agriculture news in marathi agrowon special article on kadaknath | Agrowon

झाबुआ ते झारवड कडकनाथची कमाल
DR. NAGESH TEKALE
सोमवार, 28 मे 2018

एक आठवड्यापूर्वी माझा सोनचाफ्यावरील लेख वाचून मला उदय साळवी यांचा फोन आला. ‘‘सर, कडकनाथ संगोपन पाहण्यासाठी याल का? ‘झारवड’ हे अदिवासी गाव आहे तेथे जायचे आहे.’’ आणि माझ्या डोळ्यांसमोर झाबुआमधील घरोघरी कडकनाथ असलेले शेकडो पाडे दिसू लागले.
 

‘झाबुआ’ हा मध्य प्रदेशमधील एक अदिवासी जिल्हा आहे. ‘भिल’ आणि ‘भिलय्या’ या दोन अदिवासी जमातीच्या अभ्यासानिमित्त मी माझ्या विद्यार्थ्यासह या जिल्ह्यामधील अनेक दुर्गम पाड्यांना भेट दिली आहे. डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा भाग, घनदाट जंगल आणि त्यामध्येच हजारो अदिवासी पाडे विखुरलेले असे हे चित्र होते. एका पाड्यावरून दुसऱ्या पाड्यावर चालतच जावे लागत होते. भिल, भिलय्या अदिवासींची शेती फक्त पावसाळ्यातच होते. उरलेले सहा महिने सभोवतीच्या जंगलावर अवलंबून राहावे लागते. बालकांचे कुपोषण आणि स्त्रियांच्या आजारांचे प्रमाण आपल्या तुलनेत कमीच आढळले. अशाच एका भेटीत मी तेथील पाड्यावरच्या वृद्ध स्त्रीला विचारले, ‘‘तुमच्याकडे शहरामधून डॅाक्टर येतो का?’’  उत्तर तसे नकारार्थीच होते. अतिशय दुर्गम भाग, वाहनांची, रस्त्यांची व्यवस्था नाही मग वैद्यकीय सेवा कशी मिळणार? ‘‘तुम्हाला आमचे डॅाक्टर साहेब पहावयाचे आहेत का?’’ या त्या स्त्रिच्या प्रश्नास मी पटकन हो म्हटले आणि तिने माझ्या समोर एका हातामध्ये धरलेला काळ्या रंगाचा कोंबडा दाखविला. आश्चर्यचकित होण्याची वेळ आता माझ्यावर आली होती. ‘संशोधन ही शंकाकुशंकाची जननी आहे’ यानुसार माझा शोध प्रवास सुरू झाला. 

त्या काळ्या रंगाच्या कोंबडीचे नाव ‘कडकनाथ’ होते. ‘झाबुआ’ जिल्ह्यामधील प्रत्येक अदिवासी घरात आपणास कडकनाथाचे पालन आढळते. हा पक्षी त्यांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य घटक आहे. कडकनाथ हा खरे तर त्या गरीब कुटुंबांचा डॅाक्टरच आहे. याचे चिकन काळसर रंगाचे असून आपल्या गावठी कोंबडीपेक्षा काकनभर सरसच आहे. यामधील प्रथिनांचे प्रमाण इतर कोंबड्यापेक्षा जास्त आणि उत्कृष्ट दर्जाचे आहे. महत्त्वाचे म्हणजे शरिरास हानिकारक असलेल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण एक टक्कासुद्धा नाही. सर्व प्रकारची जीवनसत्वे, अॅमिनो आम्ल आणि रक्तवर्धीसाठी आवश्यक असलेला लोह धातू या पक्षामध्ये भरपूर आहे. आपला आहार नियमित आणि संतुलित असेल तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. येथील अदिवासींच्या आहारात या पक्षाचा नियमित समावेश असतो, सोबत या दोन जमाती कष्ट करणाऱ्यासुद्धा आहेत. कुणी आजारी पडले, अशक्त झाले तर त्यास कडकनाथचा खाद्य पदार्थ दिला जातो. म्हणूनच येथील अदिवासी यास डॅाक्टर म्हणतात. या पक्षाचे अंडे पाौष्टिक आणि कुपोषण दूर करणारे आहे. कडकनाथचे चिकन ‘अॅनेमिया’ सारखे दुर्धर आजार दूर करते म्हणून या भागामधील अदिवासी स्त्रिया मला जास्त निरोगी वाटल्या. 

