष पाहिलेला आणि आता एक महिन्यापूर्वी पुन्हा या प्रदर्शनामधून अनुभवलेला. 

अनेक जण शेतकऱ्यांची दु:खे शोधतात, मात्र या चिमुरड्याने त्यांच्यामधील फक्त आनंद शोधला, तो कॅमेरात बंद केला आणि जनतेसमोर छायाचित्रांमधून सादर केला. असा आनंद शोधण्यास जी दृष्टी लागते ती मी रुनिलकडून या प्रदर्शनामध्ये घेतली. संत तुकाराम त्यांच्या अंभगात म्हणतात ‘आंनदाचे डोही आनंद तरंग’ खरच किती सत्य आहे! आनंदाच्या डोहात आपणास फक्त आनंदाचे तरंगच उमटलेले दिसतात. आपण सकारात्मक राहिले तरच सुख मिळते. नकारात्मक विचारांच्या विहिरीत उडी घेण्यापेक्षा त्याच विहिरीस सकारात्मक विचारांच्या विटा लावल्या, तर निर्माण होणारे चित्र केवढे तरी वेगळेच असू शकेल! 
DR. NAGESH TEKALE : nstekale@gmail.com
(लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरी गुळाचा गोडवा यंदा वाढणारकोल्हापूर : यंदाच्या पावसाळ्यात गुजरात,...
कमी दरांवरून जिनर्सचा ‘सीसीआय’च्या...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
होय, आम्ही बदलू शेतीचे चित्र... ‘शाळेत सुरू असलेल्या कृषी शिक्षण अभ्यासक्रमातून...
‘पंदेकृवि’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा...अकोला :  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
शेतीपासून जितके दूर जाल तितके दुःख...पुणे : शेतीशी जोडलेली माणसं ही निसर्ग आणि मानवी...
नाबार्डच्या व्याजदरातच जिल्हा बँकांना...मुंबई : राज्य बँकेला नाबार्डकडून मिळणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...पुणे : कोकण अाणि पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी...
अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत कोरडवाहू...अकोला : अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यात कोरडवाहू...
अठरा गावांनी केली कचऱ्यापासून गांडूळखत...गावे आणि वाडीवस्त्याही स्वच्छतेत अग्रभागी...
‘सीसीआय’च्या खरेदीला दिवाळीत मुहूर्तमुंबई : देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
सिंचन योजनांचे अर्थसाह्य महामंडळाच्या...मुंबई : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील...
मुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...
बाजारात टंचाईमुळे ‘पांढऱ्या सोन्या'च्या...जळगाव ः देशात कापसाची सर्वाधिक सुमारे ४० लाख हेक्...
दिवसा वीजपुरवठ्याचे स्वप्न प्रत्यक्षात...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी पंप...
विजयादशमीनिमित्त फुलांना मागणी वाढलीपुणे ः गुरुवारी (ता. १८) साजऱ्या हाेणाऱ्या...
कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाची...पुणे: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू...
मराठवाड्यात यंदा शेतकऱ्यांचे...औरंगाबाद : कमी पाऊस आणि मोठा खंड यामुळे...
ऊर्जा विभागाच्या योजनांचा शेतकऱ्यांना...मुंबई  : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या व...
राज्यात २७ लाख हेक्टरवर होणार ज्वारी...पुणे : केंद्र सरकारच्या नव्या धोरणाप्रमाणे...
सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे...गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या...