कृषी विभागाच्या योजनांना गती द्या : कृषिमंत्री फुंडकर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना गती देतानाच प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत निधी पोचला पाहिजे. वर्षभरात उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानाच्या माध्यमातून शेतीचे यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले असून, गटशेतीला चालना मिळाली आहे. भविष्यात पीक संरक्षण आणि मृद आरोग्य पत्रिका वाटपाची मोहीम हाती घेण्याचे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले. 

कृषी विभागासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. बैठकीस विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार, आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह उपस्थित होते. आयुक्तालयाने केलेल्या सादरीकरणात या वर्षी विभागाचा सुमारे ७५ टक्के निधी खर्च झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावेळी कृषिमंत्र्यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्य पुरस्कृत योजनांचा सविस्तर आढावा घेतला. कृषी विभागासाठी आतापर्यंत ७५ टक्के खर्च करण्यात आला असून केंद्र पुरस्कृत योजनांवर ८३ टक्के इतका खर्च झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

कृषिमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून अतिरिक्त ९५ कोटी रुपयांचा निधी सूक्ष्म सिंचनासाठी देण्यात येणार असून मे अखेरपर्यंत तो खर्च करण्याची परवानगी आहे. उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियानांतर्गत यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. या मोहिमेत वर्षभरात ८ हजार ३२२ ट्रॅक्टर आणि ९ हजार ९०० पॉवर ट्रिलर वाटप करण्यात आले आहे. शेडनेट, कांदा चाळीसाठी निधी कमी पडू देऊ नका, असे सांगतानाच यावर्षी कांदा चाळींवर ११२ कोटी रुपये खर्च करून १३ हजार कांदा चाळी तयार करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, पीक कीड रोग संरक्षण, गटशेती, जमीन आरोग्य पत्रिका, जिल्हा कृषी महोत्सव याबाबत कृषिमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेतला. उर्वरित निधी जास्तीत जास्त खर्च होण्यासाठी विविध योजनांना गती देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com