agriculture news in marathi agrowon special article on sonachafa farming brought essence in tribal s life | Agrowon

मातीच्या गंधाचे देणे सुगंध रुपानेच फेडले
DR. NAGESH TEKALE
बुधवार, 9 मे 2018

शहापूर तालुक्याचे जंगल आणि डावीकडे भिवंडीचे जंगल यामधून रस्ता कापत अर्ध्या तासाने आम्ही विष्णू म्हात्रे यांच्या शेतावर पोचलो आणि प्रवासाचा सारा शीण सोनचाफ्याच्या सुगंधात पूर्णपणे हरवून गेला.
 

वसईमधील प्रगतिशील शेतकरी आणि स्व. वसंतराव नाईक कृषी पुरस्कार विजेते सुभाष भट्टे यांचा १८ एप्रिल २०१८ ला रात्री मला फोन आला. सर उद्या सकाळी ६ वाजता मी तुमच्याकडे येतो, आपणास विष्णू म्हात्रे यांची सोनचाफा शेती पाहण्यास जायचे आहे. १९ तारखेस ठरलेल्या वेळेवर पहाटे साडेतीन वाजता वसईमधील एका गावावरून निघून मुंबईस ते दिलेल्या वेळेत पोचलेसुद्धा. दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही मुंबई नाशिक महामार्गास लागून असलेल्या वाशिंद-वाडा या अदिवासी भागामधील रस्त्याला वळलो. उजवीकडे शहापूर तालुक्याचे जंगल आणि डावीकडे भिवंडीचे जंगल या मधून रस्ता कापत अर्ध्या तासाने आम्ही विष्णू म्हात्रे यांच्या शेतावर पोचलो आणि प्रवासाचा सारा शीण सोनचाफ्याच्या सुगंधात पूर्णपणे हरवून गेला.

विष्णू गणपत म्हात्रे हे सत्तरीमधील एक प्रगतिशील शेतकरी आहेत. ठाणे जिल्ह्यामधील दुर्गम अदिवासी भागात शेकडो अदिवासींना बरोबर घेऊन ते गेली चार वर्ष सोनचाफ्याची सुगंधी फुलशेती करतात. १९८९ मध्ये त्यांनी या दुर्गम भागात १४ एकर पाषाणाची जमीन खरेदी केली, तेव्हा समाजामधील लोकांनी त्यांना वेड्यातच काढले होते. पाषाणावर काय शेती करणार? म्हात्रे यांनी २५ वर्ष त्या जमिनीस जंगलाच्या सहवासात ऊन, पाऊस, थंडीमध्ये सांभाळले, तिला जंगलाशी एकरूप केले. २०१४ मध्ये त्यांना पहिल्या मृगामध्येच त्या ठिकाणी मातीचा गंध अनुभवण्यास मिळाला. माझ्या जमिनीने मला सुगंधाचे देणे दिले आता तिचे ऋण मी सुगंध रुपानेच तिला परत करणार या एका ध्यासाने या शेतकऱ्याने तेथे १८६० सोनचाफ्याची झाडे लावली. शेततळे आणि दोन बोअरवेल घेऊन पाण्याचा शाश्वत स्राेत तयार केला. आणि काय आश्चर्य, दुसऱ्या वर्षीच त्यांना फुलांचे उत्पादन सुरू झाले. 

प्रतिदिन १०० फुलांची एक पिशवी याप्रमाणे १५० पिशव्या भरल्या जातात आणि सकाळी दोन माणसांच्या मदतीने दादरच्या फूलबाजारात योग्य वेळेत उत्कृष्ट दर्जासह पोचतातसुद्धा. पिशवीत दोन फुले जास्त पण कमी नाही यामुळे त्यांच्या या हरितगृहाविना सुरू असलेल्या फूलशेतीस आर्थिक झळाळी आली. आज त्यांना या व्यवसायामधून महिना एक लाखाचे उत्पन्न मिळते. मिळणाऱ्या नफ्यापेक्षाही त्यांनी या सोनचाफ्याच्या शेतीमधून चाळीस अदिवासी कुटुंबांना वर्षभर शाश्वत रोजगार दिला आहे. या एका गोष्टीचे जास्त नवल वाटले ते म्हणजे त्यांनी त्यांच्या या शेतीमधून हाकेच्या अंतरवर असलेल्या पिवळी गावच्या आश्रमशाळेमधील २० अदिवासी मुलांना सकाळी ७ ते ८ या वेळेत फुलांची मोजणी करून पिशव्या तयार करण्याचे काम दिले. ९ वी १० वीचीही मुले शिस्तीने सकाळी लवकर उठून या शेतावर येतात. सोनचाफ्याच्या सुगंधी सहवासात तासभर रमून परत शाळेत जातात. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ‘कमवा आणि शिका’ हा अतिशय सुरेख उपक्रम त्यांच्या शालेय संकुलात राबवला होता. आज मी तो अदिवासी भागात प्रत्यक्ष अनुभवला. 

