agriculture news in marathi, agrowon, special article on milk adultration | Agrowon

जागरूकतेतून बसेल दूध भेसळीला चाप
डॉ. नितीन मार्कंडेय
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

सणासुदीत शासन यंत्रणा, ग्राहक, उत्पादक अधिक जागरूक झाल्यास वितरक यंत्रणेच्या कृष्णकृत्यांना चाप बसू शकेल. निदर्शनास आलेली प्रत्येक दूधभेसळ बाब निर्धोकपणे योग्य प्रशासनीक कार्यवाहीसाठी आग्रही भूमिका घेणे, आता गरजेचे झाले आहे.
 

सणासुदीचे दिवस आले, की दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. तूप, खवा यांची मागणी सर्वोच्च असल्याने दसरा-दिवाळी हे भेसळपर्व ठरते. राज्यात मुळात दुधाचीच भेसळ कमी नसल्याने दुग्धजन्य पदार्थांत भेसळ मोठ्या प्रमाणात दिसून येते. राज्याबाहेरून येणारे दुग्धजन्य पदार्थ आणि राज्यात राजरोसपणे भेसळ असणारे पदार्थ मानवी आरोग्यास धोकादायक ठरतात. भरीस भर म्हणून आता ‘देशी’ गायीचे दूध म्हणजे A२ (एटू) दूध, तूप, इतर काही दुग्धजन्य पदार्थ बाजारात उपलब्ध झाले आहेत. या दूध व पदार्थ जाहिराती अशा खुबीने मांडल्या जात आहेत, की त्यातून गावठी गायी, म्हशी आणि संकरित गायीच्या उत्पादनांचा सहभाग भेसळीसाठी करून अधिक विक्री आणि जास्तीचा पैसा मिळवण्याचा सर्रास प्रयोग सुरू आहे.
देशी आणि शुद्ध हे शब्द मराठी मनाला आणि ग्राहकाला लगेच पसंत पडतात. भेसळ नसणारी, सेंद्रिय आणि निर्भेळ बाबी कुटुंबाला मिळाव्यात हा ग्राहकांचा उद्देश प्रामाणिकपणे असतो. मात्र, ‘देशी गायीचे शुद्ध तूप’ऐवजी ‘गायीचे देशी तूप’ असा शब्दप्रयोग फसवा ठरतो. दूध तर आता एटू म्हणून विक्री करणाऱ्या एजन्सी दिवसेंदिवस वाढत आहेत. राज्यात दूध जिथं संकलित होते, तिथे स्निग्धांश गोळा करून यांत्रिक पद्धतीने तूपनिर्मिती करणारे एंजट वाढत आहेत. यात गावात गोळा होणारे दूध संकरीत गायीचे, दूध संकलन केंद्रातून स्निग्धांश पुरवठा करून नामानिराळे राहणारी मानसिकता आणि देशी गायीचे चित्र तुपाच्या बरणीवर छापून ग्राहकांचा विश्‍वासघात करणारी मंडळी याबाबत रोष दिसून येतो. असे तूप स्वस्त असले तरी त्यात देशी शब्दाची भेसळ गंभीर आहे.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीची सगळी फळे विक्रेत्यांनीच चाखली असल्याने खरे दूध उत्पादक आजपर्यंत कोरडेच राहिले आहेत. खरेतर दूध उत्पादन करणाऱ्या प्रत्येक पशुपालकास दूध भेसळ कुठे आणि कशी होते, याची परिपूर्ण माहिती असली तरी रोष कशाला घ्यायचा, ही भूमिका स्वीकारली जाते. अपेक्षा अशी की उत्पादकांचे निर्भेळ दूध ग्राहकांना मिळावे, अशी भूमिका सध्या जास्त गरजेची आहे. जैविक किंमत ज्या दुधाची जास्त, त्याच दुधाला पैशाची साथ लाभणार, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आज ग्राहक याच दृष्टीने म्हशीच्या दुधाला जास्त दर देतो म्हणून संकरीत गायीच्या दुधाला तेवढी किंमत मिळणारच नाही. संकरीत गाय आणि म्हशीच्या दुधापेक्षा देशी गायीच्या दुधाला ग्राहक फार जास्त भाव देतो. याचा अर्थ ग्राहकांचा विश्‍वास वितरक आणि उत्पादकावर आहे. मात्र, ज्या प्रमाणात देशी म्हणून इतर दूध विकले जात आहे, त्यात दूध भेसळ हाच विषय अधोरेखित होतो.
दुधाची विक्री आणि विश्‍वासार्हता यात अत्यंत जवळचा संबंध आहे. दूध एक, चित्र वेगळे आणि त्यातून विश्‍वासाला तडा यातून खरा शाश्‍वत दूध व्यवसाय करण्यास अडथळा होतो. पशुपालकाला, दूध एजंट, विक्रेते वितरक यामुळे होणारी दूध दरवाढ, दूध भेसळ आणि दूध प्रत घट कमी करून उत्पादक-ग्राहक सरळ साखळी प्रस्थापित करता आली नाही, हे आजचे कटू सत्य आहे. आणि त्यात सहकाराच्या मिठाचा खडा वगळता आला नाही.
