जमीन सुपीकतेचा शाश्‍वत मंत्र

‘जागतिक अन्न व शेती संघटने’चे (एफएओ) अधिवेशन २ ते ४ मे २०१८ रोजी रोम (इटली) येथे पार पडले. अधिवेशनातील चर्चेचा विषय होता ‘‘मातीचे प्रदूषण व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम.’’ परिषदेतील चर्चेचा संक्षिप्त वृत्तांत ८ मेच्या ॲग्रोवनमध्ये आलेला आहे. यातील काही मुद्द्यांचा ऊहापोह या लेखाद्वारे करीत आहे.
sampadkiya
sampadkiya

माती प्रदूषण या विषयाची अद्याप थेट मीमांसा वा अवलोकन झालेले नाही. प्रदूषित जमिनी पुन्हा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करावे लागतील. मातीच्या वाढत्या प्रदूषणाची कारणे स्पष्ट आहेत, उपायही माहीत आहेत. मात्र याबाबत कोणीच गंभीर दिसत नाही. आदी मुद्दे रोम येथील अधिवेशनातून पुढे आलेले आहेत. 

जमिनीची सुपीकता घटते हळूहळू मी १९९० पासून माती प्रदूषणाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर कसा परिणाम होतो याचा अनुभव घेतल्याने या विषयाकडे परिस्थितीनेच वळविले. १५-२० वर्षे उत्तम उत्पादन देणारी जमीन एकाएकी किफायतशीर उत्पादन देईनाशी झाली. एकाएकी असे काही घडलेले नव्हते. डॉ. स्टिव्हन्सन यांनी आपल्या ‘ह्यूमस केमेस्ट्री’ या पुस्तकात लिहिले आहे, की सुपीकतेकडे पूर्ण दुर्लक्ष केले तरी निसर्गाने जमिनीला जी सुपीकता दिली आहे, त्याच्या जिवावर ती आपल्याला १५-२० वर्षे उत्तम उत्पादन देईल. त्यानंतर उत्पादन हळूहळू घटत जाते. ही प्रक्रिया इतकी सावकाश असते, की शेतकऱ्यांच्या ध्यानात सहजासहजी येऊ शकत नाही. बागायतीची सुविधा, सुधारित जातींचा वापर, उत्पादनात वाढीसाठी रासायनिक खते, पीक संरक्षण रसायने व तणनाशकाचा वापर सुरू झाल्यानंतर जगभरात ठराविक कालावधीनंतर सर्वत्र हा अनुभव येत आहे. जमिनीची सुपीकता टिकविणे हा जगभरच्या शेतीपुढील सर्वांत गंभीर विषय आहे. सर्व शास्त्रात गेल्या शतकात मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले. असे असताना शेतीमधील हा गंभीर प्रश्‍न सोडविण्यावर ते उपयुक्त होऊ शकत नाही. याला विज्ञानाची प्रगती म्हणावे, की अधोगती. यामागील कारणांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मी माझ्या परीने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

भू-सूक्ष्मजीवशास्त्राची दखल घेतली नाही  जमिनीमध्ये पिके वाढविण्याचे काम प्रामुख्याने सूक्ष्मजीवांकडून केले जाते. सूक्ष्मजीवांनी हे काम व्यवस्थित केले नाही तर पिकाचे चांगले उत्पादन येऊच शकणार नाही. या सूक्ष्मजीवांवर आधारित एक शास्त्रशाखा विज्ञानात आहे. त्याला ‘‘सूक्ष्मजीवशास्त्र’’ असे नाव आहे. या सूक्ष्मजीवशास्त्राचा अनेक शाखा आहेत. उदा. औद्योगिक, दुग्धशास्त्र तसेच जमिनीशी संबंधित भू-सूक्ष्मजीवशास्त्र. या शास्त्र शाखांमध्ये भरपूर संशोधन झाले आहे. ज्या काळात ही शास्त्र शाखा विकसित होऊ लागली (१९०५ नंतर) त्या काळात जमिनीची सुपीकता हा विषय ऐरणीवर नव्हता. यामुळे त्या काळातील शास्त्रज्ञांनी या शाखेतील संशोधनाची दखल घेतली नाही. जमिनीची सुपीकता हा विषय आज कृषिशास्त्र शाखा हाताळते व पीक पोषण हा विषय कृषी रसायनशास्त्र हाताळते. वास्तविक हे दोनही विषय भू-सूक्ष्मजीवशास्त्राकडून हाताळले जाणे गरजेचे आहे. तसे न झाल्याने माती प्रदूषण या विषयाची अद्याप थेट मिमांसा अथवा अवलोकन झालेले नाही, असा निष्कर्ष परिषद काढते. हा विषयच मुळात न समजल्याने प्रदूषित जमिनी परत मूळ पदावर नेण्यासाठी काय करावे लागेल, याचे उत्तर सापडत नाही. या शास्त्रशाखेचा जर गंभीरपणे अभ्यास केला, तर प्रचलित शेतीत आज शास्त्रीय म्हणून ज्या शिफारशी केल्या जातात, त्यापैकी अनेक शास्त्रीयदृष्ट्या चुकीच्या ठरतात. 

