agriculture news in marathi, agrowon special article on water management | Agrowon

जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणी
डॉ. नागेश टेकाळे
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

जल व्यवस्थापन शिकण्यासाठी मी कुठला अभ्यासक्रम केला नाही आणि ग्रंथही वाचला नाही. लहानपणी माझ्या आईने आणि आजोळी आजी-आजोबांनी घरात आणि परिसरात भरपूर पाणी असताना मला पाणी बहुमोल आहे, त्याचा सन्मान करून ते जपून वापरले पाहिजे, याची शिकवण दिली. 
 

जलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक वाचण्याची गरज नाही, हा स्वअनुभवाचा भाग आहे आणि यासाठी तुमच्यावर ‘जल हे अमृत आहे,’ असे संस्कार बालपणीच होणे आवश्यक आहेत. घरातील, परिसरामधील लोक जसे वागतात, त्याचेच अनुकरण लहान मुले करीत असतात. आजही मला माझे रम्य बालपण आठवते. शालेय सुटीमध्ये मी आजोळी जात असे. नदीचा माझा तसा जन्मापासूनचाच संबंध. खळखळ वाहणारी नदी, तिला रुपेरी वाळूची किनार, दोन्ही बाजूला लहान मोठे वृक्ष, काठाला फुललेली कन्हेर आणि वाळूमध्ये तयार केलेल्या स्वच्छ झऱ्यांचे पाणी हे विसरणे केवळ अशक्य! माझ्या आजोळच्या शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन हे नदी व्यवस्थापनाशी घट्ट जोडलेले होते. दैनंदिन दिवसाची सुरवातच मुळी सुंदर असे. लहान मुले, वृद्ध माणसे आणि स्त्रिया यांचा अपवाद वगळता सर्व जण सकाळीच नदी स्नानासाठी येत. नदीपात्रात कडेला असलेल्या वाळूत अनेक झरे केलेले असत. सकाळी स्त्रिया नदीवर पाण्याला आल्या, की आम्ही मुले लहान वाटीने झऱ्यातील थोडे थोडे पाणी त्यांच्या घागरीत भररून ठेवण्यास मदत करीत असू. स्वच्छ पाण्याचा एक थेंबसुद्धा बाहेर सांडत नसे. डोक्यावर दोन, काखेत एक, अशी घागर आणि कळशीची नदी ते घर पाण्याची वाहतूक मी बालपणी श्रद्धेने पहिली. त्याच वेळी मला पाण्याचे खरे मोल कळाले. आजोबांनी मला पाय न धुता घरात यायचे नाही, हे सांगतानाच एका तांब्यातसुद्धा पाय कसे स्वच्छ धुता येतात, हे शिकवले. जेवताना अथवा कुणी पाहुणा आल्यास तांब्या फुलपात्रे समोर ठेवावे म्हणजे त्यामधून हवे तेवढेच पाणी घेता येते, हा केवढा मोठा जलव्यवस्थापनाचा धडा होता. माझी आजी अतिशय कष्टाळू, तेवढीच प्रेमळ होती. पायाने अपंग असूनही नदीवररून ती डोक्यावर दोन घागरी घेऊन येत असे. तिचे ते कष्ट मी जवळून पाहिले म्हणूनच पाण्याच्या प्रत्येक थेंबाची किंमत आज मला कळली आहे. वस्तूची किंमत आपणास तेव्हा कळते जेव्हा त्यामागचे कष्ट तुम्हास दिसतात. 
आमच्या घरी परसदारी एक लहान आड होता. बाराही महिने कायम भरलेला. घरामध्ये पाणी भरून ठेवण्याची दोनच भांडी, एक स्वयंपाकघरात आणि दुसरा अंगणामधील माठ. जेव्हा पाणी हवे तेव्हा पोहरा घेऊन आई आडावर जात असे, जेवढे पाणी हवे तेवढेच पोहऱ्याने काढणार, चुकून जास्त आले, तर परत आडात सोडून देणार. पाण्याचे नियोजन कसे करावे, अपव्यय कसा टाळावा, हे आईने मला शिकविले. आमच्या आडाभोवती सदैव फुललेली कर्दळ होती. सकाळी कर्दळीचे एक फूल आडात सोडून जलासमोर हात जोडलेली माझी आई आजही मला समोर दिसते. 

उन्हाळ्यात माठातील थंड पाणी वगराळीने पेल्यात काढून ते पिणे, हे मी कुठल्या पुस्तकात शिकलो नव्हतो. माझी आई तिवईवर ठेवलेल्या माठातून खाली थेंब थेंब टिपकणारे पाणीच भांड्यात गोळा करून पीत असे. आईने शिकविलेल्या त्या पाण्याच्या थेंबाचे महत्त्व आजही मी विसरलेलो नाही. कपडे धुण्यासाठी सर्व स्त्रिया नदीवर जात तेव्हा तो पाहिलेला वाहता प्रवाह आणि वाळूवर सुकवले जात असलेले कपडे आजही मला आठवतात. माझ्या आजोळच्या घराला मोठे परसदार होते. तेथे आळू, पुदिना, गवती चहा, वाळा, कर्दळ आणि दोन केळीची झाडे होती. घरातील स्नानाचे आणि स्वयंपाक घरातील पाणी परसदारी या झाडांना मिळत असे. परसामधून बाहेर पडलेले पाणी नदीच्या पाण्याएवढेच स्वच्छ असे. परसदारच्या या वनस्पतींचा सांडपाणी स्वच्छ करणारे बालपणी पाहिलेले संशोधन मला पुढे खूपच कामाला आले. स्नानासाठी तांब्याचे एक घंगाळ होते. चार तांबे गरम पाणी आणि उरलेले थंड या पाण्याने प्रत्येकाने अंघोळ करावयाची, हा आजोबांचा दंडक होता आणि तो शिस्तीत पाळला जात असे. घरापासून चार पावलावर स्वच्छ वाहणारी नदी आणि तिच्यात एवढे मुबलक पाणी असताना माझ्या आजोबांनी जल व्यवस्थापनाचे त्या वेळी दिलेले धडे कुठल्या पुस्तकामधील मुळीच नव्हते. सकाळी स्नान झाल्यावर ते भांड्यात पाणी घेऊन त्याचे पूजन करीत आणि आत एक तुळशीचे पान टाकून ते पाणी जेवताना सर्वांना देत. ‘‘जल हे सर्व रोगांचे मूळ आहे, ताणतणावाचे कारण आहे म्हणून सुखी आरोग्यदायी कुटुंबासाठी त्याचे पूजन आणि सन्मान करावा.’’ हे त्यांचे शब्द आजही मला खूप मोलाचे वाटतात. 

