सकारात्मक विचारांची शेती

जो सकारात्मक पद्धतीने वागतो, राहतो तो नेहमीच आनंदी असतो. म्हणून सर्वप्रथम गाव परिसरामधील नदीला वाहते करा. गावाला वृक्षराजीमध्ये झाकून टाका. वृक्षांचा अभाव म्हणजेच दुष्काळाचे चटके. सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करा. अल्पभूधारकास रासायनिक शेती नैराश्याच्या वाटेवर घेऊन जाते.
संपादकीय
संपादकीय

एक लहानसे गाव होते. अंदाजे हजाराची वस्ती. गावात सर्वच शेतकरी तेही अल्पभूधारक. चौथीपर्यंत शाळा म्हणून चार सरकारी नोकर, बाकी ना बँक ना पोस्ट. शिवारात पूर्वी बारमाही वाहणारी नदी होती, आता ती वाळू आणि पाणीमुक्त आहे. पूर्वी गर्द झाडीत लुप्त असलेले ते गाव आता फक्त एक चिंचेचे झाड आणि मारुतीच्या देवळामुळे ओळखले जात होते. शेतीमध्ये फक्त सोयाबीन आणि कापूसच. जवळपास प्रत्येकाने कर्ज काढून बोअरवेल घेतलेली, मात्र त्यास पाणी नव्हते. गावात प्रवेश करतानाच रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा दर्प जाणवत असे. तीन शेतकरी आत्महत्यासुद्धा झाल्या होत्या. तालुका जवळच असल्याने गावात दोन बस येतात. अर्धे गाव तालुक्याच्या ठिकाणीच सापडत असे. त्यात तहसील ऑफिस आणि बँकेच्या दारातच गर्दी जास्त. गावात जवळपास सर्वजण कर्जबाजारी होते. या वर्षी दुष्काळाचा फेरा, त्यामुळे थोडा वारा सुटला की सर्वत्र धूळ. गावात चार सार्वजनिक नळ होते, आता लवकरच टँकर येणार अशीही चर्चा होती. वृत्तपत्रामधून लोकांना अनुदानाच्या बातम्या कळत आणि तालुक्याला जाणारी बस लगेच खचाखच भरली जात असे. शेतात जाऊन काही उपयोग नव्हता म्हणून बरेच जण इमारत नसलेल्या बसस्टॅंडवरच गप्पा मारत बसलेले असत, विषय अर्थात कर्जमाफी आणि अनुदानाचाच असे.

त्यातच बातमी आली, गावात एक जटाधारी बाबा आला आहे. निवास मारुती जवळच्या चिंचेखाली. आल्याबरोबर बाबाने मंदिर स्वच्छ केले, देवाला अंघोळ घातली आणि फुले वाहिली. एक एक गावकरी तेथे येऊ लागला. भगवी कपडे, डोक्यावर जटा, पांढरी दाढी, हातात चार कप्प्याची झोळी आणि कमंडलू. हे सर्व पाहून कळत नकळत नमस्कार होऊ लागला. लोक येत होते पण जास्त चौकशी होत नव्हती. सकाळीच बाबाजी भिक्षेला निघाले. शेतात जे पिकते त्याचीच मूठभर भिक्षा ही त्यांची अट. सोयाबीन, कापसामुळे गावामधील प्रत्येक घरी फिरुनही झोळी रिकामीच राहिली. शेवटचे घर परशुचे. तेथे त्याला ज्वारीचे पीठ, डाळ, तांदूळ मिळाले. भिक्षा वाढणाऱ्या त्या स्त्रीकडे त्यांनी आदराने पाहिले, पण चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतेच. ‘‘बाबाजी! हे सर्व आमच्या शेतातलेच आहे.’’ या मृदू उत्तराने बाबा आनंदी झाले. काल दुपारी गावाकडे येताना वाटेत त्यांना एका ठिकाणी हिरवळ, पिण्यास थंड पाणी आणि आनंदाने डोलत असलेली खरिपाची पिके दिसली होती. हेच ते परशूचे शेत होते. बाबा दररोज त्या घरातूनच भिक्षा घेऊन तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून देवळात सेवा करत होते.