ठाणे, पालघर जिल्ह्यांमधील अदिवासी मुलांचे कुपोषण दूर करण्यासाठी आम्ही जव्हार तालुक्यामधील एका दुर्गम पाड्यात चाळीस अदिवासी जोडप्यांना ‘आर आर’ वाणांच्या कोंबड्या दिल्या जेणेकरून त्यांच्या मुलांच्या आहारात नियमित स्वरूपात अंडीही आली आणि या घरगुती कुक्कटपालनामधून आणि त्यांच्या विक्रीमधून कुटुंबास आर्थिक उत्पन्नही मिळू लागले. आजही हा प्रयोग तेथे यशस्वीपणे चालू आहे. मात्र, या प्रयोगाचे प्रेरणास्थान होते ते झाबुआमधील अदिवासी, त्यांच्या कडकनाथ कोंबड्या आणि अंडी. पण, येथे मी कडकनाथ देऊ शकत नव्हतो कारण होते त्यांची मोठी किंमत आणि उपलब्धता. झाबुआला परत माझे जाणे झाले नाही त्यामुळे कडकनाथ पक्षी माझ्या विस्मरणात गेला आणि अचानक एक आठवड्यापूर्वी माझा सोनचाफ्यावरील लेख वाचून मला उदय साळवी यांचा फोन आला. ‘‘सर, कडकनाथ संगोपन पाहण्यासाठी याल का? नाशिकमधील त्रिंबकेश्वर तालुक्यात ‘झारवड’ हे अदिवासी गाव आहे तेथे जायचे आहे.’’ आणि माझ्या डोळ्यासमोर झाबुआमधील घरोघरी कडकनाथ असलेले शेकडो पाडे दिसू लागले आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन सकाळीच आम्ही निघालो. 

नाशिक महामार्गावर घोटीच्या विरुद्ध दिशेला त्रिंबकेश्वरकडे रस्ता जातो. या रस्त्यावर ३७ कि.मी अंतरावर ‘झारवड’ हे महादेव कोळी अदिवासींचे गाव आहे. लोकसंख्या जेमतेम ९५० मात्र कडकनाथची संख्या तब्बल १२ हजार. गावामधील ८० अदिवासी कुटुंबे आज त्यांच्या घरात तयार केलेल्या खुराड्यामध्ये १५० ते ३०० कडकनाथचे पालन करत आहेत. डॉ. संतोष शिंदे या त्रिंबकेश्वरमधील शासकीय पशुधन विकास अधिकाऱ्याने या गरिब अदिवासी शेतकऱ्यांना शासनाची ही नवीन्यपूर्ण योजना ५० टक्के अनुदान देऊन यशस्वी केली आहे. सुरवातीस प्रत्येक योजना लाभार्थीस कडकनाथच्या आहाराची मदत डॅाक्टरांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने करून दिली. आता तेथील अदिवासी त्यांच्या घासामधील घास बाजूला करून या पक्षांचे संगोपन करत आहेत. कडकनाथ पालनामुळे या गावामधील अदिवासींचे नशिक, त्रिंबकेश्वरला होणारे उन्हाळ्यामधील स्थलांतर पूर्णपणे थांबले आहे. डॉ. संतोष शिंदे यांनी प्रत्येक लाभार्थीचे बँकेत खाते उघडले असून विक्रीमधील उत्पन्न त्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्याची व्यवस्था केली आहे. या पक्षाची अंडी अतिशय पाौष्टिक असली तरी सध्या अदिवासी या पक्षाच्या विक्रीवरच भर देत आहेत. मात्र, डॉ. संतोष शिंदे यांनी प्रत्येक कुटुंबास दोन ते चार पक्षी पाळून त्यांची अंडी मुलांना देऊन अदिवासी कुपोषण निर्मूलनावर भविष्यामध्ये भर दिला आहे. डॅाक्टरांचे तीन विद्यार्थी प्रमोद, मयुर आणि रिटा हे उच्चशिक्षित असून आज या पाड्यावर तेथील ८० घरांमधील कडकनाथ पालनावर वैयक्तिक लक्ष ठेवून अदिवासींचा आत्मविश्वास वाढवत आहेत. आज या पक्षाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. फ्युचर ग्रुप, वॉलमार्ट सारख्या कंपन्या आज या गावाच्या वेशीवर आल्या आहेत. 

