agriculture news in marathi agrowon special article on importance of honey bee in human being | Agrowon

मधमाश्‍या नाहीत तर मानवी जीवन नाही
DR. R.P. PHADAKE
शुक्रवार, 18 मे 2018

२० डिसेंबर २०१७ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने २० मे हा ‘जागतिक मधमाशी दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्त काय आहेत मधमाश्‍या, कधी आणि कशी झाली त्यांची पृथ्वीवर निर्मिती, काय आहे त्यांचे मानवी जीवनात महत्त्व, याचा घेतलेला हा वेध...
 

जून २०१५ मध्ये इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्याने, एक जिल्हा निवडून तेथे मधमाश्‍यापालन व्यवसायवृद्धीसाठी सर्वंकष प्रयत्न करावेत, असे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रपती भवनात मधमाश्‍यांची पेटी ठेवून राष्ट्रपतींनी या आवाहनास प्रतिसाद दिला. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मधमाश्‍यांचे संरक्षण आणि वृद्धी करण्यासाठी १५ शास्त्रज्ञांचा टास्क फोर्स गठित केला होता. राष्ट्रसंघाने ‘परागसिंचक कीटक आणि मधमाश्‍या यांचे शाश्‍वत शेतीसाठी संवर्धन’ असा कार्यक्रम सहा प्रातिनिधिक देशांत कार्यान्वित केला आहे. २० व्या शतकातील थोर कीटकशास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांनी उपयुक्त कीटकांमधील मानवाचा सर्वश्रेष्ठ कीटकमित्र असा मधमाश्‍यांचा गौरव केला आहे. अल्बर्ट आईनस्टाईन यांनी तर ‘जर पृथ्वीवरील मधमाश्‍या लुप्त झाल्या तर केवळ चार-पाच वर्षांत मानव जातीचा अंत होईल. मधमाश्‍या नाहीत तर परागीभवन नाही, तर वनस्पती नाहीत, तर प्राणिजीवन नाही, तर मानवी जीवन नाही’ अशी नोंद करून ठेवली आहे. 

पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांती प्रक्रियेत अपुष्पीय वनस्पतींपासून पुष्पीय वनस्पती आणि गांधीलमाश्‍यांसारख्या कीटकांपासून मधमाश्‍या यांची निर्मिती एकाच कालखंडात सुमारे सात-आठ कोटी वर्षांपूर्वी झाली. या दोन जीवितांची निर्मिती एकत्रपणे होणे हा काही योगायोग नव्हता, तर त्यात निसर्गाची गरज होती. वनस्पतींची फुले मधमाश्‍यांना त्यांचे खाद्य (पुष्परस आणि पराग) देतात. हजारो फुलांवरून आपले खाद्य गोळा करता-करता मधमाश्‍यांच्या केसाळ शरीरावर अडकलेले परागकण (पूं-बीज) त्याच जातीच्या दुसऱ्या झाडावरील फुलांतील मादी अवयवावर सहजगत्या पोचविले जातात. अशा परपरागीभवनामुळे फुलांचे रूपांतर जनुकीय विविधता असलेल्या उत्तम दर्जाच्या भरपूर बिया/ फळांत होते आणि पृथ्वीवरील त्यांचे अस्तित्व टिकविले जाते. फुलणाऱ्या वनस्पती आणि मधमाश्‍या यांचे हे सहजीवन - परस्परावलंबित्व गेली अनेक वर्षे अव्याहत चालू आहे आणि त्यांच्यातील उत्क्रांतीही एकमेकास पूरक अशीच होत आहे.

वने आणि मधमाश्‍या
वनांतील तणा-गवतापासून ते झुडपे, वेली, वृक्ष अशा एकापाठोपाठ फुलणाऱ्या वनस्पतींपासून मधमाश्‍यांना जवळजवळ वर्षभर त्यांचे खाद्य मिळते. आपले खाद्य गोळा करता-करता मधमाश्‍यांतर्फे फुलांत परागीभवन होऊन भरपूर बिया/ फळांची निर्मिती होऊन वनांचे पुनरुज्जीवन आणि प्रसार होतो. निरोगी आणि रसरशीत वने ही तेथे मधमाश्‍यांच्या भरपूर वसाहती असल्याचे द्योतक असते. वने ही मधमाश्‍यांची कायमची नैसर्गिक वसतिस्थाने आहेत.

