सर्वसामान्यांचा असामान्य नेता

गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांचे नुकतेच निधन झाले. साधी राहणी, उच्च विचार आणि पारदर्शक व्यवहार अशी गुणवैशिष्ट्ये असलेला नेता म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. याचबरोबर ते पर्यावरणस्नेही आणि शेतकऱ्यांचे चांगले मित्र देखील होते.
संपादकीय
संपादकीय

माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्राणज्योत १७ मार्च २०१९ ला माळवली. स्वादुपिंड कर्करोगाच्या चक्रव्यूहात अडकलेला या अभिमन्यूची या आजाराशी वर्षभर झुंज चालू होती. उच्च शिक्षित कुशाग्र बुद्धिमत्तेचे तेजस्वी वलय लाभलेल्या या देशभक्त कर्तृत्ववान मनोहरने त्याचा हा प्रवास असा संपवू नये, अशी माझ्यासारख्या लाखो लोकांची इच्छा अगदी रविवारच्या सायंकाळच्या संधी प्रकाशातही कायम होती. 

काही वर्षांपूर्वीचा काळ आठवतो. त्या वेळी ते गोव्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आमच्या ‘एनव्हायरो व्हिजील’ या संस्थेच्या ठाणे, कळवा येथील वैद्यकीय कचरा संकलन केंद्रास भेट दिली होती. तीच आमची पहिली भेट! साध्या पेहरावात बरोबर कुणालाही न घेता ते अगदी सहज आले, मोजकेच प्रश्न आणि प्रक्रियेची प्रशंसा करून त्यांचा एक तासाचा सहवास कधी संपला हे कळालेसुद्धा नाही. जाताना उगीचच एकाने प्रश्न केला, ‘‘सर! तुमची सुरक्षा?’’ पर्रीकर उत्तरले, ‘‘जे लोक आणि संस्था पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचे एवढे मोठे कार्य करतात, तेथे मी असुरक्षित कसा असेल.’’ आजही या दु:खद प्रसंगी त्यांचे ते खळखळते हास्य मला आतून गलबलून टाकत आहे. त्यांच्या या भेटीची फलश्रुती म्हणून त्यांनी ‘एनव्हायरो व्हिजील’ला सन्मानाने गोव्याला आमंत्रित केले होते. भारताच्या संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी दिल्लीला आलेले पर्रीकर साधा हाफ शर्ट आणि सॅन्डल्स परिधान करून रिक्षाने स्वखर्चाने त्यांच्या हॉटेलवर आले होते तेही कोणत्याही संरक्षणाशिवाय. कारण त्यांना आपण सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करतो याचे कायम स्मरण असे. पणजीमध्ये सायकल वर बाजारात जाणे, स्कूटर वर फिरणे, टपरीवर चहा घेणे, लग्न प्रसंगात रांगेत उभे राहून ताट घेणे यामध्ये त्यांचा साधेपणा उठून दिसत असे. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात सर्वसामान्यांचा सहजपणा आणि उच्च शिक्षित असूनही विनयशीलता होती. सरकारी सुविधांचा विनाकारण फायदा त्यांनी कधीही घेतला नाही, म्हणूनच स्वच्छ चारित्र आणि पारदर्शक व्यवहारात त्यांना कधी तडजोडही करावी लागली नाही. 

फार कमी लोकांना माहित आहे, की ते एक पर्यावरण प्रेमी आणि शेतकऱ्यांचे मित्र सुद्धा होते. गोवा या राज्याची आर्थिक स्थिती संपूर्णपणे देशी आणि विदेशी पर्यटनावर अवलंबूनच आहे. पर्रीकरांनी गोवा विधान सभेत विरोधी पक्ष नेता असताना आणि नंतर मुख्यमंत्री झाल्यावर पर्यटनामधून या राज्याचा चेहरा मोहराच बदलला. खाण व्यावसायिकांनी शेतजमिनीवर खोदकाम करून गोव्याला ओंगळ रूप दिले. गोव्यामधील समृद्ध जंगलाचा नाश केला. त्यामुळे ते व्यथित झाले. त्यांनी गोव्यामधील अनधिकृत खाणीवर बंदी आणली. गोव्याचे पर्यावरण सुदृढ राहिले, वृक्षराजी बहरली, समुद्रकिनारे स्वच्छ राहिले, वाहतुकीस शिस्त लागली आणि प्रदूषण आणि गुन्हेगारी कमी झाली तर गोवा ही पर्यटनामधील स्वर्गभूमी होईल असे ते नेहमीच पोटतिडकीने बोलत असत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी गोव्यामध्ये २४ तास विजेचा पुरवठा चालू ठेवला, गोवा कार्निव्हल तसेच नवीन वर्षाच्या स्वागतास सरकारी मदत दिली. वाहतूक सोपी व्हावी म्हणून मांडवी नदीवर अटल सेतू हा अत्याधुनिक पूलही बांधला. गोव्याच्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर पाण्याच्या हजारो रिकाम्या बाटल्या फेकलेल्या आढळत. पर्रीकरांनी या बाटल्यांना पैसे देऊन शासन खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आणि याला प्रतिसाद म्हणून रोजगार निर्मितीमधून सर्व समुद्र किनारे स्वच्छ झाले. या टाकावू प्लॅस्टिकचे पुनर्निर्माणही त्यांनी सुरू केले. 

