जळगावातील ४ तालुक्‍यांत ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस

हतनूर धरण
हतनूर धरण
जळगाव  ः जिल्ह्यात या महिन्यात केवळ चार तालुक्‍यांमध्ये ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सरासरीच्या केवळ २९ टक्के पाऊस आतापर्यंत झाला आहे. पुढील काळात या महिन्याची सरासरी पाऊस गाठेल की नाही, असा मुद्दा यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 
 
जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून कमी अधिक असा पाऊस सुरू आहे. परंतु फक्त बोदवड, यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात बऱ्यापैकी सरी कोसळल्या. जळगाव, अमळनेर, धरणगाव, पारोळा भागामध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. जळगाव, धरणगाव भागात शुक्रवारी दुपारी रिमझिम पाऊस झाला. तोदेखील सायंकाळी सुरू झाला व रात्री बंद झाला. हवा तेवढा पाऊस जिल्ह्याच्या मध्य व पश्‍चिम पट्यात नसल्याने रब्बी हंगामाबाबत फारसे आशादायी वातावरण निर्माण झालेले नाही.
 
जामनेर, रावेर, यावलमध्येही जोरदार, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही वेळ विश्रांती घेऊन पुन्हा पाऊस यायचा, पण नदी, नाल्यांना पूर, शेतांमध्ये पाणी तुंबणे अशी स्थिती अजूनही नाही. केवळ कोरडवाहू कपाशी, तूर, सोयाबीन, मका या पिकांना जीवदान मिळेल, असे पर्जन्यमान झाले आहे. 
 
सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात एकूण १३९ मिमी पाऊस अपेक्षित आहे, परंतु अद्याप ४१.५ मिमी पाऊस पडला आहे. याची २९.८ एवढी टक्केवारी आहे. अर्थातच पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस आला तरच या महिन्याची सरासरी गाठता येईल. 

जिल्ह्यात सर्वांत मोठ्या गिरणा प्रकल्पात ६३.५६ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण करूनही दोन आवर्तने रब्बीला मिळू शकतील, एवढा जलसाठा झाला आहे. वाघूरमध्ये ६६.८९ टक्के पाणीसाठा असून, हतनूरमध्ये ९८.६३ टक्के पाणीसाठा झाला. इतर प्रकल्पांची टक्केवारी ः तोंडापूर ६८.०२, अग्नावती ०.०, हिवरा ०.०, बहुळा ०.०, मन्याड ०.०, भोकरबारी ०.०, मंगरूळ १००, अभोरा ७२.०६, सुकी ९०.९४. 

जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये गणल्या जाणाऱ्या हतनूर प्रकल्पातील पाणीसाठा सातत्याने वाढत आहे. हा प्रकल्प ओव्हरफ्लो होऊ नये यासाठी त्याचे २० दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. तसेच उजव्या कालव्यामध्येही पाणी सोडले जात आहे. या प्रकल्पातून सध्या ३३४४ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. २० दरवाजे शुक्रवारी रात्रीच उघडण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ७२ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com