आजच्या दुष्काळात आठवतात सुधाकरराव नाईक

सुधाकरराव नाईक यांचे महाराष्ट्राच्या भवितव्याचे 'मिशन आणि व्हिजन' स्पष्ट होते. समृद्ध राज्याच्या वाळवंटाकडे होणाऱ्या वाटचालीचा वेध घेत त्यांनी पहिल्यांदा जलसंधारणाची मुहूर्तमेढ रोवली. राज्यात स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण करून जलसंधारण चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप दिले. आज त्यांचा अठरावा स्मृतिदिन. राज्य सरकार त्यांचा स्‍मृतिदिन जलसंधारण दिन म्हणून साजरा करते.
संपादकीय
संपादकीय

महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून अल्पकाळ सत्ता गाजविलेले सुधाकरराव नाईक हे एक बाणेदार आणि पाणीदा नेते होते. राज्याच्या भल्यासाठी जे करायचे ते मनापासून आणि धडाडीने असा त्यांचा बाणा होता. त्यांनी राजकारणातील गुंडा गर्दीला करारी स्वभावाने छेद दिला. मुख्यमंत्री म्हणून प्रशासनात दरारा निर्माण केला.

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुलीच्या मातीत सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला. वडील लोकनेते बाबासाहेब नाईक कडक स्वभावाचे तर काका वसंतराव नाईक मृदू मनाचे. या ज्येष्ठांच्या तालमीत तयार झालेले सुधाकरराव राजकारणातील एक आगळेवेगळे रसायन ठरले. ''मन कवीचे आणि मनगट प्रशासकाचे''  या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप राज्याच्या राजकारणात उमटली. गहुलीच्या सरपंचपदापासून पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल या संपूर्ण राजकीय प्रवासात सुधाकररावांनी बाणेदारपणा जोपासला. कला, संस्कृती, साहित्याचे रसिक असलेल्या सुधाकरराव यांची मातीशी असलेली नाळ कायम जुळलेली होती. समाजातील वेदनांची त्यांना जाण होती. महाराष्ट्राच्या माती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुधाकरावांना चांगले ठाऊक होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणी केली. ''पाणी आडवा पाणी जिरवा'' या मंत्रातून धरणे, बंधारे बांधून महाराष्ट्र राज्याला सुजलाम सुफलाम केले आणि महाराष्ट्रात हरित क्रांतीची पहाट उगवली. वसंतरावांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचे पुतणे सुधाकररावांनी ''जलक्रांती''चा ध्यास घेतला. सुधाकरराव यांचे दांडगे वाचन, सूक्ष्म निरीक्षण आणि तज्ज्ञांच्या विचारांचे अचूक परिशीलन या त्यांच्या गुणांमुळे ते भविष्याचा वेध सहजतेने घेत. 