जमिनीमधील जिवाणूंचे दोन गट  माझ्या शेतातील प्रत्येक काम  भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या संशोधनावर आधारित केले जाते. हे शास्त्र सांगते, जमिनीमध्ये जिवाणूंचे दोन गट कार्यरत असतात. गट क्र. १ ः पाल्यापाचोळ्याचे कुजवून सेंद्रिय खतात रूपांतर करणारा गट. गट क्र. २ ः पिकाला पोषण देणारा गट. पहिला गट जमिनीला सुपीकता देतो, तर दुसरा पिकाला पोषण. दुसऱ्या गटाचा सुपीकतेशी  संबंध नाही. आजही चांगले कुजलेले खत २०-२५ गाड्या वापरणेची शिफारस करतो. त्या वेळी पहिल्या गटाचे कामकाज जमिनीबाहेर पूर्ण होते व दुसऱ्या गटाचे जिवाणूच जमिनीत वाढण्यास वाव शिल्लक राहतो. सुपीकता देणारे जिवाणूच जर जमिनीत वाढणार नसतील तर सुपीकता मिळणार कशी? दुसरा गट वाढून पिकाला पोषण मिळते. यातून पिकाचे उत्पादन मिळते, पण सुपीकता मिळत नाही. आज सेंद्रिय खतही मिळणे दुरापास्त झाले आहे. फक्त रासायनिक खतांचा वापरच चालू आहे. यामुळे जमिनीत दोनही गटांचे जिवाणू काम करीत नाहीत. उत्पादकता घटण्याचे हे मुख्य कारण असून, या शास्त्रशाखेचा अभ्यासच होत नसल्याने ते शास्त्रज्ञानापुढेच येत नाही तर शेतकऱ्यांपर्यंत कसे पोचणार?

सेंद्रिय पदार्थ रानातच कुजला पाहिजे सेंद्रिय पदार्थांचे कुजणे ही शेतीतील सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया! या कुजण्याच्या क्रियेचा अभ्यासच केला जात नाही. सेंद्रिय पदार्थ पीक वाढत असता, थेट रानातच कुजला पाहिजे. याचा अर्थ रानाबाहेर कुजविणे चुकीचे. कुजणे म्हणजे जमिनीची सुपीकता वाढत राहणे. ज्या वेळी कुजण्याची क्रिया बंद होईल त्या वेळी सुपीकता वाढविणेचे काम बंद पडते. याचा अर्थ पिकाची वाढ थांबते असा नाही. सुपीकता वाढणे व पीक वाढणे या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत. हा विषय भू-सूक्ष्मजीव शास्त्रीय असल्याने आज पूर्ण अंधारात आहे. या कुजण्याच्या क्रियेचा थेट संबंध फक्त जमिनीतील सेंद्रिय कर्बाशी नाही. सुपीकतेविषयक अनेक गुणधर्माशी या क्रियेचा थेट संबंध आहे. उदा. जमिनीचा सामू, क्षारता वाढणे, जमिनीची निचराशक्ती, कण रचना या कुजण्याशीच संबंधीत आहे. कुजणारे पदार्थ लवकर, मध्यम मुदतीने व दीर्घकाळ कुजत राहणारे अशा तीन गटांत असतात. जितका पदार्थ लवकर कुजेल तितके तयार झालेले खत लवकर संपून जाते. या उलट जितका पदार्थ कुजण्यास जास्तीत जास्त वेळ लागेल, तितका जास्त काळ कुजून तयार झालेले खत जमिनीत टिकून राहते. याला ह्यूमस असे म्हणतात. सहज मध्यम व दीर्घ मुदतीने कुजविण्याची प्रक्रिया पार पाडणारे प्रत्येक गटासाठी कित्येक जिवाणू कार्यरत असतात. आपल्याला शाश्‍वत सुपीकता पाहिजे असेल तर वरील तीनही गटांतील कुजणारे पदार्थ जमिनीत ठेवले पाहिजेत, तर सर्व जिवाणूंना खाद्य मिळते व जास्तीत जास्त जैववैविध्य जपले जाते. मुळात सेंद्रिय खत वापरण्याचे प्रमाण कमी आहे. त्यात प्रामुख्याने शेणखत अगर कंपोस्ट, तेही जमिनीबाहेर कुजवून पशुपालनातूनच जमिनीची सुपीकता हा विषय शेतकऱ्यांच्या डोक्‍यात इतका घट्ट बसला आहे, की या बाहेर सुपीकतेविषयक काही आहे, असे मानण्यासच शेतकरी तयार नाही. जनावरांना आपण जी वैरण देतो, ती प्रामुख्याने लवकर कुजणाऱ्या गटातील असते. त्यापासून हलक्‍या दर्जाचे खत तयार होते. वापरल्यानंतर अल्पकाळात ते संपून जाते, असे वास्तव आहे. परंतु, समस्त शेतकरी बांधवांत अशी कल्पना रूढ आहे, की एकदा भरपूर शेणखत टाकले, की ते २-३ वर्षे काम करतेय ही एक मोठी गैर समजूत आहे.

P. R. CHIPLUNKAR (लेखक प्रगतिशील शेतकरी आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com