राज्यातल्या दूधउत्पादनातला आणखी एक महत्त्वाचा भाग असा, की उत्पादकांचा घाम बराच गळून दूध उपलब्ध झाले. मात्र, मूल्यवर्धनाची चर्चा सुरू झाली, की दुधाची मिठाई विक्री करणारे सगळे बंगाल, राजस्थान, गुजराथ, कर्नाटकातून येऊन इथे गर्भश्रीमंत झाले. सहकारी दूधसंघाचे दुग्धजन्य पदार्थ जेवढे विकले जातात, त्यापेक्षा पंचवीस पट मोठा व्यवहार मिठाई भांडारातून होतो आणि तिथे मराठी माणूस चुकून दिसत नाही. मूल्यवर्धनातला फायदा राज्यातला दूधउत्पादक मिळवत नाही, मिठाई भांडारातली भेसळ तपासली जात नाही, ग्राहक पैसा देऊन फसला जातो याबाबत तालुका पातळीवर समविचारी पशुपालक पुन्हा संघटित होणे गरजेचे आहे. वर्षातल्या आठ महिन्यांत रात्री उशिरापर्यंत गाड्यावर विकले जाणारे आईस्क्रीम, मस्तानी, फालुदा चवीनं खाणाऱ्या मंडळींना यात कधी स्वतःला पाहता येईल का? पैसा इथेच गोळा होतो आणि याशिवाय मूल्यवर्धन कोणतं?
तूप म्हणजे वास आणि रवाळपणा. जिभेला सहज कळतो. लोणी कढवून चूलवणावरचं तूप राज्यात औषधी म्हणून फार जास्त किमतीस विकले जाते. देशी गायीचे लोणकढं तूप मागणी असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. भरपूर दर मिळवावा, पण भेसळमुक्त निर्भेळ दूधपदार्थ विक्री व्हावी अशीच अपेक्षा असावी. मात्र, संकरीतचा दुग्धस्निग्धांश आणि देशी गायींची वसवंड एकत्र करून तूपविक्री ग्राहकास फसवणूक ठरते. ग्राहक विश्‍वास आणि अधिक दर मिळवण्याचा राजमार्ग भेसळ निदान पट्टीतून साकार होऊ शकतो. एक लिटर दूध पिशवीसह भेसळ ओळखणारी पट्टी विक्री सुरू झाल्यास ग्राहक जास्त दर देण्यास प्रवृत्त होईल. अनेक संस्थांनी दूध भेसळ पट्ट्या, यंत्रे, कुप्या, चाचण्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केल्या असल्या तरी त्यांचा वापर दिसत नाही. अगदी ६० सेकंदांत सहा वेगवेगळ्या भेसळनिदान करणाऱ्या यंत्रांची नुकतीच उपलब्धता तंत्रज्ञानातून झाली असून, यंत्र किंमतही अगदी माफक असणार आहे.
दूध हे विश्‍वास आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून ग्राहकांपर्यंत आल्यास दूधभेसळ कमी होईल, तर दुग्धजन्य पदार्थ विक्रीतून मूल्यवर्धन होऊ शकेल. सणासुदीत शासन यंत्रणा, ग्राहक, उत्पादक अधिक जागरूक झाल्यास वितरक यंत्रणेच्या कृष्णकृत्यांना चाप बसू शकेल. निदर्शनास आलेली प्रत्येक दूधभेसळ बाब निर्धोकपणे योग्य प्रशासनीक कार्यवाहीसाठी आग्रही भूमिका घेणे, आता गरजेचे झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दूधभेसळीस कठोर शिक्षा प्रस्तावित केली असून, शासनातर्फे प्रत काय असावी, याबाबत भारताचे अन्नसुरक्षा मापदंड प्राधिकरण (एफएसएसएआय) लवकरच धोरण जाहीर करणार आहे. अपेक्षा एवढीच, की आपले उत्पादन जसेच्या तसे ग्राहकांना देण्याची भूमिका दूध उत्पादकांनी ठेवावी. निर्भेळ संकरीत दूध- प्रमाण जास्त असल्याने, निर्भेळ म्हैस दूध- दुग्धजन्य पदार्थांसाठी उपयुक्त तर देशी गाय म्हणजे गावठी नव्हे तर नामांकित भारतीय पशुजातीच्या गायीचे दूध औषधी आणि पोषण गुण अधिक असल्याने बाजारभाव ठरविते. यात सरमिसळ म्हणजेच भेसळ आणि कायमचा ग्राहक रोष ठरतो.
देशी शब्दाचा गैरवापर करून दूध, तूप, दुग्धजन्य पदार्थ बदनाम होणार नाहीत, यासाठी स्वदेशी पुढाकार सणासुदीला गरजेचा असल्याने हा शब्दप्रपंच. कोजागरीचा चंद्र आणि दिवाळीचा पाडवा दुग्ध अमृताचा लाभावा अशीच सर्वांची अपेक्षा असणार!

