agriculture news in marathi, agrowon special article on world meteorological day | Agrowon

आदित्यात् जायते वृष्टि:
डॉ. रंजन केळकर  
शनिवार, 23 मार्च 2019

जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेच्या स्थापनेचं (२३ मार्च १९५०) संस्मरण म्हणून २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी त्यासाठी एक नवीन विषय निवडला जातो. या वर्षीचा विषय आहे ‘‘सूर्य, पृथ्वी आणि हवामान.’’ या तिन्‍हींचा एकमेकांशी असलेल्या संबंधाचा घेतलेला हा वेध...
 

जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती, लोकसंख्या, भाषा अशा विविध बाबींत ते सगळेच निराळे आहेत. प्रत्येक देशाची आपली वैशिष्ट्यं आहेत आणि प्रत्येकानं आपल्या सीमा आखलेल्या आहेत, ज्यांचं कोणी उल्लंघन करू शकत नाही. पण पृथ्वीभोवतीचं वातावरण त्या सर्व देशांना जोडणारा एक नैसर्गिक दुवा आहे. वातावरण चंचल असतं. त्यातील वारे इकडून तिकडे सतत वाहत असतात आणि देशांच्या भौगोलिक सीमा ते सहज ओलांडतात. म्हणून कोणत्याही देशाला त्याच्या हवामानावर मालकी हक्क गाजवता येत नाही. हवामानाचा अभ्यास करायचा असेल तर जगातील सर्व देशांना एकत्र येऊन तो करावा लागतो. या उद्देशानं संयुक्त राष्ट्र संघटनेनं २३ मार्च १९५० रोजी एक कायमस्वरूपी यंत्रणा उभारली, जिला ‘जागतिक हवामानशास्त्रीय संस्था’ असं नाव दिलं गेलं आणि तिचं मुख्यालय जिनेव्हा इथं स्थापन केलं गेलं. भारत तेव्हापासून या संस्थेचा सदस्य आहे आणि तिच्या कार्यात तो नेहमीच सहभागी राहिला आहे. जागतिक हवामानशास्त्रीय संस्थेच्या स्थापनेचं संस्मरण म्हणून २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन’ म्हणून साजरा केला जातो. दर वर्षी त्यासाठी एक नवीन विषय निवडला जातो. या वर्षीचा विषय आहे “सूर्य, पृथ्वी आणि हवामान.” 

आपण आकाशाकडे रात्री पाहिलं तर आपल्याला असंख्य लुकलुकणारे तारे दिसतात. पण सूर्य हा असा एक तारा आहे जो आपल्याला दिवसा दिसतो, कारण तो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे. सूर्य आपल्याला त्याची उष्णता आणि प्रकाश देतो. पृथ्वीवरचं सगळं जीवन, आणि विशेषतः पृथ्वीचं हवामान, सूर्याशी निगडित आहे. पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की, पृथ्वी अचल आहे आणि सूर्य तिच्याभोवती फिरतो. म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्त असे शब्द प्रचलित झाले आणि अजूनही ते आपण वापरतो. पण वास्तव हे आहे की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ती स्वतःच्या अक्षाभोवतीही फिरते, आणि तो अक्ष काहीसा झुकलेला आहे. या तीन कारणांमुळं आपण पृथ्वीवर दिवस व रात्र, उन्हाळा व हिवाळा आणि हवामानातील दैनंदिन परिवर्तन अनुभवतो. 

सूर्याचं तापमान सुमारे ६००० अंश सेल्सिअस आहे, पण त्याची ऊर्जा पृथ्वीपर्यंत येता येता बरीच घटते आणि पृथ्वीचं तापमान फक्त १४ अंश सेल्सिअस एवढंच राहतं. अर्थात हे सरासरी तापमान आहे. पृथ्वीवरील विभिन्न प्रदेशांवर विभिन्न ऋतूंत तापमान याहून खूपच कमी किंवा अधिक असू शकतं. पृथ्वीचं तापमान आटोक्यात राहणं सर्व सजिवांसाठी व मानवासाठी, त्याचप्रमाणं सर्व वनस्पतींसाठी व पिकांसाठी, अतिशय महत्त्वाचं आहे. हे तापमान आटोक्यात राहावं म्हणून सूर्यापासून जी काही ऊर्जा पृथ्वीला प्राप्त होते ती तिला अवकाशात परत सोडावी लागते. ही नैसर्गिक प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते आणि तिला ऊर्जेचं संतुलन म्हणतात. 