मध्य प्रदेश शासनाने भिल आणि भिलय्या या अदिवासींच्या विकासासाठी त्यांना कडकनाथ पालनास प्रोत्साहन दिले. खास त्यांच्यासाठी ‘अॅप’ विकसित करुन त्यांना उत्पन्नाचा शाश्वत स्त्रोत निर्माण करुन दिला आहे. गरीब कोरडवाहू शेतकऱ्यासाठी शासनाच्या कितीतरी चांगल्या योजना आहेत मात्र, तळागाळापर्यंत त्या पोचतच नाहीत. कडकनाथ हे पक्षीपालन कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच आहे. डॉ. संतोष शिंदे सारख्या अदिवासींबद्दल जिव्हाळा असलेल्या शासकीय अधिकाऱ्यामुळे ते आज या अदिवासी पाड्यात पोचले. त्यामुळे अदिवासी शेतकरी आनंदी तर झालाच, त्याचे स्थलांतर थांबले आणि आता भविष्यात त्यांचा अर्थिकस्तर उंचावेल. गावांची ओळख परिसरात असलेल्या विविध भौगोलिक, धार्मिक अथवा प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने होते पण जोडधंदा असलेल्या शाश्वत शेतीवरुन गावाचे नाव पडणे हे आतापर्यंत कधीही घडले नाही म्हणूनच कडकनाथचे गाव ‘झारवड’ अशी या गावाची ओळख महाराष्ट्रातच काय पण भारतात एकवेळ ठरावी, असे मला वाटले तर ते नवल ठरू नये.

DR. NAGESH TEKALE

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
चांगल्या अारोग्यासाठी ः प्रोबायोटिक्स...प्रोबायोटिक्‍स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक...
धुराडी २० ऑक्टोबरपासून पेटणारमुंबई : साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप...
राज्याच्या तापमानात वाढपुणे : राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस थांबला...
मिरचीच्या आगारात सुधारित तंत्राचा वापरअौरंगाबाद व जालना जिल्ह्यातील काही तालुके मिरचीचे...
देशात तब्बल ६८ टक्के दुधात होते भेसळपुणे : देशात दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८...
राज्य बँकेवरील जिल्हा बँकांचे...मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक...
फुलशेतीने दिली आर्थिक साथहिंगोली जिल्ह्यातील तपोवन (ता. औंढा नागनाथ)...
जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी यांना...मुंबई : जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
मुंबईसह शेजारील शहरांत सेंद्रिय...मुंबईसह शेजारील शहरांमध्ये सेंद्रिय उत्पादनांना...
ऊसतोड मजूरांच्या मागण्यांबाबत लवादाची...मुंबई :  राज्यातील ऊसतोड मजूर व कामगारांच्या...
मॉन्सूनची माघार शनिवारपासूनपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून)...
सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या विविध योजनासेंद्रिय शेती आणि पीक उत्पादनवाढीसाठी राज्य आणि...
‘जलयुक्त’ गैरव्यवहाराची फाइल पुन्हा...पुणे : जलयुक्त शिवार योजनेत बीड जिल्ह्यात...
महसूल उत्पन्न सूत्राचे ऊसदरामध्ये...पुणे : महसुली उत्पन्न विभागणीनुसार राज्यातील...
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे : ‘दाये’ चक्रीवादळ निवळून गेल्यानंतर राज्यात...
मोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...
कृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...