सोनचाफा हा माझ्या संशोधनाचा विषय. या फुलांच्या सहवासात मनाची एकाग्रता वाढते, अभ्यासात मन लागते, सदैव सकारात्मक विचार येतात हे मी प्रयोगाअंती अनुभवले होते आणि म्हणून अदिवासी आश्रम शाळामध्ये त्यांचे वृक्षारोपणसुद्धा केले. सहाजिकच म्हात्रेंना मी या विद्यार्थ्यांच्या अभ्यासामधील प्रगतीबद्दल विचारणा केली आणि अपेक्षित उत्तर मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांची वागणूक शिस्तप्रिय, आज्ञाधारक होती. सोनचाफ्याच्या सहवासातून मिळणारे अर्थार्जन त्यांच्या शालेय साहित्याकडे व अडचणीच्या वेळी त्यांच्या कुटुंबाकडे जाईल याची विष्णू म्हात्रे स्वत: काळजी घेतात. फक्त सोनचाफा लावून शेती शाश्वत कशी होणार, त्यासाठी अजून काही नाविन्यपूर्ण प्रयोग करावयास हवे या ध्येयापोटी त्यांनी सोनचाफ्यास जोडून ५०० आंब्याची आणि ६७५ शिंदीची झाडे लावली आहेत. शिंदीच्या वृक्षापासून निरा काढून त्यापासून गूळ तयार करण्याचे त्यांनी ठरविले आहे. शिंदीपासून फक्त ताडीच तयार होत नाही तर औषधी गूळ सुद्धा तयार होतो याबद्दलची माहिती त्यांना अदिवासी बांधवांमध्ये जागृत करावयाची आहे. या प्रगतिशील शेतकऱ्याने त्यांच्या शेतात मानगा बांबूची ५०० बेटे तयार करण्यासाठीसुद्धा त्यांची लागवड केली आहे. पाण्याच्या नियोजनासाठी त्यांच्या कडे दोन बोअर आहेत. त्याचे पाणी शेततळ्यात सोडले जाते व तेथून ते सर्व वृक्षांना दिले जाते. शेताला जोडूनच एक दगडी पाषाणाचा ओढा आहे. या ओढ्याचा उपयोग अादिवासी समाजासाठी शाश्वत पाणी स्राेत म्हणून करण्यासाठी त्यांची सध्या चालू असलेली धडपड तरुणांनाही लाजविणारी आहे. एकाच सलग क्षेत्रावर फुलशेती, वनवृक्षशेती आणि फळशेती आणि तीही अादिवासी भागात त्यांनाच रोजगार देऊन करणारा हा शेतकरी मला जगावेगळाच वाटला. आज त्यांनी १०० अदिवासी शेतकऱ्यांची मोठी यादी करून त्यांना प्रत्येकी २० सोनचाफ्याची झाडे मोफत देण्याचे ठरविले आहे. अादिवासी फुले गोळा करून देणार आणि जागेवरच त्यांना त्यांचे पैसे मिळणार हे त्यांचे धोरण आहे. ज्या पद्धतीने त्यांच्याकडे आज अदिवासी शेतकरी येतात यावरून हा प्रकल्प यशस्वी होणार हे नक्की!

भिवंडीमधील शेतकरी उन्नती मंडळाचे कार्य करणारे म्हात्रे आजही अादिवासी शेतकऱ्यांचे मेळावे घेतात. त्यांना आधुनिक शेतीची माहिती देतात. शाश्वत शेतीचे धडे देण्यासाठी आपल्या शेतावर बोलवतात. वृक्षारोपणाची आवड असणाऱ्या या शेतकऱ्याने स्वखर्चाने कर्जत तालुक्यात ३००० अॅास्ट्रेलियन सागाची लागवड एका संस्थेस करून दिली. सोनचाफ्याच्या जोडीला तुम्ही आंब्याची झाडे का लावली, या प्रश्नावर ते म्हणतात, ‘‘कोकणात माझ्या आजोबांनी लावलेल्या आंब्याची आम्ही फळे खाल्ली. आज मी ही ५०० झाडे लावली आहेत, उद्या माझी नातवंड याची फळे खाताना माझ्या आजोबांनी लावलेल्या आंब्याची फळे आम्ही खात आहोत असे म्हणतील. पिढ्या संस्कारक्षम तयार होतात त्या अशा. म्हात्रे यांची संपूर्ण वृक्षशेती सेंद्रिय आहे. त्यांच्याकडे  १० गायी असून मिळणाऱ्या शेणाचे संपूर्ण नियोजन त्यांच्याकडे तयार आहे. 

विष्णू म्हात्रे म्हणतात, ‘‘जेव्हा आपणाकडे पैसा असतो तेव्हा महाग वस्तूसुद्धा आपणास स्वस्त वाटू लागते, मात्र जेव्हा हातात पैसा नसतो तेव्हा कवडीमोल किमतीची वस्तूसुद्धा महाग वाटू लागते.’’ हा शेतकरी मला वंदनीय झाला तो याच विचारामुळे. मिळणाऱ्या अफाट लक्ष्मीमधून सोन्याचा शोध घेण्यापेक्षा या प्रगतिशील शेतकऱ्याने गरीब अादिवासी बांधवांना रोजगार देऊन सोनचाफ्यामधील सोन्याचा शोध घेतला. हे केवढे मोठे कार्य! वृक्ष सहवास माणसास सुखी, आनंदी ठेवतो. अशा वृक्षांवर प्रेम करणारा हा शेतकरी इतर शेतकऱ्यांना अनुकरणीय ठरावा एवढीच इच्छा!
DR. NAGESH TEKALE  : ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

इतर अॅग्रो विशेष
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...