समुद्र किनाऱ्याप्रमाणेच गोव्यामधील सर्व मंदिरे, चर्च पर्यावरण स्नेही व्हावेत म्हणून त्यांनी खूप मेहनत घेतली. मुंबई आयआयटीमधून उच्च पदवी घेऊन पर्रीकर गोव्याला आले. उद्देश एकच होता, की अभियांत्रिकीमधील ज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय सुरू करावयाचा, त्यातून स्थानिकासाठी रोजगारनिर्मिती सुद्धा करायची. गोव्याच्या ग्रामीण भागात अनेक शेतकरी तागाचे पीक हिरवे खत म्हणून वापरताना त्यांनी पाहिले. असे उभे पीक जमिनीत गाडून त्याचे खत करण्यापेक्षा आपण त्याला पूर्ण वाढवून त्यापासून ज्यूटनिर्मिती का करू नये? हे विचार त्यांच्या डोक्यात आले आणि भागीदारीमध्ये त्यांनी तो व्यवसाय सुरूही केला. पण लगेच त्यांच्या लक्षात आले की ज्यूटनिर्मितीपेक्षाही हिरवळीच्या खताने वाढणारे जमिनीचे आरोग्य जास्त महत्त्वाचे आहे. मनोहर पर्रीकरांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, पारंपरिक बी-बियाणे बँक, शेत उत्पादानावर प्रक्रिया केंद्रे सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. 

२०१४ ते २०१७ मध्ये ते केंद्र शासनात संरक्षणमंत्री असताना त्यांच्या बारा खोल्या असलेल्या अलिशान बंगल्यात दहा खोल्या बंद करून दोन खोल्यांतच ते राहत असत. अनेक वेळा त्यांना दिल्लीला खूप एकटे वाटे, अशा एकटेपणामध्ये त्यांनी एका जवळच्या मित्राला त्यांची लहानपणीची गोष्ट सांगितली होती. ‘पर्री’ हे त्यांचे गोव्यामधील मूळ गाव पूर्वी गोड टरबुजासाठी प्रसिद्ध होते. वडील आणि त्यांच्या मुलाची ही गोष्ट. वडील गावामधील सर्व मुलांना टरबुजाच्या फोडी खावयास देऊन त्यातील बी आजूबाजूस फेकण्यास सांगत. मुलाला वडिलांचे हे कृत्य बिलकूल आवडत नसे. त्याने वडिलांना हे सर्व बंद करण्यास सांगितले. त्या सर्व गोड टरबुजांची परदेशात निर्यात केली आणि भरपूर पैसा मिळवला. पर्रीकरांनी मित्राला विचारले, ‘‘का त्या मुलाचे वडील एवढे नुकसान सहन करून गावामधील मुलांना टरबुजाच्या फोडी वाटत होते?’’ उद्देश एकच होता, की ‘पर्री’च्या टरबुजाच्या बिया पुन्हा गावातव राहाव्यात, तेथेच रुजाव्यात आणि पर्री हे गोड टरबुजांचे गाव म्हणून कायम ओळखले जावे, पण मुलाचा हव्यास या सर्व बियांना परदेशामध्ये घेऊन गेला, काळ लोटला आणि पर्री गावाचे गोड टरबुजाचे वैभव कायमचे लोपले. तरुण उसळत्या रक्तामध्ये काही आर्थिक गणिते असतात; पण त्यात फसलेला गुणाकारच जास्त असतो. अशा हव्यासापोटी स्थानिक वाणांची वजाबाकी कधी होते, हे लक्षातच येत नाही. ‘पर्री’चे सुपुत्र मनोहर पर्रीकर आज आपल्यामध्ये नाहीत; पण त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आजही जशीच्या तशी माझ्या नजरेसमोर येते. काही नगदी पिकांना निर्यातीच्या धाग्यात पकडून ठेवताना कितीतरी मौल्यवान पारंपरिक पिके आमच्या हातून सुटून जात आहेत. त्यांना पकडून ठेवणे, गावच्या मातीत पुन्हा रुजविणे हे शेतकरी म्हणून आमचे कर्तव्य आहे आणि हीच मनोहर पर्रीकरांना खरी श्रद्धांजलीही ठरेल!            -

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com