गावकऱ्यांची मंदिराकडे गर्दी वाढू लागली, भिक्षेसाठी आमच्याकडे का नाही? याची विचारणा झाली आणि प्रवचनाचा आग्रह सुरू झाला. बाबांनी होकार दिला, ‘‘प्रवचन करणार पण परशूच्या शेतावर! कबूल?’’ सर्वांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे तीन दिवसांनी परशूच्या शेतावर शंभर एक गावकरी जमले. आंब्याच्या झाडाखाली बैठक जमली. बाजूला पाणी शिंपडल्यामुळे मातीचा मंद सुवास सर्वत्र पसरला होता. बाबांनी विचारले कसे वाटते आपणा सर्वांना.’’ ‘‘खूप छान! सर्वत्र हिरवे, विहिरीला पाणी, हसणारी पिके आणि आनंदी धनी पाहून तुमच्याप्रमाणे आम्हालाही आनंद झाला आहे.’’ बाबाजी म्हणाले, ‘‘गावकऱ्यांनो हा आनंद गेला एक महिना मी घेत आहे, त्याच्याच घरची भिक्षा मी घेत होतो, कारण सर्व त्याच्या शेतामधील होते. या कमंडलूमधील पाणीसुद्धा याच विहिरीचे आहे. तुम्हा सर्वासारखाच हासुद्धा एक अल्पभूधारक शेतकरीच, आपण सर्व नकारात्मक विचाराचे झालात, तुमच्या शेतीला जे योग्य नाही त्या पीक पद्धतीकडे वळलात, रासायनिक खते आणि कीडनाशके वापरून आपापसात स्पर्धा वाढवलीत, पाणी संपवले, बांधावरची झाडे तोडली, पक्ष्यांना हाकलले आणि पदरात काय पडले? अर्धे गाव तालुक्याच्या गावाला, फक्त अनुदान आणि कर्ज याशिवाय तुमच्याकडे कुठलाही विषय नाही, देवाकडे अंधश्रद्धेने पाहू नका, तो सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. आषाढी कार्तिकीला लाखो वारकरी जातात. वारीत मिळालेली ऊर्जा त्यांच्यासाठी पांडुरंगाचा वर्षभराचा प्रसाद असतो, म्हणूनच ही सकारात्मक विचारांची दिंडी आहे. परशूचेच पाहा! तो ही अल्पभूधारकच, पण त्याचे कुटंब आनंदी आहे. सेंद्रिय शेतीमुळे त्याच्या जमिनीत ओलावा कायम राहिला म्हणून दुष्काळातही त्याचे शेत मला पाचूच्या बेटासारखे वाटले. पिकाला पाणी लागत नाही त्याला हवा असतो फक्त ओलावा. या विहिरीजवळच्या आठ दहा झाडांनी जमिनीमधील पाणी धरून ठेवल्यामुळे तिला कायम पाणी असते. शेतामधील पिकावर तो माया करतो. आज त्याच्याकडे मूग, उडीद, भुईमूग, तीळ, जवस, काऱ्हाळे, गहू, ज्वारी, हरभरा, तूर सोबत विहिरीकाठी शेवगा, हातगा, आंबा, सीताफळ, रामफळ सर्व आहे. निसर्गावर प्रेम केलेत तर तो तुम्हाला भरभरून देतो, असे कितीही दुष्काळ आले तरी परशूची शेती अशीच हिरवी राहणार कारण निसर्गाला, शेतालाच त्याची काळजी आहे. त्याला एकदाही तालुक्याच्या गावाला जावे वाटत नाही. आधारकार्ड कुठे ठेवले आहे हे ही त्यास माहित नाही, बँक पासबुक तर दूरच!

जो सकारात्मक पद्धतीने वागतो, राहतो तो नेहमीच आनंदी असतो. म्हणून सर्वप्रथम गाव परिसरामधील नदीला वाहते करा. गावाला वृक्षराजीमध्ये झाकून टाका. वृक्षांचा अभाव म्हणजेच दुष्काळाचे चटके. सेंद्रिय पद्धतीचा स्वीकार करा. अल्पभूधारकास रासायनिक शेती नैराश्याच्या वाटेवर घेऊन जाते.’’ बाबाजी बोलत होते. गावकऱ्यांचे डोळे पूर्णपणे उघडले होते. तरुणांनी सकाळी उठून सर्वप्रथम नदी स्वच्छता अभियान सुरू करण्याचे ठरविले, नदीकाठी आणि परिसरात वृक्षलागवडीची योजना तयार झाली, सेंद्रिय शेती आणि पीकपद्धती बदलण्यावर एकत्र बसून सकारात्मक विचाराने निर्णय घेण्याचे ठरले आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन बैठक संपली. सकाळीच नदी स्वच्छता अभियान आणि वृक्ष लागवडीसाठी खड्डे करण्याकरिता तरुणांचे दोन मोठे गट तयार होऊन बाबांच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघाले. झाडाखाली बाबा नव्हते. मंदिर उघडे होते, पूजा झाली होती, फुलांचा हार घातलेला होता. तरुणांना तो शुभसंकेत समजला आणि सकारात्मक विचारांची ती वारी त्या दिवसापासून गावात सुरु झाली. तालुक्याची बस आज प्रथमच रिकामी गेली. कालांतराने नदी वाहू लागली. वृक्षांच्या गर्दीत गाव दिसेनासे झाले, सर्वत्र मातीचा सुगंध दरवळू लागला, आता गाव पहाटेच देवळामधील घंटीच्या नादाने उठू लागले होते. पूर्वीचे ‘एक होते गाव’ आता इतिहास जमा झाले आहे. आता परिसरामधील लोक इतरांना ‘‘एक असेही गाव आहे,’’ असे अभिमानाने सांगतात.

 डॉ. नागेश टेकाळे ः  ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com