आता कल्पना करा की, सूर्यापासून मिळालेली सगळी ऊर्जा पृथ्वीनं परत केली नाही, आणि हे संतुलन बिघडलं, तर काय होईल? अर्थातच पृथ्वी तापेल. नेमकं तेच आताच्या काळात घडत आहे. त्यालाच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ म्हणतात, किंवा वैश्विक तापमान वाढ जी आपण हल्ली अनुभवत आहोत. यामागं एकच प्रमुख कारण आहे की, पृथ्वीचं वातावरण अनेक प्रकारच्या वायूंचं एक मिश्रण असून त्यांच्यात काही वायू असे आहेत जे ऊर्जा शोषून घेतात. या वायूंनी जितकी उष्णता शोषली तितकी जर त्यांनी परत केली तर पृथ्वीचं सरासरी तापमान कायम राहील. अठराव्या शतकापर्यंत हे असंच होत असे. पण मध्यंतरी जगात जी औद्योगिक क्रांती झाली आणि मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण आलं, तेव्हापासून वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण सातत्यानं वाढत गेलं आहे. कार्बनडाय ऑक्साइड वायू वातावरणात अतिशय सूक्ष्म प्रमाणात असतो, पण त्याची उष्णता शोषून घ्यायची क्षमता फार मोठी आहे. जोपर्यंत कार्बनडाय ऑक्साइडच्या उत्सर्जनावर आळा घातला जात नाही तोपर्यंत पृथ्वीचं तापमान भविष्यात वाढतच जायची शक्यता आहे. ही सर्वांसाठी एक चिंतेची बाब आहे आणि जगातील शास्त्रज्ञ आणि राष्ट्रप्रमुख या समस्येवर विचार करत आले आहेत. पेट्रोल आणि खनिज तेलांचा इंधनासाठी, वाहनं चालविण्यासाठी आणि विद्युत निर्मितीसाठी सध्या होत असलेला उपयोग हळूहळू कमी करून त्याऐवजी सौर आणि पवन ऊर्जेचा उपयोग करणं हा एक उपाय आहे. भारतात सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रचंड वाव आहे, कारण आपला देश उष्ण कटिबंधात मोडतो आणि आपल्याकडे मॉन्सूनचे महिने वगळता नेहमीच भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध असतो. भारताला निसर्गानं दिलेलं हे वरदान आहे. मॉन्सूनच्या कालावधीत सूर्यप्रकाश कमी मिळत असला तरी त्याची भरपाई म्हणून मॉन्सूनचे जोरदार वारे वाहतात, ज्यांचा उपयोग पवनचक्क्या चालविण्यासाठी करता येतो. 

सारांश हा की, वैश्विक तापमान वाढ आणि त्यामुळं घडत असलेल्या हवामान बदलामुळं आपण गांगरून न जाता त्याचा सामना करायचा प्रयत्न केला पाहिजे. भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच ‘आयएमडी’च्या लोगोमध्ये ‘‘आदित्यात् जायते वृष्टि:’’ हे एक संस्कृत वाक्य आहे. हे प्राचीन काळचं भारतीय विज्ञान केवळ तीन शब्दांत एक प्रगल्भ सत्य उलगडतं. त्याचा सोपा अर्थ असा आहे, की सूर्य हा पर्जन्याचा जनक आहे. पण त्यात आपल्यासाठी एक भरीव आश्वासन आहे, की जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडत राहील हे नक्की! म्हणून कोणी जर असं भविष्य वर्तवलं, की यापुढं पर्जन्यमानात सातत्यानं घट होत राहील किंवा वारंवार दुष्काळ पडतील, तर त्याला प्राचीन किंवा आधुनिक विज्ञानाचा आधार नाही, हे आपण लक्षात घ्यावं.

डॉ. रंजन केळकर : ९८५०१८३४७५
(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)


इतर अॅग्रो विशेष
कडवंची : डाळिंबात तयार केली ओळखकडवंची हे द्राक्षाचे गाव. याच गावातील ज्ञानेश्वर...
कडवंची : रोपवाटिका अन्‌ शेळीपालनाची जोडकडवंचीमधील सखाराम येडूबा क्षीरसागर यांनी केवळ...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : घरापुरते दूध अन् शेणखतासाठी...द्राक्षाचे गाव असलेल्या कडवंचीमधील प्रत्येक...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
कडवंची : लोकसहभाग, पाणी व्यवस्थापन हेच...कडवंची गावात द्राक्षातून समृद्धी दिसत असली तर...
‘कडवंची ग्रेप्स’ ब्रँडसाठी कृषी...कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि...
कडवंची : संघर्षातून पेललंय आव्हानकडवंचीमधील महिलांनीदेखील द्राक्ष शेतीमध्ये...
कडवंची मॉडेल : कोरडवाहूसाठी दिशादर्शक...मराठवाड्यात पावसावर आधारित कोरडवाहू शेतीला बळकट...
कडवंची : द्राक्षाच्या थेट विक्रीद्वारे...कडवंचीमधील द्राक्ष बागायतदारांनी विविध राज्यांतील...
कडवंची : पीक बदलाच्या दिशेने; पपई...विहीर, शेततळ्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध...
कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी...
कडवंची : बागेला मिळाली यंत्रांची जोडप्रयोगशील द्राक्ष बागायतदार सुरेश दगडू पाटील...
कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं...कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी...
कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून...काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात...
कडवंची : खरपुडी ‘केव्हीके’चे रोल मॉडेलकडवंची हे कृषी विज्ञान केंद्राचे पहिले दत्तक गाव...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया...नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा...
एनएचबी ‘एमडी’चा वाद पंतप्रधानांपर्यंतपुणे : देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत...
विदर्भात आज वादळी पावसाची शक्यतापुणे : राज्यातील उन्हाचा चटका पुन्हा वाढू...