agriculture news in marathi, agrowon, special article soil fertility | Agrowon

वाढवूया मातीचा कस
डॉ. हरिहर कौसडीकर
बुधवार, 24 जानेवारी 2018

जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून (वातावरणास अनुकूल व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर) पर्यायी पीक पद्धतीचा अवलंब होण्याकरिता शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी अभियान राबवावे लागेल.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगातील २५ टक्के शेतजमिनीचे आरोग्य बिघडलेले आहे. २०५० पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरविण्यासाठी शेतकऱ्यांना सध्याच्या उत्पादकतेमध्ये ७० टक्‍क्‍यांनी वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे जमिनीवर उत्पादकतेचा ताण वाढणार आहे. त्यातच पाण्याची कमतरता हेदेखील आव्हान समोर असणार आहे. मातीची धूप, पाण्याची कमतरता आणि जैव विविधतेतील घटक यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता घटून अन्नसुरक्षेचे संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. जगभर वातावरण बदलाचे संकट देखील गंभीर होत आहे.

देशात हरितक्रांतीमुळे उत्पादन वाढून अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो. मात्र, यासाठी संकरित बियाणे, केवळ रासायनिक खते आणि कीटकनाशके यांच्या सततच्या वापरामुळे उत्पादन वाढीचा काळ संपून आता घसरण सुरू झाल्याचे आपण अनुभवत आहोत. जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि जिवंतपणा कमी होत चालल्याचे लक्षात येत आहे. सध्याच्या दशकात सिंचनाखालील क्षेत्र वाढले व उत्पादनाला चालना मिळाली, परंतु पाण्याच्या अवास्तव व अविरत वापरामुळे जमिनी क्षारयुक्त, चोपण, चिबड बनत चालल्या आहेत. कृषी अहवालानुसार राज्यात ७३ टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी जमीन असून, सरासरी धारणा क्षेत्र १.३३ हेक्‍टर आहे. ४० टक्के जमिनी हलक्‍या व उथळ स्वरूपाच्या असून, लागवडीखाली ८३ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.

विविध प्रकारच्या जमिनीच्या समस्यांमुळे (उदा. सेंद्रिय कर्बाची कमतरता, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व असमतोल, चुनखडीयुक्त जमिनी, क्षारयुक्त व चोपण जमिनी, जमिनीची धूप) ४२ टक्के लागवडीखालील जमिनी खराब झालेल्या आहेत. राज्यातील लागवडीखालील ५२ टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. जमिनीवर मातीचा एक इंच थर तयार होण्यासाठी विविध कृषी हवामान प्रदेशानुसार ५०० ते ७०० वर्षांचा कालावधी लागतो. उष्ण कटिबंधातील कमी पावसाच्या भागात जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असते. कारण अशा प्रदेशात जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे विघटन झपाट्याने होते. म्हणून जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी आढळते. सध्याच्या काळातील शेतीमध्ये जमीन, पाणी, पर्यावरण व मानवी आरोग्य मोठ्या प्रमाणात बिघडत असल्याचे निदर्शनास येत आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी उच्च पौष्टिक दर्जाच्या पुरेशा अन्नधान्य निर्मितीच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनासाठी जमिनीची सुपीकता वाढविणे गरजेचे आहे.

पिकांच्या दर्जेदार उत्पादनवाढीसाठी जमिनीची सुपीकता व उत्पादकता यांना फार महत्त्व आहे. जमिनीची सुपीकता व उत्पादकता एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक बाजू जरी कमी असली तरी उत्पादनात घट येते. जमिनीतील पोषक अन्नद्रव्यांच्या पुरवठा करण्याच्या क्षमतेला सुपीकता असे म्हणतात, तर पीक उत्पादन करण्याच्या क्षमतेला उत्पादनक्षमता म्हणतात. जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारल्यास जमिनीची सुपीकता व पर्यायाने उत्पादकता वाढते.

भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या २०१२ च्या अहवालानुसार राज्यात ४६ दशलक्ष टन विविध पिकांच्या अवशेषांची प्रतिवर्षी निर्मिती होते व ७.४२ दशलक्ष टन पिकांचे अवशेष जाळले जातात. या सर्वांपासून कंपोस्ट खत तयार करता येऊ शकते व जमिनीला सेंद्रिय अथवा भर खताचा वापर करून निसर्गचक्रातील अनिष्ट मानवी हस्तक्षेप कमी करता येईल.माती परीक्षण करूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करणे आवश्‍यक आहे. जमिनीतून दरवर्षी उत्पादनाच्या एक दशांश अन्नद्रव्यांचा उपसा होत आहे. त्यामुळे राज्यात गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता २८.५ टक्के, जस्त कमतरता ३७.८ टक्के, लोह कमतरता १६.५ टक्के आणि बोरॉन कमतरता ३६ टक्‍क्‍यांपर्यंत आढळून आली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत जस्ताची कमतरता सर्वांत जास्त असून, त्यानंतर लोहाची कमतरता आढळून येते. अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या जमिनीत पिकांना संतुलित प्रमाणात व शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्‍यक असते.

जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची लागवड करूनच जास्त उत्पादन मिळू शकते. रासायनिक खतांच्या कार्यक्षमता प्रमुख अन्नद्रव्ये युक्त खतांच्या ३० ते ५० टक्केपर्यंत, दुय्यम अन्नद्रव्ययुक्त खतांच्या १० टक्‍क्‍यांपर्यंत व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या २ ते ५ टक्‍क्‍यांपर्यंत असून खतांचा संतुलित वापर आढळून येत नाही. अन्नद्रव्यांच्या विविध स्रोतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करुन पिकांना त्यांच्या संतुलित पुरवठ्याद्वारे जमिनीची सुपीकता वाढविण्याची गरज आहे. जमिनीचे आरोग्य व अन्नद्रव्य कमतरतेबाबत स्थानिक पातळीवर शेतकरी व कृषी विस्तार कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करणे आवश्‍यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे जमीन आरोग्य पत्रिका असणे आवश्‍यक आहे.

पावसाच्या पाण्यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील जमिनीवरून १६.४ टन प्रतिहेक्‍टरी प्रतिवर्षी मातीची धूप होत आहे. ही धूप विविध उपचांद्वारे कमी करावी लागेल. तसेच सिंचनाच्या पाण्याचा वापर नियंत्रित स्वरूपात व ठिबक सिंचनाद्वारे करावा. ठिबकद्वारे विविध पद्धतीने रासायनिक खतांचा वापर केल्यास खतांची कार्यक्षमता वाढून खतांमध्ये पर्यायाने उत्पादन खर्चात बचत होईल. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून (जैविक खते, पिकांचे अवशेष, कृषी संलग्न व्यवसायातील टाकावू पदार्थ, बायोगॅस, सेंद्रिय खते, विविध तेलबिया पिकांच्या पेंडी, गांडूळ खत व कंपोस्ट खते यांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्‍यक आहे. जमिनीच्या जैविक गुणधर्मांची जोपासना करणे गरजेचे आहे, त्यामुळे मृतवत झालेल्या जमिनी जिवंत होऊन दीर्घकाळ शाश्‍वत उत्पादन घेता येईल. प्रत्येक शहरी भागातील भाजीपाला, फळे, बाजारातील टाकावू पदार्थांचे कंपोस्ट खतात रुपांतर करण्यासाठी स्वतंत्र अभियान स्वरूपात नियोजन व उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 

केवळ एक पीक पद्धतीचा अवलंब न करता बहुपीक पद्धतीमध्ये आंतरपिके, मिश्र पिके, पिकांची फेरपालट, कडधान्य व हिरवळीच्या खतांच्या पिकांचा समावेश करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे गरजेचे आहे. जमिनीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून (वातावरणास अनुकूल व आर्थिकदृष्ट्या फायदेशीर) पर्यायी पीक पद्धतीचा अवलंब होण्याकरिता शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी अभियान राबवावे लागेल. कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विभाग व कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून नियमित प्रशिक्षण मेळावे व शिबिरे घेऊन शेतकऱ्यांना शेतीमध्ये पशुधन संगोपनाची सांगड व एकात्मिक पीक पद्धतीचा अवलंबास प्रवृत्त करावे लागेल. असे केले तरच मातीचा कस वाढेल.
डॉ. हरिहर कौसडीकर ः ९४२३१४२२१०
(लेखक महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत शिक्षण संचालक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...