डॉ. नितीन मार्कंडेय ः ९४२२६५७२५१
(लेखक परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

इतर संपादकीय
नवसंशोधनातून हवामान बदलावर करा मातहवामान बदलासाठी मानवाचा नैसर्गिक संतुलनात अवाजवी...
दूध का नासले?राज्यात दुधाच्या दराच्या मुद्यावरून सहकारी दूध...
शेतीत फुलताहेत उद्यमशीलतेची बेटं गेल्या वर्षी ''महाएफपीसी'' आणि शेतकरी कंपन्यांनी...
सुस्त प्रशासन, स्वस्थ शासनराज्यात बीटी कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशकांची...
होय, आम्हीच खरे लाभार्थी!राज्यभर झालेल्या मृद संधारणाच्या अनेक कामांवर...
शेतीमाल हमीभाव : एक सापळासरकारने शेतकऱ्यांपुढे लटकवलेले हमीभावाचे एक गाजरच...
कापूस संशोधनाची पुढील दिशाकेंद्र शासनातर्फे बीटी जनुकांचे बौद्धिक संपदा...
कापूस कोंडी फोडाकापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप झाल्यामुळे कापूस...
पांढरं सोनं का काळवंडलं?यवतमाळ जिल्ह्यामध्ये कपाशीवरील अनियंत्रित...
सुलभ व्यापार वाढवेल निर्यातदेशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन न देता आपली गरज...
पशुखाद्यातील प्रतिजैविकांच्या वापरामुळे...उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये १९५० पासून...
अन्नसुरक्षेच्या लढ्याची अर्जेंटिनात...जागतिक व्यापार संघटनेची (डब्ल्यूटीओ) अकरावी...
‘ओखी’चा विळखानैसर्गिक आपत्ती या वर्षी शेतकऱ्यांची पाठ सोडायला...
ऊसदराचा उफराटा न्यायकोल्हापूरची तडजोड  उसाला टनामागे पहिली उचल...
दिशा बदलत्या कृषी शिक्षणाचीबदलते हवामान, खुली अर्थव्यवस्था, आयात-...
सजीव माती तर समृद्ध शेतीपृथ्वीवर निवास करणाऱ्या सुमारे ६.७ अरब...
केवढा हा आटापिटा!कडधान्ये, खाद्यतेल यांच्या आयात-निर्यातीबाबत...
नकाशा दाखवेल योग्य दिशाजागतिक तापमानवाढीमुळे बदललेल्या हवामानाच्या...
कसे असावे आयात-निर्यात धोरण?देशातील तेलबिया व कडधान्य पिकांचे बाजारभाव किमान...
अलिबाबाच्या गुहेत दडलंय काय?पी कवाढीसाठीच्या अत्यंत मूलभूत घटकांमध्ये माती...