प्रदूषित पाण्यामुळे अदिवासी भागातील चिमुकल्या बाळांचे मृत्यू मी माझ्या हृदयात खोल व्रणासारखे जपलेले आहेत. आजोबांबरोबर मी शेतावर, विहिरीकाठी जात असे, मोटेचे पाणी पाहण्याचा त्या वेळचा तो आनंद वेगळाच! विहिरीमधून मोट बैलाच्या साहाय्याने वर ओढताना अर्धे पाणी विहिरीतच पडत असे. संगीताचा तो मधुर स्वर आजही मनात रेंगाळत आहे. आजोबा म्हणत, ‘‘पाणी हे कधी ओरबाडून घेऊ नये. अर्धे जलस्त्रोताला परत करावे.’’ जलव्यवस्थापनामधील केवढे मोठे सत्य ते सहज बोलून गेले होते. ‘‘मोटेच्या पाण्यामुळे पिके हसतात, डोलतात.’’ हेसुद्धा त्यांचेच वाक्य! सध्याची उन्हाची लाही, पाण्याच्या थेंबासाठी चालणारी वणवण पाहून का उगाच ठाऊक आज मला माझे रम्य बालपण आठवते. मनात आले ‘‘लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा.’’ मुंगीला जेव्हा साखरेचा कण अथवा रवा दिसतो तेव्हा तिला हर्ष होतो. केव्हा मी हा कण घेऊन वारुळात जाईन आणि हजारोंच्या संख्येत असलेल्या माझ्या सख्यांना दाखवेल, असे होते. कारण तो रवा, साखरेचा कण सर्वांचा असतो. फक्त तिच्या एकटीचा नसतो. पाणी हे सर्वांचेच आहे. आपल्या एकट्याच्या मालकीचे नाही, हेच खरे जलव्यवस्थापन आहे. फरक एवढाच, की मी हे सर्व लहानपणीच शिकलो.

डॉ. नागेश टेकाळे ः ९८६९६१२५३१
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)



इतर संपादकीय
उद्योगाला साखर कडूचमहाराष्ट्रातील गळीत हंगामाची सांगता नुकतीच झाली...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
कृषी पतपुरवठ्याची घडी बसवा नीटराज्यातील सहकाराचा कणा राज्य बॅंकेला मानले जाते....
व्यापक जनहितालाच हवे नव्या सरकारचे...आता साऱ्या देशाचे लक्ष १७ व्या लोकसभा निवडणूक...
व्यंकट अय्यरची कहाणीशेतीतील वाढत्या समस्यांना तोंड देत उत्पादन...
जललेखा अहवाल : अर्धवट आणि अवास्तवहीथेंब थेब पाण्याचा हिशेब लागावा, असा आग्रह सध्या...
कृषी पर्यटनाला संधी अमर्यादकृषी पर्यटन अर्थात ‘अ‍ॅग्रो टुरिझम’ हे ग्रामीण...
घातक किडींविरुद्ध लढा एकत्रको ल्हापूर जिल्ह्यात या वर्षीपासून कृषी विभाग व...
मुक्त शिक्षण एक मंथनयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पीएच.डी. ‘...
प्रशासनाच्या हलगर्जीपणाने केले अनेकांचे...एकीकडे आम्ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे...
तंत्रज्ञानाचे ‘भरीत’ किती दिवस? हरियाना राज्यात अवैध बीटी वांग्याची लागवड नुकतीच...
अशी ही (आर्थिक) बनवाबनवी!लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात...
भूलभुलैया नव्हे तर शेतकऱ्यांचा दीपस्तंभडॉ. अंकुश चोरमुले यांनी ॲग्रोवनच्या ५ मे २०१९...
सहकारच्या नैतिक मूल्यांचे अधःपतनसहकारी चळवळीने भारतातील खेड्यापाड्यांतील...
पेच पूर्वहंगामीचाराज्यात दरवर्षी जवळपास ४० लाख हेक्टर क्षेत्रावर...
आजच्या दुष्काळात आठवतात सुधाकरराव नाईकमहाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री म्हणून...
सावधान! वणवा पेटतोय...चा र दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील मानूर-...
मैया मोरी मैं नही माखन खायोसाठच्या दशकात ‘गोकूळचा चोर’ हा स्व. सुधीर फडके...
नाक दाबून उघडा तोंडराज्यातील ३०७ पैकी ६० बाजार समित्यांमध्ये...