मुख्यमंत्री पदावर आरूढ होण्याआधी त्यांनी कृषी, पाटबंधारे, शिक्षण, उद्योग, महसूल, पुनर्वसन, समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, गृहनिर्माण अशी खाती सांभाळली. त्यातील अनुभवातून त्यांना एक गोष्ट जाणवली. राज्याच्या शेतीचा प्रश्न बागायती नसून कोरडवाहूचा आहे, त्यासाठी जलसंधारणाला पर्याय नाही. शेती आणि जलतज्ज्ञांशी संवाद साधताना दिवसेंदिवस भूजल पातळीत होणारी घट आणि राज्याची हळूहळू वाळवंटाकडे होत चाललेली वाटचाल लक्षात आली आणि धीरगंभीर असलेले सुधाकरराव अधिक गंभीर बनले. ''भविष्यात महाराष्ट्राचे वाळवंट होऊ देणार नाही'',  ही मनाशी खूणगाठ बांधत या द्रष्ट्या नेत्याने राज्यात प्रथमच स्वतंत्र जलसंधारण खात्याची निर्मिती केली. त्यासाठी अन्य खात्यांमधून जलसंधारणासाठी पैसा उभा केला आणि जलसंधारणांच्या कामांना चालना दिली. परंतु, अल्पावधीतच त्यांनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर त्यांच्या जलसंधारणाच्या महत्त्वपूर्ण कार्याकडे नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले, ही खंत आजही जनसामान्यांच्या मनात आहे. मोठी धरणे बांधण्यापेक्षा छोटी छोटी धरणे उभारावी, याद्वारे अधिक शेतजमीन सिंचनाखाली येऊ शकते, या छोट्या प्रकल्पांमुळे शेतकरी भूमिहीन होणार नाही तसेच पुनर्वसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही, असे विचार ते आपल्या भाषणांमधून मांडत असत. त्यांची जलसंधारणाची विचारधारा आणि धारणा अतिशय परिपक्व होती. सुधाकरराव हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झालेत. परंतु, त्यांचे मन सिमल्याच्या राजगृहात फारसे रमले नाही. पक्षी सायंकाळी आपल्या घरट्याकडे परततात तसे ते आयुष्याच्या सायंकाळी विधानसभेच्या लोक मायेच्या घरट्यात परतले. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून दिल्लीत गेलेले सुधाकरराव मायमातीच्या ओढीने पुसद गहुलीत परतले. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी राज्य जलसंधारण सल्लागार परिषदेची स्थापना केली. जलसंधारणाचा ध्यास घेतलेल्या सुधाकरराव नाईक यांनी या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले.

मुख्यमंत्री राहिलेले सुधाकरराव जलसंधारण परिषदेचे अध्यक्ष पद स्वीकारतील की नाही अशी विलासरावांना शंका होती. मात्र जलसंधारणाचे काम करण्याची संधी मिळाल्याने सुधाकरराव मनातून आनंदित झाले. ठप्प झालेल्या जलसंधारण कामांना गती देण्यासाठी सुधाकरराव यांनी दृढ निश्चय केला. त्यांच्या निवडीनंतर लगेच मी दैनिक ''सकाळ''साठी मुलाखत घेण्यासाठी नाईक बंगल्यावर पोचलो. सुधाकरराव म्हणाले- " थोडं थांबूया. जलसंधारण क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांशी मी चर्चा करतो. काही ठोस कार्यक्रम घेऊनच आपण बोलूया". खरे म्हणजे सुधाकररावांना प्रसिद्धीचा सोस नव्हता. त्यांना कार्याप्रती विश्वास होता. ते अगदी नेमके बोलत, मुद्द्याचे सांगत.  जलसंधारण चळवळीसाठी सुधाकररावांनी महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमध्ये दौरे केले. पुसद येथील त्यांचे सहकारी व तत्कालीन जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी यांना सोबत घेतले. या बैठकी खूप गाजल्या. जलसंधारणाच्या जागराने शासकीय यंत्रणा जागी झाली आणि जलसंधारणाच्या चळवळीत सुधाकररावांनी ऊर्जा भरली. जलसंधारण ही लोक चळवळ व्हावी, असा त्यांनी ध्यास घेतला. त्यांनी जलसंधारण चळवळीसाठी स्वत:ला एवढे झोकून दिले की, कोकणातील दौऱ्यात तब्येतीकडे दुर्लक्ष झाले. दुर्दैवाने त्यांची प्रकृती सावरू शकली नाही आणि १० मे २००१ रोजी त्यांचे प्राणपाखरू उडून गेले. कदाचित सुधाकररावांना अधिक वेळ मिळाला असता तर राज्यातील जलसंधारणाचे चित्र अधिक फलदायी ठरले असते. दुष्काळी स्थितीत महाराष्ट्र आज पाणीटंचाईने होरपळून निघत आहे. अशावेळी सुधाकररावांच्या जलसंधारण कार्याची आठवण तीव्रतेने होते. महाराष्ट्राचे भविष्यात वाळवंट होऊ नये, ही अपेक्षा बाळगताना जलसंधारणाच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी झाले पाहिजे. सुधाकरराव यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!  

प्रा. दिनकर गुल्हाने  ः ९८२२७६७४८९ (लेखक प्राध्यापक तसेच ॲग्रोवनचे मुक्त बातमीदार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com