शेती व्यवसाय आणि मधमाश्‍या
स्वातंत्र्यप्राप्तीपासून सुमारे २५ वर्षे भारत अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता. गव्हावर संशोधन करून नोबेल पारितोषिक मिळविणारे डॉ. बोरलॉग आणि डॉ. स्वामिनाथन यांच्या प्रयत्नांमुळे १९८० च्या सुमारास भारतात पहिली हरितक्रांती होऊन भारत तृणधान्याच्या (गहू, तांदूळ, ज्वारी इत्यादी) उत्पादनात स्वावलंबी झाला. काही प्रमाणात गहू-तांदळाची निर्यातही करू लागला; परंतु तेलबिया, डाळी, फळे या पिकांचे हेक्‍टरी उत्पादन वाढत नव्हते. म्हणून केंद्र शासनाने १९८० च्या दशकात तेलबिया मिशन, डाळी मिशन आणि फलोत्पादन मिशन असे कार्यक्रम सुरू केले. ही मिशन्स सुरू होऊन २५-३० वर्षे झाली; परंतु अजूनही या पिकांचे हेक्‍टरी उत्पादन स्थिर आहे, तर काही पिकांमध्ये घटत आहे. १९९४ मध्ये आपण घरगुती उत्पादनाच्या केवळ १० टक्के खाद्यतेल आयात केले होते. २००४ मध्ये घरगुती उत्पादनाइतके खाद्यतेल आपण आयात केले. २०१५-१६ मध्ये आपण १५ दशलक्ष टन खाद्यतेलाची विक्रमी आयात केली. २०१६-१७ मध्ये आपण ७४ हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल आणि २५ हजार कोटी रुपयांच्या डाळी आयात केल्या. तृणधान्यांमध्ये हरितक्रांती होण्यासाठी जे शास्त्रीय ज्ञान आणि तंत्रज्ञान वापरले, तेच ज्ञान आणि तंत्रज्ञान वापरून तेलबिया, डाळी, फळे, भाज्या, चारा पिके आदी पिकांमध्ये हेक्‍टरी उत्पादन का वाढत नाहीये?

परागसिंचन/परागीभवन
बहुसंख्य पिके परपरागसिंचित सफल असून, परागीभवनासाठी परागसिंचक कीटकांवर मुख्यत्वेकरून मधमाश्‍यांवर अवलंबून असतात. अशा पिकांमध्ये शेतातील फुलांच्या संख्येनुसार शेतात पर्याप्त संख्येने मधमाश्‍या उपलब्ध नसतील तर काही फुले परागीभवनाअभावी अफल राहून त्यांच्यात बीजधारण होत नाही आणि अपेक्षित हेक्‍टरी कमाल उत्पादन मिळत नाही. चार पारंपरिक निविष्ठा (संकरित बियाणे, खत, पाणी आणि पीकसंरक्षण) वापरून पिकांच्या फुलोऱ्याच्या काळात पूं-बीज आणि स्त्री-बीज यांचे मिलन करणारे कीटक-मधमाश्‍या ही पाचवी आणि महत्त्वाची निविष्ठा उपलब्ध केली नाही, तर आधीच्या निविष्ठा निरुपयोगी ठरतात. काही स्वपराग फलित पिकांमध्येही फुलोऱ्याच्या काळात मधमाश्‍यांच्या वसाहती उपलब्ध केल्यास परपरागीभवन होऊन स्वपरागीभवनामुळे होणाऱ्या उत्पादनापेक्षा २० ते ६० टक्के अधिक उत्पादन मिळते, असा ब्राझीलमधील कृषिशास्त्रज्ञांचा अहवाल आहे. 

भूकमुक्त अन कुपोषणमुक्त भारत
डॉ. स्वामिनाथन यांनी पहिल्या हरितक्रांतीनंतरच्या २५ वर्षांतील शेतीव्यवसायाचा अभ्यास करून ‘भूकमुक्त भारता’कडे असा विस्तृत लेख २००६ मध्ये लिहिला होता. त्यात तेलबिया, डाळी, फळे यांच्या घटणाऱ्या हेक्‍टरी उत्पादनाबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यावर १५ ऑगस्ट २००७ मध्ये केंद्र शासनाने ‘भूकमुक्त भारत’ असे अभियान सुरू केले. स्वातंत्र्य मिळून ६० वर्षे झाली आणि असे अभियान सुरू करावयास लागणे आणि हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण महिलांना मैलोनमैल पायपीट करावी लागणे ही बाब भारतास निश्‍चितच भूषणावह नव्हती. ‘भूकमुक्त भारत’ अभियान सुरू करून १० वर्षे झाली तरी भारत भूकमुक्त अन कुपोषणमुक्त झालेला नाही.

भारताचे आरोग्य
राष्ट्रीय कुटुंब आरोग्यसेवा या संस्थेच्या २०१२ मधील अहवालाप्रमाणे भारतातील ५ वर्षांच्या खालील ४२ टक्के मुले कुपोषित होती. याच संस्थेच्या २०१७ मधील अहवालाप्रमाणे ही टक्केवारी ५२ टक्के झाली आहे. ही मुले कमी वजनाची, वाढ खुरटलेली आहेत. शाळांतील ५० टक्के मुलींत आणि ५० टक्के गर्भवती महिलांमध्ये लोह कमतरता आहे. परिणामी बालमृत्यू, मातामृत्यू यांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी एकदा म्हटले होते, ‘जिस देश का बचपन भूखा हो, उस देश की जवानी क्‍या होगी?

DR. R.P. PHADAKE : rpphadke३३@gmail.com
(लेखक केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्थेचे निवृत्त संचालक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक थांबणार कधी?नाशिक: नाशिक जिल्ह्यातील मुख्य अर्थकारण...
यवतमाळच्या अनिकेतने तयार केला फवारणीचा...यवतमाळ ः फवारणीमुळे होणाऱ्या विषबाधा सर्वदूर...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर...पणजी : गेल्या एक वर्षापासून अधिक काळ...