दाखले न देण्याचा पटवारी संघाचा निर्णय

न्यायालयीन प्रकरणात नियमबाह्य दाखले दिल्यामुळे आमच्यावर कारवाई होऊ शकते. परिणामी विदर्भ पटवारी संघाने यापुढे पारंपरिक दाखले न देण्याचे ठरविले आहे. - प्रशांत बुले, सदस्य, विदर्भ पटवारी संघ
न्यायालयाकडून कारवाई झाल्याने यापुढे दाखले न देण्याचा निर्णय.
न्यायालयाकडून कारवाई झाल्याने यापुढे दाखले न देण्याचा निर्णय.

अमरावती ः विहीर असल्याचा, विहीर नसल्याचा, पत दाखला, उत्पन्नाचा दाखला या दाखल्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही. काही प्रकरणांत पटवाऱ्यांवर (तलाठी) न्यायालयाकडून कारवाई झाल्याने यापुढे असे दाखले न देण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघाने घेतला आहे.

विदर्भ पटवारी संघाची विशेष सभा शेगाव (जि. बुलडाणा) येथे पार पडली. तीन सप्टेंबरला झालेल्या या सभेला ११ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती पटवारी संघाचे सदस्य प्रशांत बुले यांनी दिली.

पटवाऱ्यांकडून पूर्वापार चालत आलेल्या पद्धतीनुसार रहिवासी, पत, उत्पन्न व इतर दाखले दिले जातात. मात्र हे दाखले देण्याचा कायदेशीर कोणताच अधिकार पटवाऱ्यांना नाही. अशा प्रकारचा दाखला दिल्यानंतर एका व्यक्‍तीने कोर्टात याचिका दाखल केली.

त्या वेळी असे दाखले देण्याचा अधिकार पटवाऱ्यांना नसल्याचे समोर आल्याने त्या पटवाऱ्यांवर कारवाई झाल्याचे प्रशांत बुले यांनी सांगितले. या प्रकरणानंतर बुलडाणा जिल्ह्यात पटवारी संघाने अधिकारात नसलेले दाखले न देण्याचा निर्णय सर्वांत आधी घेतला. त्यानंतर यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांतदेखील या निर्णयाची अंमलबजावणी झाली.

विदर्भात होणार अंमलबजावणी कायदेशीर अधिकार नसलेले रहिवासी, पत, उत्पन्न व इतर दाखले यापुढे दिले जाणार नाहीत. विदर्भातील ११ जिल्ह्यांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय विदर्भ पटवारी संघाच्या विशेष सभेत झाला.

रहिवासी दाखला देण्याची जबाबदारी सेवा हमी कायद्यात ग्रामसेवकाकडे आहे. विहीर असल्याची नोंद गाव नमुना १४ ला घ्यावी. विहिरीचा इतर अधिकाराप्रमाणे बोजा नोंदविता त्याप्रमाणे सातबारावर याची नोंद घेता येते. संपत्तीचे मूल्यांकन निबंधक करतो, त्यामुळे हैसीयत दाखला देण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com